Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पवारांच्या पंतप्रधानपदावर राष्ट्रवादी अद्यापही ठाम
काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर जागावाटपाचे गणित अवलंबून
मुंबई, ८ मार्च / खास प्रतिनिधी

शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक

 

भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या उमेदवारीवर ठाम असून, प्रचारात हाच प्रमुख मुद्दा राहिल, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे उभयतांमधील जागावाटपाचा तिढा कायमच आहे. समाजवादी पक्षाबरोबरील काँग्रेसचा मधुचंद्र जवळपास संपुष्टात आला आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीबाबत काँग्रेसचे नेते किती ताठर भूमिका घेतात यावर राष्ट्रवादीच्या जागांचे गणित ठरणार आहे.
तीन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे झालेल्या बैठकीत राज्यातील नेत्यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित केला होता. यूपीएचे महाराष्ट्रात पंतप्रधानपदाचे दोन उमेदवार असतील. तसेच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीचे गुफ्तंगू वाढल्य़ाकडे लक्ष वेधण्यात आले. विशेषत: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे शरद पवारांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यंतरी काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी राष्ट्रवादीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही ताणून धरले जाणर नाही, असे विधान केले होते. मात्र दिल्लीने काहीशी आक्रमक भूमिका घेताच शनिवारी औरंगाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली. राष्ट्रवादीच्या विरोधातील मुद्दा केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी उपस्थित केला व त्यावर विलासराव देशमुख यांनी मग राष्ट्रवादीला लक्ष्य केले. राज्यातील काँग्रेसच्या राजकारणात मुत्तेमवार हे विलासरावांचे निकटवर्तीय मानले जातात.
पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर काँग्रेसने राष्ट्रवादीला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आर. आर. पाटील यांनी मात्र पंतप्रधानपदाकरिता पवारांच्या उमेदवारीवर पक्ष ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी प्रचाराच हाच मुद्दा प्रभावीपणे मांडणार असल्याचे त्यांनी सूचित केले. एकूणच पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर उभयतांनी टोकाची भूमिका घेतली आहे.
जागावाटपाची चर्चा आता नवी दिल्लीत सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांची विस्तृत माहिती पक्षाच्या नेत्यांना देण्यात आली आहे. जागावाटपाच्या चर्चेत ते कोणती भूमिका घेतात यावर कोणत्या पक्षाच्या वाटय़ाला किती जागा जातील याचे भवितव्य ठरेल, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.