Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
अग्रलेख

कोंडीत मुशर्रफ!

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता सोडल्यानंतर अमेरिकेत स्टॅन्फर्ड विद्यापीठात आणि मिशिगनच्या ‘वर्ल्ड अफेअर्स कौन्सिल’मध्ये चार-दोन भाषणे केली, पण भारतात ते सत्तात्यागानंतर परवा प्रथमच आले. ‘इंडिया टुडे’च्या ‘चॅलेंज ऑफ चेंज’ (बदलाचे आव्हान) या विषयाच्या चर्चासत्रात त्यांनी भाग घेतला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले काश्मीरसह सर्व

 

महत्वाचे प्रश्न सुटल्याशिवाय या भागात शांतता निर्माण होणे अशक्य आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. भारतात असणाऱ्या मुस्लिमांविषयी पाकिस्तानला किती काळजी वाटते, यासारख्या गोष्टी त्यांच्या भाषणात होत्या. पाकिस्तानातले बहुसंख्य नागरिक हे स्वत:ला देवबंदच्या विचारांचे मानतात. त्याच देवबंदमध्ये शिकलेले आणि लहानाचे मोठे झालेले मौलाना महमूद मदानी यांनी केलेल्या भाष्यानंतर मुशर्रफ यांना आपले शब्द चक्क माघारी फिरवावे लागले. ‘पाकिस्तानमध्ये जेवढे मुसलमान आहेत, त्यापेक्षा जास्त ते भारतात आहेत. आपले प्रश्न सोडवायची धमक भारतीय मुसलमानांमध्ये आहे आणि त्यांना त्या कामी सत्तर टक्क्य़ांपेक्षा जास्त मुस्लिमेतरांची मदत होत असते. कृपा करून भारतीय मुसलमानांना इतर समाजापासून अलग पाडू नका,’ असे मौलाना मदानी म्हणाले आणि त्यावर मिळालेल्या टाळ्यांच्या कडकडाटात क्षण-दोन क्षण मुशर्रफ यांना काय बोलावे ते उमजले नाही. त्यांनी काहीशा कडवट शब्दात मौलानांना म्हटले की, जर तुम्ही आताच्या तुमच्या या स्थितीबद्दल समाधानी असाल तर मग मला आनंदच आहे. मी माझे शब्द मागे घेतो. मौलाना मदानी यांनी त्या आधीच्या चर्चासत्रात बोलताना ‘धर्मयुद्धाच्या (जिहादच्या) थोतांडाविरुद्धचा जिहाद पुकारायची वेळ आता आली असून, आपण तो पुकारणार आहोत,’ असे स्वच्छ शब्दात सांगितले होते. मौलाना मदानी हे देवबंदच्या ‘दारुल उलूम’चे पदवीधारक आहेत. ते ‘जमियत उलेमा ए हिंद’ चे सरचिटणीस होते आणि अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलाचे ते राज्यसभेतील सदस्य आहेत. ते म्हणाले, की ‘भारतातल्या धर्माध शक्ती आणि प्रसार माध्यमांनी जिहादविषयीचा प्रचार ऐकून अशी कल्पना करून घेतली आहे की, दहशतवादाचा मुख्य स्रोत कुराण, प्रेषित आणि इस्लाम हे आहेत. त्यांचे तत्वज्ञान हे फक्त ठार करण्यापलीकडे दुसरे काही सांगत नाही, असा एक समज करून दिला गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुसलमानही बुचकळ्यात पडतो आणि तो ‘जिहाद’चा विचार करू लागतो.’ मौलाना मदानी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात सहारनपूर जिल्ह्य़ात असणाऱ्या देवबंदपासून अनेक ठिकाणी दहशतवादविरोधात मेळाव्यांचे आयोजन केले होते. आतापर्यंत अशा चाळीसपेक्षा जास्त मेळाव्यांचे आयोजन त्यांनी केले आहे आणि त्याला गर्दीही प्रचंड होत असते. मौलानांनी मुशर्रफ यांना ठणकावून सांगितल्यावर त्यांची झालेली कोंडी लक्षात येत होती. मुशर्रफ यांनी ‘आपला भूतकाळ घाणेरडा आणि वाईट आहे. त्याचा दोष पाकिस्तानकडे देऊ नका’, असे आवाहन करताना ‘तुम्ही आमचे नुकसान केले, तर आम्ही गप्प बसणार नाही. मग, आम्ही तुमचे नुकसान करू,’ असे सांगितले. काश्मीरमध्ये असणारी नियंत्रण रेषा ही ‘बर्लिनची भिंत’ आहे. ती दोन्ही देशांना अलग करते, तेव्हा तीच उखडून टाकायला हवी, असे ते म्हणाले. तत्कालीन कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी बर्लिनमध्ये उभे राहून ती भिंत पाडून टाका, असे म्हटले आणि त्यानंतर बर्लिनला दुभंगणारी ती भिंत काही काळाने पाडली गेली, पण त्यानंतर दोन्ही जर्मनींचे विलीनीकरण झाले, हे मुशर्रफ बहुधा विसरले असावेत. गोर्बाचेव्ह हे तेव्हा सत्तेवर होते आणि मुशर्रफ हे गोर्बाचेव्ह नव्हेत. त्या घटनेलाही आता वीस वर्षे झाली. पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’ ही त्यांची गुप्तचर संघटना यांना दहशतवाद संपवायचा आहे, त्यांना शांतताच हवी आहे, तेव्हा त्यांना सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावर दोषारोप करू नका, असे आवाहनही मुशर्रफ यांनी केले. मुंबईवर गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात नेमके दोषी कोण, हे ते सांगू शकले नाहीत. आपण सत्तेवर नसल्याने भारताने पाकिस्तान सरकारला दिलेला पुरावा आपल्या पाहण्यात आलेला नाही, पण तरीही पाकिस्तान सरकारने भारताला सहकार्य करायला हवे, असे ते म्हणाले. मुंबईच्या हल्ल्याबद्दल पाकिस्तानला दोषी धरले तर लाहोरच्या हल्ल्याबद्दल मी भारताला दोषी धरू का, असेही त्यांनी विचारले. आपल्या आधीच्या भाषणात ज्यांनी एकमेकांना सतत दोष देऊ नका, असे म्हटले, तेच लाहोरमधल्या हल्ल्यात भारताचा सहभाग आहे असे आपण म्हणायचे का, असा सवाल करत होते, हे विशेष! प्रख्यात कायदेपंडित सोली सोराबजी यांनी दाऊद इब्राहिमला भारताच्या हाती सोपवून चांगले वातावरण तयार करायला तुम्ही मदत का करत नाही, असा प्रश्न केला तेव्हा मुशर्रफ यांनी दिलेल्या उत्तराने त्या प्रश्नाचे गूढ आणखीनच वाढवले. ‘ तो पाकिस्तानात आहे किंवा नाही, याची माहिती आपल्याला नाही आणि समजा तो असेल आणि त्याला तुमच्या हवाली, केले तरी प्रश्न सुटणार नाही,’ असे ते म्हणाले. मग थोडे थांबून ते म्हणाले, ‘दाऊदला तुमच्या हवाली केले तरी भारत - पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारणार नाहीत. आणि त्यात अपयश आले तर तुम्ही त्याला आमच्याकडे परत देऊन टाकाल!’ दाऊद पाकिस्तानात आहे की नाही, याची माहिती नाही, असे म्हणत मुशर्रफ यांनी तो पाकिस्तानात असल्याचीच जवळपास ही कबुलीच देऊन टाकली. आणखी एका प्रश्नातही त्यांची अशीच गोची झाली. डेव्हिड सँगर या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या प्रतिनिधीने अलीकडेच लिहिलेल्या ‘द इनहेरिटन्स’ या पुस्तकात मुशर्रफ यांच्या दुटप्पी खेळीवर प्रकाश टाकला आहे. बुश प्रशासनात राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक मायकेल मॅक्कॉनेल यांना बुश यांनी ‘परवेझ मुशर्रफ आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी हे दोघेही दहशतवादाविरुद्धच्या लढय़ात बाजूने आणि विरोधी अशा दोन्ही भूमिका बजावतात का’, ते तपासून पाहायला सांगितले होते, असे सँगर यांनी या पुस्तकात म्हटले आहे. मॅक्कॉनेल यांच्या कार्यालयाने त्याचे उत्तर शोधून काढण्यात फार वेळ दवडला नाही. कयानी हे तेव्हाच्या बुश प्रशासनात ‘व्हाइट हाऊस’च्या जवळचे होते आणि त्यांनी तालिबानांचा एक नेता मौलवी जलालुद्दीन हक्कानी याच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या चर्चेचा पुरावाच मॅक्कॉनेल यांच्या कार्यलयाने पुढे आणला. त्यात कयानी यांनी जलालुद्दीनला म्हटले, ‘पाकिस्तानच्या दृष्टीने तुम्ही (म्हणजे तालिबानी) आमची मालमत्ता आहात!’ त्यावर सँगर यांनी पंचवीस वर्षांपूर्वी अमेरिकेच्याही दृष्टीने हक्कानी ही ‘मालमत्ता’च होती, असे नमूद केले आहे. कम्युनिस्ट सोव्हिएत फौजांनी अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यावर हक्कानीवर अमेरिकेने अशा तऱ्हेने हक्क सांगितला होता, हेही सँगर यांनी स्पष्ट केले आहे. वृत्तवाहिनीच्या एका निवेदकाने जेव्हा हा संदर्भ देऊन मुशर्रफ यांना प्रश्न केला तेव्हा मात्र कयानी यांच्याकडून ‘असा दूरध्वनी हक्कानीला करण्यात आला असेल तर त्याचे पुरावे पुढे आणले गेले पाहिजेत,’ असे आव्हान त्यांनी दिले. अर्थात भारतात या पत्रकाराला असे आव्हान देऊन काही उपयोग नव्हता. सँगर यांच्या या कपोलकल्पित कथा आहेत, असे त्यांनी यापूर्वी पाकिस्तानात म्हटले होते, पण पुढे त्यांनीही हा प्रश्न स्वाभाविकच फार ताणला नाही. पाकिस्तानात स्वात, बजौर, वझिरीस्तानमध्ये जे काही घडते आहे, ते लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नगण्य प्रकार आहेत, त्यावरून संपूर्ण पाकिस्तान तालिबानांच्या वा अल काईदाच्या ताब्यात जाईल, असे म्हणण्यात अर्थ नाही, एवढाच काय तो मुशर्रफ यांनी दिलेला दिलासा आहे. राजकीयदृष्टय़ा पाकिस्तानचा ताबा तालिबान घेऊ शकणार नसले आणि तरीही तो कर्करोगाप्रमाणे पाकिस्तानी शरीरात पसरणार असेल, तर त्यापासून भारताला आणि जगाला धोका आहे. अफगाणिस्तानात असणाऱ्या भारतीय व्यापारी कचेऱ्या आणि काबूलचा दूतावास यांचा वापर पाकिस्तानविरोधात केला जातो, हा मुशर्रफ यांचा आरोपही जुनाच आहे. चिखलफेक करू नका, दोषारोप टाळा, असे प्रवचन देताना मुशर्रफ यांनीही वेगळे काही केले नाही. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांचीच फक्त काळजी त्यांनी वाहिली. तिथल्या राजकीय परिस्थितीबाबत आणि स्वत:च्या सत्तेवर परतण्याच्या शक्यतेवर त्यांनी बोलायचे टाळले. आपण गप्प बसून राहू शकत नाही आणि पाठीवर गोळ्या झेलणाऱ्यांतले आपण नाही, हे स्पष्ट करताना आपल्या मनातली खदखदही ते थोपवू शकले नाहीत. एकूणच बुद्धिवाद्यांच्या मेळाव्यात त्यांनी पूर्वीची ती चमक दाखवली तरी आग्रा शिखर परिषदेनंतरच्या काळात दोन्ही देशांमधून पाणी बरेच वाहून गेले आहे, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे होते.