Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

शिवसेनाप्रमुख पुन्हा ‘मातोश्री’वर
मुंबई, ८ मार्च/ खास प्रतिनिधी

गेले दहा दिवस लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती आता ठणठणीत असल्यामुळे आज त्यांना घरी जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली. त्यामुळे बाराच्या सुमारास शिवसेनाप्रमुख लीलावतीमधून मातोश्रीवर पोहोचले. ताप व खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे शिवसेनाप्रमुखांना २६ फेब्रुवारी रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरूवातीला त्यांना आसीसीयूत दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या केलेल्या चाचण्या नॉर्मल आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी त्यांना आयसीसीयूतून बाहेर हलविण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे राजकीय नेते तसेच मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर शिवसैनिकांनी त्यांची प्रकृती उत्तम व्हावी यासाठी देवाला साकडे घातले होते. शिवसेनाप्रमुखांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले होते. आता शिवसेनाप्रमुख घरी परतल्यामुळे सेना-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होईल.

शिवसेना-भाजप युतीची घोषणा कोणत्याही क्षणी..
मुंबई, ८ मार्च/ खास प्रतिनिधी

लालकृष्ण अडवाणी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे वदवून घेण्यात भाजप नेत्यांना यश आल्यामुळे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही आज बरे होऊन लीलावती रुग्णालयातून घरी परतल्यामुळे शिवसेना-भजप युतीबाबत गेल्या काही दिवसात निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकून येत्या एक-दोन दिवसांत सेना-भाजप युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांन सांगितले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सेना नेते मनोहर जोशी, भाजप प्रदेशचे अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात येणार आहे.

भाजप हतबल
ऐन मोक्याच्या क्षणी रालोआतून बिजू जनता दल बाहेर
नवी दिल्ली, ८ मार्च/खास प्रतिनिधी
गेल्या अकरा वर्षांपासून ओरिसातील बिजू जनता दलासोबत असलेली युती अकस्मात तुटल्यामुळे भाजप नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. बिजू जनता दल सोडून गेल्यानंतर रालोआमध्ये आता सातच मित्रपक्ष उरले असून त्यातही भाजप, शिवसेना, जनता दल युनायटेड आणि अकाली दल अशाच चारच ‘कमावत्या’ पक्षांवर आता रालोआची भिस्त असल्यामुळे केंद्रातील सत्तेच्या स्पर्धेत रालोआची ऐन मोक्याच्यावेळी पीछेहाट होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळवून केंद्रात सत्तेत परतण्याचे भाजपचे आडाखे त्यामुळे चुकणार असून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ‘पीएम इन वेटिंग’च राहतील, असे म्हटले जात आहे.

पवारांच्या पंतप्रधानपदावर राष्ट्रवादी अद्यापही ठाम
काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर जागावाटपाचे गणित अवलंबून
मुंबई, ८ मार्च / खास प्रतिनिधी
शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या उमेदवारीवर ठाम असून, प्रचारात हाच प्रमुख मुद्दा राहिल, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे उभयतांमधील जागावाटपाचा तिढा कायमच आहे. समाजवादी पक्षाबरोबरील काँग्रेसचा मधुचंद्र जवळपास संपुष्टात आला आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीबाबत काँग्रेसचे नेते किती ताठर भूमिका घेतात यावर राष्ट्रवादीच्या जागांचे गणित ठरणार आहे.

सपाची यादी जाहीर पण काँग्रेसशी तडजोड करण्याचीही तयारी
नवी दिल्ली, ८ मार्च/खास प्रतिनिधी

उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसशी समझोता होऊ न शकलेल्या समाजवादी पार्टीने आज आणखी १० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. आतापर्यंत राज्यातील ८० पैकी ७४ जागांवर सपाने आपले उमेदवार उतरविले असून केवळ सहाच जागा आता काँग्रेससाठी सोडल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसशी तडजोड करण्याची तयारीही सपाने दाखविली आहे. सपाने यापूर्वी ६४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण २४ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करणाऱ्या काँग्रेसने आपली मागणी मागे घेतली तर आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवर समाजवादी पार्टी फेरविचार करण्यास तयार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि सरचिटणीस अमर सिंह यांनी सांगितले. पण राज्यात २५ जागांवर निवडणूक लढण्यासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसने मुलायमसिंह यादव यांचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. समाजवादी पार्टी १८ जागा सोडण्यास तयार आहे. पाच जागांवर काँग्रेस आणि सपामध्ये मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या, अशी काँग्रेसची इच्छा आहे. ही बोलणी यशस्वी झाली नाही तर राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा देत काँग्रेसने आणखी ४० ते ५० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी चालविली आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी