Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करणारा ‘तो’
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

विविध कला आणि संगीताचा गोव्याला समृद्ध वारसा लाभला आहे. गायन, नाटय़, चित्रकला या क्षेत्रातील अनेक दिग्गज या भूमीने दिले आहेत. येथील रंगभूमीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. या भूमीत अनेक मंदिरे आणि देवळे आहेत. या देवळांच्या प्रांगणात विविध उत्सवांच्या निमित्ताने पूर्वीपासून गावातील कलावंत नाटके करायची. आजही उत्सवी रंगभूमीवरील अशी नाटके धरून दरवर्षी जवळजवळ १० हजार नाटके या भूमीत होतात. गेल्या वीस-एक वर्षांपासून पणजी येथील गोवा कला अकादमीमध्ये सुरू असलेल्या नाटय़विद्यालयामुळे गोव्याच्या रंगभूमीला आधुनिक रूप येऊ लागले आहे. नाटय़निर्मितीच्या नवनव्या कल्पना आणि तंत्रे येथे अवलंबिण्यात येऊ लागली आहेत.
‘बद्धमुक्त’ या नाटकाचे लेखक नारायण खराडे यांनी याआधी ‘कुसुमगंध’ हे नाटक आणि

 

‘कन्फ्युजन’, ‘जीवनगाणे’, ‘पडद्यामागे’ आणि ‘भुतदया’ अशा ४ एकांकिका लिहिल्या आहेत. ‘बद्धमुक्त’ या नाटकाचे दिग्दर्शन खराडे यांनीच केले आहे.
या नाटकाचा नायक ‘तो’ हा आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव आहे. पण आजूबाजूचे वास्तव आणि सामाजिक परिस्थिती त्याला स्वामीजींच्या उदात्त विचारांशी विसंगत वाटते. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘तो’ अनेकदा क्रांतिकारक होण्याचाही विचार करतो, कारण त्याला अनेकदा उदात्त विचार म्हणजे एक थोतांड वाटते आणि भोगवाद हाच खरा वाटतो;
पण त्याच्याशीही तो जुळवून घेऊ शकत नाही. ‘तो’ या व्यक्तिरेखेभोवतीच हे संबंध नाटक फिरते. वडिलांचे नाते, प्रेयसीचे नाते आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या विचाराशी नाते यात दाखविले आहे. एक प्राचार्य, एक राजकीय नेता, एक संपादक आदींशी ‘तो’ कसे संबंध प्रस्थापित करतो, हे या नाटकात दाखविले आहे. ‘तो’ स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो, यात तो यशस्वी होतो का?
‘तो’च्या भूमिकेत लेखक-दिग्दर्शक नारायण खराडे स्वत: आहेत, तर बांदेकर, संपादक, आनंद, ‘तो’ला भेटायला आलेली व्यक्ती या सर्वाची भूमिका अभिषेक म्हाळशी यांनी केली आहे. विवेक वडील व काल्पनिक संपादक यांची भूमिका महादेव सावंत यांनी आणि ‘ती’ची भूमिका समीक्षा देसाई यांनी केली आहे.
प्रकाश योजना सुशांत नायक यांची, तर नेपथ्य अभिषेक म्हाळशी व महादेव सावंत यांचे आहे. पाश्र्वसंगीत स्नेहल जोग यांचे आहे. रंगभूषा व वेशभूषा समीक्षा देसाई यांनी केली आहे.
आजचे नाटक
‘बद्धमुक्त’