Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

कर्तृत्वान महिलांच्या सत्काराकडे नगरसेवकांनी फिरवली पाठ !
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्याची महानगरपालिकेची पंरपरा आहे. मात्र आज जागतिक महिला

 

दिनाच्या निमित्ताने पालिका सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवली. विरोधी पक्षनेते, गट नेते कोणालाच या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी वेळ मिळाला नाही, अपवाद फक्त भारतीय जनता पक्षाचे पालिकेतील गटनेते भालचंद्र शिरसाट यांचा.
महानगरातील कर्तृत्वान महिलांना महापौर पुरस्कार देऊन त्यांचा आठ मार्च या जागतिक महिला दिनी सत्कार करण्यात येतो. महापौर हा सोहळ्या आपल्या निवासस्थानी आयोजित करीत असतात. मात्र या वर्षी आचार संहिता लागू झाल्याने हा सोहळा पालिकेच्या ऐतिसाहिक सभागृहात पार पडला. पालिकेच्या चिटणीस मृदूल जोशी आणि अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते एकूण ४२ महिलांचा सत्कार करण्यात आला. महापौर शुभा राऊळ सत्कारमुर्ती महिलासोबत बसल्या होत्या.
या सोहळ्याचे सर्व नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले होते. सुट्टीच्या दिवशी सर्व नगरसेवकांना इथे हजेरी लावणे शक्य नसेल तर किमान त्यांच्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी तरी उपस्थित राहावे, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र भारतीय जनता पक्षाचे गटनेते भालचंद्र शिरसाट वगळता इतर पक्षांचे गटनेते गैरहजर राहीले. विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांनीही या सोहळ्याकडे पाठ फिरवली. शालिनी मराठे, कुमुधवल्ली सारंगपाणी, डॉ. नंदिता पालशेतकर, पल्लवी शरद वर्तक, कॅप्टन उर्मिला सरकार, वृषाली अमृते, डॉ. मृदुला शहा, वंदना निकाळे यांच्यासह एकूण ४२ महिलांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, शहरात आज उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात आला. परळ येथील दिशा सामाजिक संस्था, विश्व गायत्री परिवार, वुमेन्स वेल्फअर फोरम यांच्यासह अनेक संस्थांनी महिला दिनाचे कार्यक्रम आयोजिक केले होते.