Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिवसेना-भाजप युतीची घोषणा कोणत्याही क्षणी..
मुंबई, ८ मार्च/ खास प्रतिनिधी

लालकृष्ण अडवाणी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे वदवून घेण्यात भाजप नेत्यांना

 

यश आल्यामुळे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही आज बरे होऊन लीलावती रुग्णालयातून घरी परतल्यामुळे शिवसेना-भजप युतीबाबत गेल्या काही दिवसात निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकून येत्या एक-दोन दिवसांत सेना-भाजप युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांन सांगितले.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सेना नेते मनोहर जोशी, भाजप प्रदेशचे अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात येणार आहे. सेना-भाजपमध्ये जागावाटपात वादाच्या ठरलेल्या दक्षिण मुंबई, कल्याण आणि यवतमाळ या जागा शिवसेनेला देण्यास भजपने तयारी दाखविल्याचे या सूत्रांचे म्हणणे असून त्याबदल्यात भिवंडची जागा देण्याची तयारी शिवसेनेने ेदाखवली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी व शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यात जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेच्या ‘बोरूबहाद्दरां’ नी जागावाटप झाल्याचे जाहीर केले तसेच विशिष्ट परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी मराठी माणूस म्हणून शिवसेना शरद पवार यांना पाठिंबा देऊ शकते असे जाहीर केले. या वक्तव्यामुळे भाजप नेते कमालीचे दुखावले गेले आणि नितीन गडकरी यांनी शिवसेनेला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितेल. अडवाणी यांच्याबाबत स्पष्ट भूमिका नसेल तर शिवसेनेने युती तुटल्याचे जाहीर करावे, असे गडकरी यांनी ‘रोखठोक’ बजाविल्यानंतर शिवसेना वरमली. अडवाणी हेच पंतप्रधानपदाची उमेदवार असतील व पुढील पाच वर्षे युती कायम राहील, असे शिवसेना नेत्यांनी सांगितल्यानंतर जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली.