Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भाजप हतबल
ऐन मोक्याच्या क्षणी रालोआतून बिजू जनता दल बाहेर
नवी दिल्ली, ८ मार्च/खास प्रतिनिधी
गेल्या अकरा वर्षांपासून ओरिसातील बिजू जनता दलासोबत असलेली युती अकस्मात तुटल्यामुळे

 

भाजप नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. बिजू जनता दल सोडून गेल्यानंतर रालोआमध्ये आता सातच मित्रपक्ष उरले असून त्यातही भाजप, शिवसेना, जनता दल युनायटेड आणि अकाली दल अशाच चारच ‘कमावत्या’ पक्षांवर आता रालोआची भिस्त असल्यामुळे केंद्रातील सत्तेच्या स्पर्धेत रालोआची ऐन मोक्याच्यावेळी पीछेहाट होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळवून केंद्रात सत्तेत परतण्याचे भाजपचे आडाखे त्यामुळे चुकणार असून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ‘पीएम इन वेटिंग’च राहतील, असे म्हटले जात आहे.
बिजू जनता दल अचानक युती संपुष्टात आणून रालोआतून बाहेर पडेल, याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले. ही युती तोडून भाजप वा बिजू जनता दलाला कोणताही फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले.
या अनपेक्षित घडामोडीवरील प्रतिक्रिया म्हणून भाजपने ओरिसातील नवीन पटनायक सरकारचा पािठबा काढून घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी आज सायंकाळी डेहराडूनहून दिल्लीला परतल्यानंतर भाजप नेत्यांची त्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठकही झाली. पण या बैठकीला फारसा अर्थ उरला नव्हता. नवीन पटनाईक यांच्यासारख्या भरवशाच्या नेत्याने दगा दिल्यानंतर भवितव्य धूसर झालेल्या भाजपसाठी ही एकप्रकारची शोकसभाच ठरली. भाजपशी जागावाटपावरून अशीच अटीतटीची बोलणी करणाऱ्या शिवसेना आणि जनता दल युनायटेडशी सबुरीने बोलणी करून त्यांच्याशी युती टिकविण्यावर आता भाजपने लक्ष केंद्रीत केल्याचे समजते. शनिवारी रात्री भुवनेश्वर येथे झालेल्या आकस्मिक घडामोडीमुळे भाजप पूर्णपणे बॅकफूटवर आली असून खचलेल्या मनोधैर्याने पक्षाला लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.