Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

आज की नारी..
सातारा येथील श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त दुचाकीस्वार महिलांची रॅली काढण्यात आली.

मंडलिक समर्थकांचा आग्रह खासदारपुत्रासाठी
कोल्हापूर, ८ मार्च / विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचा आखलेला मुलाखतींचा कार्यक्रम अवघ्या ४८ तासांवर येऊन ठेपला असताना विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या गटाने नवा पर्याय म्हणून खासदारपुत्र प्रा. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचा नवा प्रस्ताव पुढे आणला आहे. या प्रस्तावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात श्रेष्ठींपुढे एक नवा पेच तयार झाला असून जिल्हा राष्ट्रवादीचे राजकारण एका नव्या वळणावर आले आहे.

बारामतीकरांची परतफेड ४२ वर्षांनंतर
सोलापूर, ८ मार्च/जयप्रकाश अभंगे

बारामतीने १९६७ मध्ये सोलापूरच्या स्वातंत्र्यसेनानीस संसदेवर पाठविले. आता त्याची परतफेड ४२ वर्षांनी सोलापूरकरांना माढय़ातून बारामतीच्या शरद पवार यांना संसदेवर पाठवून करण्याची संधी प्राप्त झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील राजकारण बदलणार असून, जिल्ह्य़ाच्या विकासाला निश्चित गती मिळणार आहे.

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या उंबरठय़ावर
पुणे, ८ मार्च / खास प्रतिनिधी

माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पुण्यात भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या भेटीमुळे साताऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून सातारा लोकसभेच्या जागेसाठी उदयनराजे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे.

पोलीस ठाण्यासमोरच उडाली सेना-राष्ट्रवादी गटांची धुमश्चक्री
अठ्ठावीस जणांवर गुन्हा

इचलकरंजी, ८ मार्च / वार्ताहर

किरकोळ कारणावरून हातघाईवर गेलेल्या प्रकरणावर पडदा टाकून पोलिस ठाण्यातून बाहेर पडतानाच जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर व रेंदाळचे शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटातील धुमसणारा वाद उफाळून आला. दोन्ही गटात तुफान धुमश्चक्री उडाली. चाकू, चॉपर, काठय़ा यांचा सर्रास वापर करण्यात आला.

कोल्हापुरात काही भागात पाणी नाही
कोल्हापूर, ८ मार्च / प्रतिनिधी

साळोखेनगर आणि कळंबा जलशुध्दीकरण केंद्रानजीक या दोन ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) शनिवारी भरल्याच नाहीत. परिणामी साळोखेनगर, कळंबा, रामानंदनगर, पाचगाव या परिसरास आज पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच होऊ शकला नाही.

कोडोलीतील बंद केलेली नग्नपूजा पुन्हा सुरु
कोल्हापूर, ८ मार्च / विशेष प्रतिनिधी

आशिया खंडात पहिले संगणक गाव म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या वारणानगर पासून हाकेच्या अंतरावर कोडोली येथे अंबाबाईच्या मंदिरात सुरू असलेली स्त्रियांची नग्नपूजा कायद्याने बंद करावी, अशी मागणी कोल्हापुरात विज्ञानप्रबोधिनीने केली आहे.

उमेदवारीवर उद्या निर्णय
सातारा, ८ मार्च / प्रतिनिधी

काँग्रेसनेते, माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची पुणे येथे बारामती होस्टेलमध्ये भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली असून, मुंबई येथे पक्षाच्या संसदीय मंडळाच्या मंगळवारी १० मार्चला होणाऱ्या बैठकीत याबाबत फैसला होणार आहे.
उदयनराजेंनी शनिवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात बुद्धिवादी नागरिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावून उमेदवारीबाबत जनमताचा कौल मागण्याचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये त्यांनी अपक्ष, काँग्रेस, बसपामधून सातारा लोकसभा लढविण्याची मागणी झाली मात्र बहुसंख्यांचा कल स्वाभिमानाला धक्का न लावता राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज प्रथमच उदयनराजेंनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. या मागणीचा विचार संसदीय मंडळाच्या बैठकीत मंगळवारी होऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे व त्याच वेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे विद्यमान कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीच्या जिल्हा कमिटीकडे सादर केला आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार लक्ष्मणराव पाटील व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे पक्षाने इच्छुक आहेत.

नांदवळमधून पवारांचा प्रचार शुभारंभ गुरुवारी
सातारा, ८ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार माढा मतदारसंघातील प्रचाराची सुरुवात दि. १२ मार्चपासून करणार आहेत. सातारा जिल्ह्य़ातील नांदवळ, ता. कोरेगाव हे पवारांचे मूळ गाव आहे. तेथील ग्रामदेवतेच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फुटणार आहे. स्वत: शरद पवार हे जाहीर सभेत भाषण करून त्यानंतर वडूज, म्हसवड येथे निघणाऱ्या रॅलीत सहभागी होतील. दि. १२ मार्च रोजी फलटण येथे मुक्काम केल्यानंतर दि. १३, १४ व १६ मार्च या दिवशी फलटण, सोलापूर, अकलूज भागात प्रचारानिमित्त जाहीर सभा होणार आहे. मतदारसंघाच्या नवीन पुनर्रचनेनुसार माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्य़ातील फलटण व माण विधानसभा मतदार संघ यांचा समावेश झाला आहे. दहशतवादी व अतिरेकी संघटनेकडून धोका असल्याने शरद पवार यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी अतिउत्साहाला मुरड घालून पवारसाहेबांऐवजी प्रत्येक मतदारांशी संपर्क साधावा व त्यांना बारामतीपेक्षाही जास्त मताधिक्य़ द्यावे, यासाठी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, रामराजे नाईक निंबाळकर, आ. संपतराव अवघडे, सुभाष शिंदे व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सक्रिय झाले आहेत.

श्रीपाद श्रीवल्लभ विशेषांकाचे आंध्रातील पीठापूरला प्रकाशन
सोलापूर, ८ मार्च/वार्ताहर

आंध्र प्रदेशातील पीठापूर येथील दत्तसंप्रदायातील प्रथम अवतार म्हणून गणले गेलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे सचित्र चरित्रदर्शन घडविणाऱ्या सोलापूरच्या अक्कलकोट स्वामीदर्शन विशेषांकाचे प्रकाशन पीठापूर येथे संस्थानचे अध्यक्ष राम सुब्रह्मण्यम आणि सोलापुरातील संत वाङ्मयाचे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. अक्कलकोट स्वामी दर्शनचे संपादक सतीश कुलकर्णी यांनी विशेषांकांच्या प्रती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या प्रतिमा पीठापूर संस्थानला भेट दिल्या. या प्रकाशन सोहळ्याला संस्थानचे सचिव पैडा सत्यनारायण, कार्यालयीन अधिकारी चक्का सत्यनारायण, तसेच सोलापूर, पुणे, बेळगाव येथील भक्त उपस्थित होते. गुरुचरित्र ग्रंथ हा इच्छापूर्ती व ज्ञानप्राप्ती करून देणारा असून, उपासनेने भक्तास सुख, आनंद, समाधान प्राप्त होते, असे सांगून डॉ. कुंटे म्हणाले की, चरित्रग्रंथ सचित्र केल्याने आबालवृद्धांसह सर्वाना गुरुमहात्म्य कळून येण्यास उपयुक्त ठरेल. भक्तांनी पीठापूर येथे दर्शन व उपासनेसाठी आल्यास संस्थानच्या वतीने त्यांची व्यवस्था करण्यात येईल, असे संस्थानचे अध्यक्ष राम सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

डाळिंब उत्पादकांसाठी पॅकेज न दिल्यास आंदोलन
फलटण, ८ मार्च / वार्ताहर

डाळिंब उत्पादकांना पॅकेज त्वरित मिळावे, अन्यायी भारनियमन बंद करावे, बाजारपेठेतील बाजारादिवशी होणारी लूटमार थांबविण्याबाबत योग्य निर्णय घेऊन शेतकरी व बाजारक ऱ्यांची मुक्तता न झाल्यास स्वत: शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येणार आहेत. याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यादव यांनी दिला. या वेळी संघटनेचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष धनंजय महामुलाकर, घाडगे आदी उपस्थित होते.

एन. डी. पाटील यांना जेधे पुरस्कार प्रदान
कोल्हापूर, ८ मार्च / विशेष प्रतिनिधी

देशभक्त केशवराव जेधे पुरस्कार ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांना आज येथे अत्यंत साधेपणाने प्रदान करण्यात आला. जेधे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर मांडण्याची संधी म्हणून स्वीकारत असल्याच्या भावना श्री. पाटील यांनी या वेळी व्यक्त केल्या.
पुण्यातील देशभक्त केशवराव जेधे संस्थेतर्फे पुरस्कार दिला जातो. संस्थेचे अध्यक्ष संताजी प्रतापराव जेधे यांनी पुरस्कारामागची भूमिका सांगून पुरस्कार प्रदान केला. शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सौ.सरोज पाटील यांना संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.ऊर्मिला जेधे यांनी साडी-चोळी देऊन त्यांचा सत्कार केला. श्री.पाटील यांच्या येथील रूईकर कॉलनीतील निवासस्थानी हा अनौपचारिक सोहळा झाला. प्राचार्य टी.एस.पाटील यांनी मानपत्र वाचन केले. सौ.भारती शिवाजीराव सावंत, विजयमाला सावंत, विलास कापरे, सुरेंद्र टिळे, अखिल सुंडके, व्ही. एस. शिवणकर, शिवाजी सावंत, राजेंद्र मकोटे, अजित मगदूम, दिलीपकुमार जाधव उपस्थित होते.

सोलापूर मागास शिक्षक संघटना अध्यक्षाच्या निवडीला हरकत
सोलापूर, ८ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेव सरवदे यांची निवड बेकायदा असून विद्याधर भालशंकर हेच जिल्हाध्यक्ष असल्याचा दावा करीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष शामराव जवंजाळ यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. संघटनेचे जिल्ह्य़ात सुमारे ८०० सभासद शिक्षक असून विद्याधर भालशंकर यांना १३ पैकी १० तालुकाध्यक्षांचा पाठिंबा असताना त्याकडे प्रदेशाध्यक्ष जवंजाळ यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करुन परस्पर अध्यक्षपदी दुसऱ्याची निवड केली. याबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडे दाद मागणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब चंदनशिवे यांनी सांगितले. वेळ प्रसंगी दुसरी संघटना स्थापन करण्याचा इशाराही त्यायंनी दिला. यावेळी संघटनेचे कमलाकर बनसोडे, राजाराम पाटोळे, निशिकांत राजगुरू आदी उपस्थित होते.

‘जिल्हा प्रशासनाने निर्णयावर ठाम राहावे’
कोल्हापूर, ८ मार्च / प्रतिनिधी

नागदेववाडी व शाहूनगर येथील कथीत मशिदीच्या संदर्भात जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असून या संदर्भात ठिय्या आंदोलन करणारे भारत पाटणकर, व हिमायु मुरसल हे सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने आपल्या निर्णयावर ठाम रहावे, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.
‘हिंदी है हम हिंदोस्ता हमारा’ या संघटनेने भारतीय मुस्लिमांचा नमाज पठण करण्याचा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार कोल्हापुरातील जिल्हा प्रशासनाने काढून घेतलेला आहे. असा ठपका ठेवून ९ मार्चपासून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात शिवसेनेचे संजय पवार, भाजपचे महेश जाधव, हिंदु एकताचे दीपक मगदूम, अशोक देसाई, संजय साडविलकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात वक्फ बोर्ड शासनापेक्षा मोठे नाही असे म्हटले आहे. नागदेववाडी आणि शाहूनगर येथे नमाज पठण करण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यात आलेली नाही. म्हणूनच तिथे नमाज पठण करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

डंपर ओढय़ात कोसळून चालक जागीच ठार
शाहूवाडी, ८ मार्च / वार्ताहर

सरूड-वडगाव (ता.शाहूवाडी) दरम्यान डंपर ओढय़ात कोसळून चालक रमेश अर्जुन माळी (वय ३१ रा.मोहरे ता.पन्हाळा) हा जागीच ठार झाला. याबाबत शाहूवाडी पोलिसांनी व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, सरूडकडून माणगाव (ता.शाहूवाडी)कडे उजव्या कालव्यावर जाणारा डंपर (एम.एच. ०६ - ८३०९)थोरातांचे वडगाव दरम्यान असणाऱ्या ओढय़ावरील वळणावर सुमारे पंधरा फूट खोल खड्डय़ात कोसळला. याचा चालक रमेश माळी हा गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. दरम्यान घटनास्थळावर डंपर हा भरधाव वेगाने होता. यामुळे चालकाचा ताबा सुटून हा अपघात घडला असल्याची चर्चा होती. अधिक तपास सहायक फौजदार रामचंद्र गिरी, जहाँगीर शेख करीत आहेत.

मुलीचा हौदात बुडून मृत्यू
इचलकरंजी, ८ मार्च / वार्ताहर

रिया प्रकाश दडमणी (वय २ रा.रेणूकानगर झोपडपट्टी) या मुलीचा हौदातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. रिया ही खेळता खेळता गायब झाली. तिचा शोध नातेवाईकांनी घेण्यास सुरूवात केली. तेव्हा शेतातील मगदूम यांच्या यंत्रमाग कारखान्याच्या हौदात तिचा मृतदेह आढळला. तिला आयजीएम रूग्णालयात नेण्यात आले पण वैद्यकीय सूत्रांनी तिचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

सोलापुरात दोन दिवस वकिलांची परिषद
सोलापूर, ८ मार्च/प्रतिनिधी

विधी अभ्यासक्रमासाठी यशस्वी मार्गदशर्नाने अनेक वकील निर्माण करणाऱ्या सोलापूरच्या आळंगेज् लॉ क्लासेसच्या वतीने दि.१० व ११ रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागील मराठा मंदिराच्या सभागृहात वकील परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. व्ही. एस. आळंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. या परिषदेचे उद्घाटक बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे सदस्य अ‍ॅड. राम गरड हे असून सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. जगदीश परदेशी हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कायद्याविषयक बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या वेळी अ‍ॅड. आळंगे यांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.