Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे दारूबंदीसाठी लढा देणाऱ्या चंद्रकलाबाई कागणे व त्यांच्या सहकाऱ्यांचा रविवारी लातूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नारी प्रबोधन मंच, बाबासाहेब परांजपे फाउंडेशन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे लातूर केंद्र यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी मनोहरराव गोमारे, माळाकोळीचे गोपाळ तिडके आणि या लढय़ाचे वार्ताकन करणारे पत्रकार हरिहर धुतमल उपस्थित होते.

आचारसंहितेची काळजी कोणाला?
सर्वच राजकीय पक्षांकडून सूचनांची पायमल्ली!

औरंगाबाद, ८ मार्च/प्रतिनिधी

आदर्श आचारसंहितेचा धसका राजकीय पक्षांनी घेतला असल्याचे भासविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जवळपास सर्वच पक्षांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे डोळेझाक केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी झाल्यानंतर विविध ठिकाणी बेकायदा लावलेले प्रचाराचे फलक आजही तसेच आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्षाबरोबरच अशा सगळ्याच पक्षांचा समावेश आहे.

हा भार सोसवेना
गुलाबाचं फूल असं सहजासहजी हाताशी येत नाही. फांदीवर असतात काटे. तेही उलटय़ा दिशेनं टोकदार असलेले. फूल तोडून घेताना नेमके ते अडवतात. टोकं घुसतात कपडय़ात, त्वचेत. सौंदर्य आणि गंध यासोबतच संरक्षण दिलंय निसर्गानं. उंचावर आणि फांदीच्या अगदी टोकाला एक पूर्ण उमललेलं फूल खुडता खुडता खळकन पाकळ्या गळल्या खाली. तरंगत तरंगत काही फांदीच्या सांदीमधून, पानांच्या गर्दीमधून खाली ओल्या काळ्या मातीवर, काही कुठं कुठं अडकून फांदीवरच. देठावरती भार पाकळ्यांचा राहिला नाही. आता राहिला देठ शिल्लक. तोडण्याच्या प्रयत्नात काटय़ानं हाताला एके ठिकाणी पकडलं.

‘राष्ट्रवादी’चा बीडमधील उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता
बीड, ८ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या (सोमवारी) मुंबईत बैठक होत आहे. त्यामध्ये बीड मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधातील उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्य़ातील वरिष्ठ नेत्यांची उद्या मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. श्री. मुंडे यांनी उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे.

निवडणुकीच्या पहिल्याच मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे खिसे साफ!
औरंगाबाद, ८ मार्च/प्रतिनिधी

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत गरवारे मैदानावर काल काँग्रेस कार्यकर्त्यांचा पहिलाच मेळावा झाला. या मेळाव्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे खिसे पाकिटमारांनी साफ केले.

वृद्धाश्रमात रंगली पंचमी!
औरंगाबाद, ८ मार्च/प्रतिनिधी

दोन दिवसांवर येऊन ठेपलेली होळी आणि रंगपंचमीचा सण मातोश्री वृद्धाश्रमात रविवारीच साजरा झाला. वृद्धाश्रमात यावे लागल्याच्या कारणाचे दु:ख विसरून येथील ९१ वृद्धांनी रंग उधळले आणि वयाचे भान विसरून काहींनी ठेकाही धरला. निमित्त होते जागतिक महिला दिन आणि दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीचा सण याचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ औरंगाबादच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाचे. वृद्धांनी गीतांच्या तालावर नृत्यही साजरे केले आणि ‘आम्ही आश्रमात नव्हे तर घरीच आहोत’ अशी भावना मनात निर्माण झाल्याचेही सांगितले. आश्रमासाठी विशेष कार्य केल्याबद्दल या कार्यक्रमात वैजयंती मिसाळ, कल्पना बागडिया आणि पद्मा तापडिया यांचा महापौर विजया रहाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर येथे होळी पेटविण्यात आली आणि नंतर रंगांची उधळणही झाली. यावेळी लॉयन्स क्लबचे उपप्रांतपाल अशोक बावस्कर, जगदीश अग्रवाल, संदीप मालू, संतोष अग्रवाल उपस्थित होते.

दोन अपघातांत दोन जण ठार
गेवराई, ८ मार्च/वार्ताहर

दिवसभर काम करून थकलेला शेतकरी कापसाच्या भोतावर झोपला आणि मालमोटर अंगावरून गेल्याने जागीच ठार झाला. दुसऱ्या एका अपघातात भरधाव जाणारी दुचाकी वळणावर घसरल्याने एक तरुण जागीच ठार झाला. हे दोन्ही अपघात काल रात्री झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
वडवणी येथील शेतकरी शेख सय्यद शेख चांद काल गेवराई येथे आले होते. दिवसभर काम करून थकल्याने ते मनजित जीनिंगसमोरील कापसाच्या भोतावर झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास औरंगाबादकडे जाणारी मालमोटार त्यांच्या अंगावरून गेली. ते जागीच ठार झाला. दुसऱ्या अपघातात काठोडा तांडा येथील अंकुश बाबुराव चव्हाण मोटरसायकलवरून (क्रमांक एमएच २३ आर १७९८) गावाकडे जात होता. सेलू फाटा वळणावर ती घसरली. त्यात अंकुश जागीच ठार झाला.

विविध गुन्ह्य़ांतील ५३ संशयितांना अटक
उस्मानाबाद, ८ मार्च/वार्ताहर

कळंब तालुक्यातील काही विशिष्ट वस्त्यांवर छापे टाकून पोलिसांनी विविध गुन्ह्य़ातील ५३ संशयितांना अटक केली. ईटकूर, टोकनी, वाकडी, कोठवाळवाडी या परिसरातील वस्त्यांवर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी हे छापे टाकले. अटक केलेल्या संशयितांकडून बऱ्याच गुन्ह्य़ाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. शिराढोण (कळंब) येथील रिलायन्सच्या केबल वायरची चोरी, अंबाजोगाई (बीड) येथील मोटारसायकल चोरी प्रकरणातील गुन्हे व आरोपींची नावे या संशयितांकडून निष्पन्न झाली आहेत. तर कळंब, शिराढोण, येरमाळा येथील २० गुन्हेगारही पोलिसांना छाप्यात सापडले. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटकेचे आदेश बजावले होते. उपअधीक्षक यल्लप्पा चौधरी , सहायक निरीक्षक ए. जी. मंत्री आदींनी ही कारवाई केली.

म. न. से. कार्यकर्त्यांविरुद्ध परभणीमध्ये खंडणीचा गुन्हा
परभणी, ८ मार्च/वार्ताहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणित विद्यार्थी सेनेच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शिवसेनेसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शुक्रवारी (दि. १३) शिवजयंती साजरी करणार आहे. शिवजयंतीसाठी नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पावती पुस्तके छापली आहेत. जुन्या मोंढा येथे हुसेन अहेमद यांची बेकरी आहे. म. न. से.चे कार्यकर्ते सचिन पाटील, बाळासाहेब भालेराव व संतोष वाणी शुक्रवारी दुपारी बेकरीत गेले. त्यांनी हुसेन यांच्याकडे शिवजयंतीची ११ हजार रुपये वर्गणी मागितली व त्यांना पावतीही दिली. हुसेन यांनी त्यांना पाच हजार रुपये रोख दिले. त्याच रात्री ९.३० वाजता हे कार्यकर्ते पुन्हा बेकरीवर गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे उर्वरित रकमेची मागणी केली. हुसेन यांनी रक्कम देण्यास नकार दिल्याने सचिन पाटील व त्यांच्या साथीदारांनी त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. बेकरीचेही नुकसान केले. उद्यापर्यंत वर्गणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हुसेन अहेमद यांनी नानलपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सोयाबीन नुकसानीचे अनुदान मंजूर
बीड, ८ मार्च/वार्ताहर

सोयाबीनवर पडलेल्या अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. पहिल्या टप्प्यातील १८ कोटी ८५ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. सर्वाधिक अनुदान अंबाजोगाई तालुक्यातील ५० हजार ७५१ शेतकऱ्यांना झाला. केज १९७४४, परळी १३४८७, किल्लेधारूर ४१८५, पाटोदे ३१७४, बीड ९४४, माजलगाव ७३३, शिरूर कासार ५२८, गेवराई १७९ तर वडवणी तालुक्यातील १३० शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आष्टी तालुक्यात एकाही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही.

दरोडेखोरांचा पोलीस पथकावर हल्ला, दोघे जखमी
औरंगाबाद, ८ मार्च/प्रतिनिधी

दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी चिकलठाणा येथील आहिल्याबाई होळकर चौकात घडली. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एस. बी. सानप आणि जी. आर. ठोके अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चंद्रकांत उर्फ चंद्रमा रावसाहेब पिंपळे आणि सुनील सांडू मनोहर (रा. चिकलठाणा) अशी दरोडेखोरांची नावे आहेत. आहिल्याबाई होळकर चौकात दरोडेखोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक त्यांच्या मागावर होते. दरोडेखोर आल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. चंद्रकांत आणि सुनील यांनी पोलीस पथकावरच हल्ला चढविला. यात दोघे जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी दोन्ही दरोडेखोरांना अटक केली.

‘पालकांनी परीक्षा केंद्रापासून दूर राहावे’
सिल्लोड, ८ मार्च/वार्ताहर

पोलिसांच्या कठोर कारवाईपासून मुक्तता पाहिजे असल्यास पालकांनी परीक्षा केंद्रापासून दूर राहावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली धाडगे यांनी आज पत्रकार बैठकीत केले.
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी पोलिसांनी सिल्लोड शहरात सहा शिक्षकांसह तेरा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्या आधी दोन झेरॉक्स सेंटरवर छापे टाकून प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी काढल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे यांच्या ‘प्रतिभा झेरॉक्स सेंटर’चा समावेश होता. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी अधिक कठोर कारवाईस सुरुवात केली असून घरात बसून उत्तरे सोडवून देणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. पुढच्या काळात असे प्रकार तर खपवून घेतले जाणार नाहीतच परंतु परीक्षा केंद्रात कॉपी करताना विद्यार्थी सापडल्यास त्याचा फक्त पेपर काढून घेण्यात येणार नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कॉप्या करू नयेत असे आवाहन धाडगे यांनी केले. त्या म्हणाल्या की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर फळ्यावर उत्तरे सोडवून देण्यासारखे दुर्दैवी प्रकार सर्रासपणे होत आहेत. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सुदृढ बालक स्पर्धेत अजिंक्य, अवनी प्रथम
लातूर, ८ मार्च/वार्ताहर

श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या सुदृढ बालक स्पर्धेत १ ते ३ वर्षे वयोगटात अजिंक्य अविनाश देशमुख व १ महिना ते १ वर्ष वयोगटात अवनी मनीष प्रयाग ही दोन बालके सर्वप्रथम आली. या स्पर्धा दोन गटांत घेण्यात आल्या. १ ते ३ वर्षे वयोगटात द्वितीय श्रीनाथ चेवले, तृतीय अथर्व बुरबुरे व मनीष मुस्कावाड तर बासिद शेख उत्तेजनार्थ ठरला.
१ महिना ते १ वर्ष वयोगटात प् द्वितीय सुमीत बनसोडे व तृतीय ओम माने ठरला. या स्पर्धेचे प्रायोजक रमणी गोजमगुंडे होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्वप्ना गोजमुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम विजेत्यास पाचशे एक, द्वितीय तीनशे एक, तृतीय दोनशे एक तर उत्तेजनार्थ एकशे एक रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून डॉ. आरदवाड व डॉ. वसंत बाबरे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजक धनंदय बेंबडे, मुख्य संयोजक विक्रम गोजमगुंडे, सहसंयोजक प्रदीप पाटील, सिद्धेश्वर देवस्थानचे सचिव ज्ञानोबा गोपे, डॉ. रवींद्र इरपतगिरे उपस्थित होते.

निकृष्ट रस्त्याच्या चौकशीची मागणी
औसा, ८ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील बाणेगाव ते लिंबाळा रस्त्याची सध्या सुरु असलेली दुरुस्ती व डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत होते. पण उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतल्याचे समाधान या परिसरात होते;मात्र संबंधित विभागाने आता तोंडाला पाने पुसण्याचेच काम सुरू केले आहे. या रस्त्यासाठी फारच कमी प्रमाणात डांबराचा वापर करण्यात येत आहे व रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार बाणेगावचे सरपंच, ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यामुळे कामात सुधारणा झाली नाही. उलट काम घाईने पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेकेदार करीत आहे. यामुळे शासनाचा पैसा वाया जाणार आहे, तर या परिसरातील दोन गावांना जोडणारा कमी अंतराचा रस्ता मोडकळीस येण्याची शक्यता आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. तरीही कामात सुधारणा होत नाही. यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी व संबंधित दोषी अधिकारी व गुत्तेदारांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी बाणेगावच्या सरपंच सुमित्रा तौर यांनी केली आहे.

इलाही जमादार यांच्या गजम्ल गायनाने रसिक मंत्रमुग्ध
लातूर, ८ मार्च/वार्ताहर

मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभिनव अध्यापक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात महाराष्ट्रातील ख्यातनाम गजम्लकार इलाही जमादार यांनी विविध विषयांवरील गजम्ल सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे होते. गजम्ल सादर करण्यापूर्वी प्रियकर व प्रेयसी यांचे हितगुज म्हणजे गजम्ल तसेच हरणाच्या पाडसाची मोहक हालचाल म्हणजेच गजम्ल अशा गझलेच्या दोन व्याख्या जमादार यांनी सांगितल्या.
‘तो स्पर्श तिच्या श्वासाचा रक्तात दरवळे माझ्या
अंकुर प्रीतीचा आपल्या स्वप्नात दरवळे माझ्या’

यासारख्या गजम्ला सादर करून त्यांनी सर्वाची दाद मिळविली. भैरवीने त्यांनी समारोप केला. प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील डोपे तर प्रतिभा बुरले यांनी आभार मानले.

सरस्वती व डिस्कव्हरीचे स्नेहसंमेलनगंगाखेड,
८ मार्च/वार्ताहर

शहरातील सरस्वती शिशुवाटिका व डिस्कव्हरी इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी स्नेहसंमेलने पार पडली. डिस्कव्हरी इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी माधव सलगर यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकार रमेश कातकडे, ज्ञानोबा रानगिरे, प्रा. पिराजी कांबळे आदींच्या उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. सरस्वती शिशुवाटिकेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी नादबिंदूचे गोपी मुंढे तर प्रांत संघचालक अ‍ॅड्. गंगाधर पवार, डॉ. सुभाष कदम उपस्थित होते. चिमुकल्यांनी ‘संपूर्ण वंदेमातरम्’, ‘जय शारदे वाघेश्वरी’, ‘पार्वतीच्या बाळा’, ‘हे राष्ट्र देवतांचे’ आदी गीते व नृत्यप्रकार सादर केली.

ऊसतोड मजुराचे अपहरण; मुकादमाविरुद्ध अटकेचे आदेश
जालना, ८ मार्च/वार्ताहर

ऊसतोड मजुराला कर्नाटकात ओलीस ठेवल्याप्रकरणी येथील मुकादम जनप्पा हाकाटी याच्या विरोधात परतूर न्यायालयाने अटकेचे आदेश काढले आहेत. लोणी गावच्या श्रीरंग ऊर्फ दादा कचरू घुले असे या पळवून नेलेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी आर. डी. शिंदे व पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेत आपल्या स्तरावर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. लोणी येथून घुले व शेख सिकंदर शे. अमिर हे दोघे ११ ऑक्टोबर २००८ ला ऊसतोडीसाठी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्य़ात गेले होते. या वेळी घेतलेले आगाऊ पैसे न चुकविताच सिकंदर आपल्या घरी परतला. यामुळे मुकादम जनप्पाने मागे राहिलेल्या दादा घुले यास ओलीस ठेवले. घुले यांच्या कुटुंबियांना मुकादम जनप्पाने धमकावीत, सिकंदर आमच्याकडून रक्कम घेऊन पसार झाला आहे. म्हणून आम्ही सर्व मजुरांना ओलीस ठेवले आहे, असेही त्याने सांगितले. या धमकीमुळे घुले यांचे कुटुंबीय घाबरले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व परतूर न्यायालयात मुकादमविरुद्ध अर्ज दाखल केला. दरम्यान जनप्पा हकाटी सापडत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अटकेचे आदेश काढले आहे.

कॉप्या पुरविणारे ५७ जण भोकरदनमध्ये ताब्यात
भोकरदन, ८ मार्च/वार्ताहर

शहरातील दहावीच्या पाच परीक्षा केंद्रांवर पोलिसांनी दोन दिवसांत ५७ जणांना बाहेरून कॉप्या पुरवठा करताना ताब्यात घेतले. यापैकी २१ जणांना अल्पवयीन असल्याने समज देऊन सोडण्यात आले, तर ३६ जणांना न्यायालयाने दंड ठोठाविला आहे. मराठी, हिंदी विषयांच्या परीक्षेच्या वेळी शहरातील जिल्हा परिषद प्रशाला, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, शिवाजी हायस्कूल, न्यू हायस्कूल व रामेश्वर कनिष्ठ विद्यालय या परीक्षा केंद्रांवर कॉपीपुरवठा करणाऱ्यांनी गर्दी केली होती. या कॉपी पुरविणाऱ्यांपैकी मराठी परीक्षेच्या दिवशी ३२ जणांना तर हिंदी परीक्षेच्या दिवशी २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी पहिल्या दिवशी १४ जणांना व दुसऱ्या दिवशी सातजणांना अल्पवयीन असल्याने समज देऊन सोडून देण्यात आले. इतरांना न्यायालयाने दंड ठोठाविल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे म्हणाले, कॉप्या रोखण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येईल.

शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा
वसमत, ८ मार्च/वार्ताहर

वसुली अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची केल्याबद्दल येथील एका करभरणाधारकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांनी वसमत पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. तर सय्यद महेबूब सय्यद युनूस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. येथील सय्यद महेबूब सय्यद युनूस यांच्याकडे घ. नं. बी./१२५/२११ या क्र. च्या घरावरील थकबाकी रक्कम ३६,०१५ रुपये वसुलीसाठी संबंधित वसुली आधिकारी गेले होते. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तुम्ही पैसे मागणारे कोण? असा प्रश्न करून त्यांच्याशी बाचाबाची केली. त्यामुळे मुख्याधिकारी चव्हाण यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सय्यद महेबूब यांच्यावर वसमत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

अवैध दारूविक्री प्रकरणी हॉटेल, ढाब्यांवर छापे
गेवराई, ८ मार्च/वार्ताहर

विशेष पोलीस पथकाने शहरातील अवैध दारूविक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यांवर छापे टाकून ५० हजारांचा मुद्देमाल व आठजणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अवैध व बनावट दारू विकणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. शहर व परिसरात अवैध व नकली दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. या बाबीची नोंद घेऊन बीड येथील पोलिसांच्या विशेष पथकाने गेवराई व परिसरातील ढाबे व हॉटेलांवर अचानक छापे टाकले. यात सहारा, राजगड, चार्वाक, महाराजा, राजदरबार आदी हॉटेल व ढाब्यांवर सात ठिकाणी छापे टाकून ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी अशोक सावंत, अजय दाभाडे, रामेश्वर पानखडे, विकास गायकवाड, राजेंद्र पवार, दिनेश घोडके, गोविंद शिंदे व राम वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.