Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

काँग्रेसशी युती तुटल्यानंतर समाजवादी पार्टीने राष्ट्रीय लोकदलाशी युती केली. नवी दिल्लीत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उभय पक्षांतील ऐक्याची ग्वाही देताना सपाचे नेते मुलायमसिंह यादव आणि अमर सिंग हे राष्ट्रीय लोकदलाचे नेते यशवीर सिंग आणि वीरेंद्र सिंग यांच्यासह.

पिंकी उतरणार ‘दलित फ्रंट’च्या प्रचारात!
लखनऊ, ८ मार्च/पी.टी.आय.

‘स्माइल पिंकी’ या लघुपटाने जगभर नावाजली गेलेली पिंकी सोनकर लोकसभा निवडणुकीत ‘नॅशनल दलित फ्रंट’च्या बाजूने प्रचारात उतरणार आहे. ‘नॅशनल दलित फ्रंट’ (एनडीएफ)चे प्रवक्ते उदित राज यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील मायावती सरकारचा बुरखा फाडून ते प्रत्यक्षात दलितविरोधी कसे आहे, हे आम्ही पिंकीच्या माध्यमातून उघड करणार आहोत. पिंकी दलित आहे आणि आपल्या समाजासमोरील प्रश्नांची तिला चांगली जाण आहे.त्यामुळे आमच्या प्रचारसभांमध्ये तिचा सहभाग असणार आहे. दलितांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबाबतचे आपले अनुभव ती सभांमधून मांडणार आहे, असे राज यांनी सांगितले.

धर्माच्या आधारावर मते न देण्याचा इस्लामी तत्त्वपीठाचा फतवा!
नवी दिल्ली, ८ मार्च/पी.टी.आय.

मुस्लिमांनी मतदान अवश्य करावेच पण धर्माच्या आधारावर मते देऊ नयेत, असा क्रांतिकारी फतवा दारूल उलूम देवबंद या मुस्लिम विद्वत्सभा म्हणून नावाजलेल्या तत्त्वपीठाने काढला आहे.
प्रत्येकाने मत देताना पक्ष आणि नेत्याच्या कार्याचे यथायोग्य परीक्षण करावे तसेच इस्लामी तत्त्वांच्या आधारेही त्याला जोखावे, असेही ‘देवबंद’ने म्हटले आहे. मत म्हणजे एकप्रकारे उमेदवाराच्या तपासणीत साक्ष देणेच आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराची निवड हे कर्तव्यच आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.

पुना मसाला..
हाती कथलाचा वाळा..

निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. मग गल्ली ते दिल्लीतील राजकारणावरच्या गप्पांपासून ‘बापूं’पर्यंत विषय चर्चीले जातात. काही मंडळी विशिष्ट विचारांनी प्रेरित असल्याने ते पक्षनिष्ठेने काम करतात तर काहींच्या निष्ठा कामावर ठरतात. निवडणुकीतील ‘बापूं’चा संचार हा अनेकांना ‘जीवनसत्त्व’ देणारा ठरतो. ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या प्रयोगात पुण्यात एक बिल्डर निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावू पाहत आहेत. या बिल्डरभोवती संबंधित पक्षासह अन्य कार्यकर्त्यांचा गोतावळा गोळा झाला आहे.

माकप िदडोरी, पालघरमधून लढणार प. बंगालसाठी ३२ उमेदवार जाहीर
नवी दिल्ली, ८ मार्च/खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आज माकपने महाराष्ट्रातून िदडोरी (अ.ज. राखीव) लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडु गावित, तर पालघर (अ. ज. राखीव) मतदारसंघातून लहानू शिवडा कोम यांची उमेदवारी जाहीर केली. आज ए. के. गोपालन भवन येथे पार पडलेल्या माकपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत माकपने ५९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात पश्चिम बंगालमधील ३२, बिहारमधील ५, आसाम, राजस्थानमध्ये प्रत्येकी ३, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, त्रिपुरामध्ये प्रत्येकी २, अंदमान आणि निकोबार, छत्तीसगढ, हरयाणा, हिमाचल, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील ३२ उमेदवारांमध्ये लोकसभेतील माकपचे गटनेते वासुदेव आचार्य, मोहम्मद सलीम, तारीत बरन तोपदार, हन्नन मोलाह, रुपचंद पाल, ज्योतिर्मय सिकदर या विद्यमान खासदारांसह १२ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. यात दोन महिला उमेदवारांनाही माकपने संधी दिली आहे.

तिसऱ्या आघाडीत जल्लोष!
नवी दिल्ली, ८ मार्च/खास प्रतिनिधी

बिजू जनता दलाने भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पटनाईक यांनी भाजपशी संबंधविच्छेद करताच डाव्या आघाडीने त्यांच्या अल्पमतात आलेल्या सरकारला समर्थन जाहीर करीत मैत्रीचा हात पुढे केला आहे. बिजू जनता दल चालू आठवडय़ाअखेर तिसऱ्या आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. बिजू जनता दलाला भाजपपासून तोडण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माकप नेत्यांनी रचल्याचे म्हटले जात आहे. माकपचे पॉलिटब्युरो सदस्य सीताराम येचुरी पटनाईक यांची भेट घेण्यासाठी आज भुवनेश्वरला रवाना झाले.

टिळक भवनात राडा
कलमाडी-मोहन जोशी समर्थक भिडले..
मुंबई, ८ मार्च/ खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच आज टिळक भवनात पुण्याचे काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी आणि मोहन जोशी यांच्या समर्थकांमध्ये तिकीटावर जोरदार हाणामारी झाली. सुरेश कलमाडी यांना पुन्हा उमेदवारी देण्याला मोहन जोशी समर्थकांनी विरोध केला तर कलमाडी समर्थकांनी ‘कलमाडी झिंदाबाद’चे जोरदार नारे देण्यास सुरुवात केल्यानंतर हाणामारी सुरू झाली. अखेर पोलिसांना बोलावून हा गोंधळ शांत करावा लागला. या साऱ्या गोंधळात टिळक भवनाला रणांगणाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर संतापले तर टी. एम. यांचे सोनियांना साकडे!
बंधुराज लोणे, मुंबई, ८ मार्च

अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगितले जात आहे, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी याचा इन्कार केला असून आमच्यासाठी जागा सोडणारे काँग्रेस कोण ? असा सवाल त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे नेते टी. एम. कांबळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन लातूरच्या जागेसाठी त्यांना साकडे घातले आहे. काँग्रेसला बोलणी करायची असेल तर काँग्रेस -तृणमूल काँग्रेसचा फार्मुला वापरला पाहिजे, अशी प्रकाश आंबेडकर यांची अट आहे.

उदयनराजे भोसले ‘राष्ट्रवादी’च्या उंबरठय़ावर?
पवार यांची पुण्यात घेतली भेट!
पुणे, ८ मार्च / खास प्रतिनिधी
माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पुण्यात भेट घेतल्याने साताऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सातारा लोकसभेच्या जागेसाठी उदयनराजे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा असून ‘राष्ट्रवादी’कडून त्यांची उमेदवारी लवकरच निश्चित होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले.

कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीत जोरदार खडाखडी सुरू
मुंबई, ८ मार्च/ खास प्रतिनिधी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव मंडलीक यांच्या विरोधात मुन्ना महाडिक शड्डू ठोकून उभे असले तरी काँग्रेसचे युवा नेते राहूल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शाहू साखर कारखान्यातील भेटीनंतर विक्रमसिंह घाडगे यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आले असून जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये या नावासाठी एकमत होऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सुषमा स्वराज विदिशा मतदार संघातून
भोपाळ, ८ मार्च/पीटीआय

विदिशा लोकसभा मतदार संघातून भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपतर्फे ही जागा नेहमी बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देऊन लढविण्यात येते. यापूर्वी ही जागा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लढविली होती.
१९६७ सालच्या निवडणूकीत भाजपने या जागेवरुन पंडित शिव शर्मा यांना तर १९७१ मध्ये रामनाथ गोएंका यांना तिकीट देऊन ही जागा आपल्याकडे खेचली होती. येथील नागरिकांना केवळ १९७७च्या निवडणूकीत राघवजी हे स्थानिक खासदार लाभले होते. १९८० आणि १९८४मध्ये भाजपला ही जागा स्थानिक उमेदवारांना उभे केल्याने गमवावी लागली होती. १९८९मध्ये राघवजी यांनी पुन्हा विजय नोंदविल्यानंतर १९९१मध्ये ही जागा अटल बिहारी वाजपेयी यांनी या जागेवर विजय नोंदविला होता. भाजपच्या दृष्टीने बाहेरच्या उमेदवारांसाठी सर्वाधिक लाभदायक मानल्या जाणाऱ्या या जागेची धुरा यंदा महासचिव सुषमा स्वराज यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अम्मा वापरणार ज्योतिष शास्त्राचा फॉम्र्युला
चेन्नई, ८ मार्च/वृत्तसंस्था

तामिळनाडूमध्ये काँग्रस अण्णा द्रमुकशी युती करण्यास उत्सुक नसल्याने विजयासाठी द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी ज्योतिष शास्त्राचा फॉम्र्यूला वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जयललिता इच्छुक उमेदवारांचा भविष्यातील ग्रहमानाचा अंदाज घेऊन त्या उमेदवाराला कोणत्या जागेचे तिकिट द्यायचे याचा निर्णय घेणार आहेत. अम्मांच्या नव्या फॉम्र्यूल्यानुसार द्रमुकच्या उमेदवारांनी त्यांना आपल्या जन्मपत्रिका कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. अम्मांचा हा फॉम्र्यूला यशस्वी ठरेल असा विश्वास द्रमुकेचे नेते आर राजन यांनी सांगितले. तर अम्मा आमच्या आणि पक्षाच्या भल्यासाठीच नवा फॉर्मूला वापरत आहेत. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही देखील प्रयत्नांची पराकाष्टा करु असे एम.डी. बाबू यांनी सांगितले. २००४च्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये द्रमुकला तामिळनाडू आणि पॉण्डीचेरी येथे एकाही जागेवर विजय निश्चित करता आला नव्हता. या वेळी अम्मांचा हा नवा फॉम्र्यूला काय रंग दाखवेल हे थोडय़ाच दिवसांत स्पष्ट होईल.

नगमा, गोविंदा उत्तर -पश्चिम मुंबईसाठी आग्रही
मुंबई, ८ मार्च/ खास प्रतिनिधी

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी रांग आहे. छाननी समितीसमोर कृपाशंकर सिंग, संजय निरुपम, उद्योगपती विजय कलंत्री यांच्यासह चित्रपट अभिनेता व शेजारील उत्तर मुंबईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गोविंदा व चित्रपट अभिनेत्री नगमा यांनी मुलाखती दिल्या. गेली पाच वर्षे खासदार म्हणून शून्य कामगिरी असणाऱ्या गोविंदा यांना आता उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे वेध लागले आहेत. तर नगमा हिला आपणच या मतदारसंघातून निवडून येऊ, असा विश्वास वाटत आहे. एकूणच मुंबईत काँग्रेसमध्ये सर्वाधिक मागणी या मतदारसंघातच आहे.

सेना-भाजप युतीची घोषणा कोणत्याही क्षणी..
मुंबई, ८ मार्च/ खास प्रतिनिधी

लालकृष्ण अडवाणी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे वदवून घेण्यात भाजप नेत्यांना यश आल्यामुळे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही आज ठणठणीत बरे होऊन लीलावती रुग्णालयातून घरी परतल्यामुळे शिवसेना-भाजप युतीबाबत गेल्या काही दिवसात निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकून येत्या एक-दोन दिवसांत सेना-भाजप युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सेना नेते मनोहर जोशी, भाजप प्रदेशचे अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. सेना-भाजपमध्ये जागावाटपात वादाच्या ठरलेल्या दक्षिण मुंबई, कल्याण आणि यवतमाळ या जागा शिवसेनेला देण्यास भाजपने तयारी दाखविल्याचे या सूत्रांचे म्हणणे असून त्याबदल्यात भिवंडीची जागा देण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी व शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यात जागावाटपाची बोलणी अंतीम टप्प्यात असताना शिवसेनेच्या ‘बोरूबहाद्दरां’ नी जागावाटप झाल्याचे जाहीर केले तसेच विशिष्ट परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी मराठी माणूस म्हणून शिवसेना शरद पवार यांना पाठिंबा देऊ शकते असे जाहीर केले. या वक्तव्यामुळे भाजप नेते कमालीचे दुखावले गेले आणि नितीन गडकरी यांनी शिवसेनेला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. अडवाणी यांच्याबाबत स्पष्ट भूमिका नसेल तर शिवसेनेने युती तुटल्याचे जाहीर करावे, असे गडकरी यांनी ‘रोखठोक’ बजाविल्यानंतर शिवसेना वरमली. अडवाणी हेच पंतप्रधानपदाची उमेदवार असतील व पुढील पाच वर्षे युती कायम राहील, असे शिवसेना नेत्यांनी सांगितल्यानंतर जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली. गेल्या महिन्यातच शिवसेनेत गेलेले जळगावचे सुरेशदादा जैन यांनीही यात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते.

पटनायक सरकारचा बुधवारी विश्वासदर्शक ठराव
भुवनेश्वर, ८ मार्च/पीटीआय

भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने अल्पमतात गेलेले ओरिसातील नवीन पटनायक सरकार येत्या बुधवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. दरम्यान नवीन पटनायक यांनी राज्यपाल एम. सी. भंडारी यांची भेट घेऊन आपल्या सरकारला ७६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. दरम्यान पटनायक सरकारला पाठिंबा देण्यासाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष आता पुढे सरसावले आहेत. ओरिसा विधानसभेची सदस्यसंख्या १४७ आहे. माकप व भाकपचा प्रत्येकी एक आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार व झारखंड मुक्ती मोर्चाचे चार आमदार व सात अपक्ष आमदार अशांनी आज नवीन पटनायक यांच्यासोबत राज्यपाल भंडारी यांची आज भेट घेतली व आमचा या सरकारला पाठिंबा असल्याचे सांगितले. लोकसभा व विधानसभा जागावाटपाची बोलणी असफल ठरल्यानंतर भाजपने ओरिसातील नवीन पटनायक सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता व या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती. मात्र आपल्या सरकारला कोणताही धोका नाही असा दावा नवीन पटनायक करीत आहेत. त्यातूनच त्यांनी येत्या बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ नांदवळमधून
सातारा, ८ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार माढा मतदारसंघातील प्रचाराची सुरुवात दि. १२ मार्चपासून करणार आहेत. सातारा जिल्ह्य़ातील नांदवळ, ता. कोरेगाव हे पवारांचे मूळ गाव आहे. तेथील ग्रामदेवतेच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फुटणार आहे. स्वत: शरद पवार हे जाहीर सभेत भाषण करून त्यानंतर वडूज, म्हसवड येथे निघणाऱ्या रॅलीत सहभागी होतील.