Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

२६/११च्या हल्ल्यातील आरोपींना हवे उर्दूमध्ये आरोपपत्र
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले दोन भारतीय संशयित फईम अन्सारी

 

आणि सबाउद्दीन शेख यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या सुमारे ११ हजार २८० पानांचे आरोपपत्र उर्दू भाषेत भाषांतरीत करून द्यावे, अशी विनंती महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे. फईम आणि सबाउद्दीनप्रमाणे कसाबही आरोपपत्राची प्रत उर्दुमध्ये देण्यात यावी, अशी विनंती करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाने २५ फेब्रुवारी रोजी कसाबसह फईम, सबाउद्दीन आणि ३५ पाकिस्तानी फरारी संशयितांवर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आरोपपत्र दाखल केले होते. त्या वेळी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या सबाउद्दीन आणि फईम यांना न्यायालयाने आरोपपत्राची प्रत वकिलाला देणार की स्वत:कडे ठेवणार अशी विचारणा केली होती व दोघांनीही ती स्वत:कडे ठेवून घेतली होती. मात्र गेल्या ६ मार्च रोजी दोघांनीही महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज करून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचे आपल्याला ज्ञान नसून त्यामध्ये असलेले आरोपपत्र आपल्याला समजत नसल्याचे म्हटले आहे. तसेच ११ हजार २८० पानांचे मराठी आणि इंग्रजी भाषेतील आरोपपत्र आपल्याला उर्दुमध्ये भाषांतरीत करून देण्याची विनंती केली आहे. या विनंतीवर न्यायालय उद्या, ९ मार्च रोजी निर्णय देणार आहे. न्यायालयाने फईम आणि सबाउद्दीनची ही विनंती मान्य केली तर गुन्हे अन्वेषण विभागाला त्या दोघांसाठी उर्दु भाषेतील आरोपपत्राची नव्याने प्रत तयार करावी लागेल. तसेची ही प्रत दिल्याशिवाय खटला विशेष न्यायालयात वर्ग होण्याच्या प्रक्रियेला वेळ लागू शकेल, असे खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.