Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
लोकमानस

ऑस्कर समितीने आजवरचे कठोर संकेत बाजूला सारले आहेत..

‘प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते’ हे वाक्य आता प्रेमात, युद्धात आणि यशात सर्व क्षम्य असते असे लिहिण्यास काही हरकत नाही. ‘स्लमडॉग मिलिऑनर’चे भारतीय यश सर्वत्र दुमदुमत आहे. गेली अनेक वर्षे मी उत्तमोत्तम इंग्लिश आणि हिंदी चित्रपट पाहात आलो आहे. जॉन फोर्ड,

 

डेव्हिड लीन, फ्रँक काप्रा, त्रुफाँ, बर्गमनपासून ते पुढील काळातील कोपोला, स्पीलबर्ग, स्कॉर्सिसी, रॉन हॉवर्ड, नॉर्मन ज्यूसन या प्रतिभावान दिग्दर्शकांच्या चित्रकृती पाहाण्याचे भाग्य लाभले आहे. अनेक वर्षे दूरदर्शनवर ‘ऑस्कर’ सोहळादेखील पाहतो आहे. सोमवारी २३ तारखेला जवळपास प्रत्येक चॅनेलवर ‘स्लमडॉग’च्या यशाचे कौतुक भरभरून वहात असताना रात्रीच ‘स्लमडॉग’ पाहिला आणि धक्काच बसला. या टुकार चित्रपटाला चक्क आठ ऑस्कर्स? जरा गरगरायला झाले! आतापावेतो चित्रपटाच्या दर्जाबाबत तडजोड न स्वीकारण्याची सवय ऑस्कर समितीनेच लावली होती. प्रसंगी निर्णय वादग्रस्त ठरला तो दोन चांगल्या चित्रपटांतून एकाची निवड झाल्यामुळेच. पण भिकार चित्रपटाला नामांकनदेखील कधी मिळाल्याचे आठवत नाही.
या चित्रपटात भारतातील दारिद्रय़ाचे दर्शन घडवले आहे, ते मुळीच आक्षेपार्ह नाही. गेली अनेक वर्षे आमच्या राजकारण्यांनी कष्टपूर्वक हे दारिद्रय़ जपलेले आहे. ‘स्लमडॉग’चा विचार निर्मितीमूल्यांच्या दृष्टीने करायला हवा. या चित्रपटात अनेक घटनांची वेगवान तुकडेजोड आहे. काही वेळा ‘डॉक्युमेंटरी’ तंत्राचा वापर आहे. क्वचितच एखादे दृश्य लांबीचे आहे. यातील रंगसंगती आणि प्रकाशयोजना डोळ्यांना त्रास देणारी आहे. ‘क्लोजअप’चा अतिरेक आहे. कुठलीच व्यक्तिरेखा सलग मनावर ठसत नाही. नायक जमाल करोडपती बनला यात काही भानगड असल्याच्या संशयावरून त्याचे हालहाल करून पोलीस चौकशी करत आहेत. यावेळी ते ‘करोडपती’ कार्यक्रमाचे रेकॉर्डेड दृश्यदेखील पाहात असतात. मग ते त्याला (का कोण जाणे) सोडूनही देतात. चित्रपटातील ‘डॉक्युमेंटरी’ तंत्र प्रभावी ठरत नाही. (याच तंत्राने ‘एमआयटी हार्ट’ हा चित्रपट प्रभावी झाला आहे.) ‘स्लमडॉग’ चित्रपट कानठळी गोंगाटाने (संगीत?) भरलेला आहे. शेवटच्या ‘जय हो’ गाण्याचे शब्द (बिचारे गुलजार) वाद्यांच्या गोंगाटात हरवून जातात. या व्हॉल्यूममध्ये लता किंवा भीमसेन यांची नुसती कल्पना करून पाहावी. रहमान हा प्रतिभावान संगीतकार आहे. त्याच्या प्रतिभेचा प्रत्यय (या गोंगाटामुळे) येत नाही.
ऑस्कर समितीने निवडीबाबतचे आतापर्यंतचे कठोर संकेत बाजूला सारले आहेत हे जाणवले. याची कारणे अर्थातच अज्ञातच राहणार. ‘स्लमडॉग’बद्दल माझ्यासारखेच अनेकांचे मत असेल याबद्दल मला शंका नाही, पण ‘स्लमडॉग’विषयी कौतुकाचा जो पूर आला आहे यामध्ये हे मतप्रदर्शन कदाचित वाहून जाईल.
जाता जाता, काही दिवसांपूर्वी मी व्हीसीडीवर ‘वेन्सडे’ हा नीरज शहाचा चित्रपट पाहिला. असा चित्रपट माझ्या देशात बनतो याचे मला कौतुक आणि अभिमान वाटला. असो.
प्रभाकर कृष्णाजी, ठाणे

मनुष्य अजूनही जंगलीच!

अलीकडे वाढत्या वणव्यामुळे जंगलामधील मौल्यवान संपत्ती मोठय़ा धोक्यात आली आहे. जंगल घनदाट कुठे न राहिल्यामुळे हे वणवे सहसा घर्षणामुळे होत नाहीत. ते बहुधा मानवनिर्मित असतात. नैसर्गिक नसतात. लाकूडतोडीच्या उद्देशाने जंगलातील कासव, घोरपड, ससे, मुंगूस, रानडुक्कर, हरीण इत्यादींच्या शिकारीसाठी तसेच जमीन भाजलेल्या जागी शेती करण्यासाठी वनाला आगी लावून मोक्याच्या जागी जाळी मांडून पशुधन एकवटले जाते. औट घटकेच्या मजेखातर पर्यावरणाची किती राख होते, ह्य़ाचा विचार केला जात नाही. वनखाते त्याबाबतीत सुस्त आहे, पण इतरही मुळीच जागृत नाहीत; त्याचा अनुभव असा- गेल्या आठवडय़ात वसईवरून तलासरीला हायवेने जात होतो. रस्त्यात मनोरजवळील मेंढवण घाटात जंगलातील गवताला आग लावली होती. आम्ही फिरत्या पोलिसांच्या ते लक्षात आणून दिले. त्यांनी बेजबाबदारपणे उत्तर दिले, आम्ही रस्त्यावरच्या वाहनांचे पहारेकरी आहोत. जंगलाशी आमचा संबंध नाही. पुढे नाक्यावरील चौकीत सांगण्यात आले, तुम्ही वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. तेव्हा काय बोलावं! मनुष्यप्राणी अजूनही जंगलीच, दुसरं काय!
फादर अ‍ॅलेक्स तुस्कानो, वसई

डॅनी बॉयलचा परदेशी काळा चष्मा

‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाविषयी सध्या सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान या चित्रपटाने आठ ऑस्कर पुरस्कार मिळविले. त्या सर्व भारतीय पारितोषिक विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
मुंबईतील झोपडपट्टीवर आजवर अनेक चित्रपट निघाले. त्यातील ‘चक्र’ हा लक्षात राहण्याजोगा चित्रपट होता. त्याच्या पाश्र्वभूमीवर ‘स्लमडॉग मिलिऑनर’चा विचार केला तर फारसे काही नवे दिसत नाही.
मुंबईच्या झोपडपट्टीतील बकाल जीवन, तेथील लोकांची होणारी ससेहोलपट, तंटे-बखेडे हा सारा मसाला. मात्र या साऱ्यांचे चित्रण या चित्रपटात अतिशय खुबीने केले आहे. त्याचे श्रेय चित्रपटाच्या संकलकाला जाते. या चित्रपटात झोपडपट्टीतील माणसांची कुतरओढ, संघर्ष, प्रेमप्रसंग यांचे चित्रण आकर्षक मुखवटा चढवून सादर केले आहे.
‘स्लमडॉग’मध्ये झोपडपट्टीतील मुलांना त्यांचे डोळे फोडून शिक्षा मागण्याच्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलले जाते, याचे चित्रण केले आहे. तसेच त्या मुलांचे उत्पन्न हडप करणारा झोपडपट्टीदादाही दाखविला गेला आहे. पण असा प्रसंग चाळीस वर्षांपूर्वी राजा परांजपे यांच्या गाजलेल्या चित्रपटात दाखविला गेला आहे. या चित्रपटातील ग. दि. माडगूळकरांची गाणी सुधीर फडके यांचे संगीत लाभल्यामुळे अजरामर झाली आहेत. पुढील अनेक शतके ही गाणी अजरामर राहतील, पण ‘जय हो’चे काय? हे ‘स्लमडॉग’मधील ऑस्कर पारितोषिक विजेते गाणे किती वर्ष टिकेल याची काही शाश्वती नाही, हे तुम्ही-आम्हीही जाणतो. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ हा भारतीय कलावंत असलेला परदेशी निर्माता- दिग्दर्शकाने बनविलेला चित्रपट आहे, याची सर्व भारतीयांनी नोंद घेतली पाहिजे.
काही वर्षांपूर्वी जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारतीय तरुणींना विजेते क्रमांक देऊन भारताचा गौरव केला गेला आणि आता भारतातील, विशेषत: झोपडपट्टीतील दारिद्रय़, पशुवत जिणे, मानवजातीची अवहेलना या सर्व गोष्टींचे जाहीर प्रदर्शन करून त्या भांडवलावर आपली ऑस्कर पारितोषिकाची पोळी भाजून घेण्याचे काम डॅनी बॉयल यांनी केले आहे. आपल्या झोपडपट्टी जीवनाचे नागडे-उघडे दर्शन म्हणजे आपली संस्कृती आणि नीतिमत्ता नव्हे. नाइलाजाने त्या माणसांवर पशुवत जगण्याची पाळी आलेली आहे. यावर कळस म्हणजे महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट ‘करमुक्त’ म्हणून घोषित केला. म्हणजे बरेच निर्माते यापुढे अशाच पठडीतले चित्रपटनिर्मितीकडे वळतील.
खरे पाहिले तर डॅनी बॉयल यांनी आपल्या डोळ्यांवरचा ‘परदेशी काळा चष्मा’ काढून या सुंदर सर्वगुणसंपन्न मुंबईकडे पाहिले असते तर त्यांना या शहराचे न पाहिलेले स्वरूप पाहता आले असते. जगातल्या प्रमुख शहरांत ‘मुंबई’ शहराची गणना का केली जाते याचे कोडेही उलगडता आले असते.
रमाकांत चव्हाण, मुंबई