Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
प्रादेशिक

कर्तृत्वान महिलांच्या सत्काराकडे नगरसेवकांनी फिरवली पाठ!
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्याची महानगरपालिकेची पंरपरा आहे. मात्र आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पालिका सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवली. विरोधी पक्षनेते, गट नेते कोणालाच या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी वेळ मिळाला नाही, अपवाद फक्त भारतीय जनता पक्षाचे पालिकेतील गटनेते भालचंद्र शिरसाट यांचा. महानगरातील कर्तृत्वान महिलांना महापौर पुरस्कार देऊन त्यांचा आठ मार्च या जागतिक महिला दिनी सत्कार करण्यात येतो. महापौर हा सोहळ्या आपल्या निवासस्थानी आयोजित करीत असतात. मात्र या वर्षी आचार संहिता लागू झाल्याने हा सोहळा पालिकेच्या ऐतिसाहिक सभागृहात पार पडला.

रिलायन्स इंडस्ट्रीजसह १० बडय़ा कंपन्यांचे गेल्या आठवडय़ात ५५ हजार कोटींचे नुकसान
मुंबई, ८ मार्च/पीटीआय

दहा बडय़ा भारतीय कंपन्यांना गेल्या आठवडय़ात बाजारपेठेतील मुल्यांकनानुसार ५५ हजार कोटीं रुपयांपेक्षा अधिक फटका बसला आहे. त्यात मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) या कंपनीला सुमारे १५ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले.

तरुण पिढीचे प्रतिनिधीत्व करणारा ‘तो’
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

विविध कला आणि संगीताचा गोव्याला समृद्ध वारसा लाभला आहे. गायन, नाटय़, चित्रकला या क्षेत्रातील अनेक दिग्गज या भूमीने दिले आहेत. येथील रंगभूमीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. या भूमीत अनेक मंदिरे आणि देवळे आहेत. या देवळांच्या प्रांगणात विविध उत्सवांच्या निमित्ताने पूर्वीपासून गावातील कलावंत नाटके करायची. आजही उत्सवी रंगभूमीवरील अशी नाटके धरून दरवर्षी जवळजवळ १० हजार नाटके या भूमीत होतात. गेल्या वीस-एक वर्षांपासून पणजी येथील गोवा कला अकादमीमध्ये सुरू असलेल्या नाटय़विद्यालयामुळे गोव्याच्या रंगभूमीला आधुनिक रूप येऊ लागले आहे. नाटय़निर्मितीच्या नवनव्या कल्पना आणि तंत्रे येथे अवलंबिण्यात येऊ लागली आहेत.

२६/११च्या हल्ल्यातील आरोपींना हवे उर्दूमध्ये आरोपपत्र
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले दोन भारतीय संशयित फईम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या सुमारे ११ हजार २८० पानांचे आरोपपत्र उर्दू भाषेत भाषांतरीत करून द्यावे, अशी विनंती महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे. फईम आणि सबाउद्दीनप्रमाणे कसाबही आरोपपत्राची प्रत उर्दुमध्ये देण्यात यावी, अशी विनंती करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाने महिनाभरापूर्वी विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला आहे. कारण त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा परीक्षांच्या काळातच येत असल्यामुळे विद्यापीठाला तब्बल ४८ अभ्यासक्रमांतील ६०८ विषयांच्या परीक्षेत फेरबदल करावा लागला आहे. यामुळे जवळपास दोन लाख २० हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोकणात २३ एप्रिल रोजी तर मुंबईत ३० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. हे क्षेत्र मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे २१ ते २४ एप्रिल आणि २८ ते ३० एप्रिलमधील परीक्षांवर परीणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीतील परीक्षांच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यात येत असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांनी सांगितले. परीक्षांचे वेळापत्रक पुढील आठवडय़ात जाहीर होईल, असे ते म्हणाले.

नोकराचा मालकावर प्राणघातक हल्ला
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

पगाराच्या कारणास्तव कामावरून काढून टाकल्याचा सूड उगविण्यासाठी नोकराने मालकाच्या घरात शिरून त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर वार करून ठार मारण्याची घटना शनिवारी नागपाडा येथे घडली. मोहम्मद उस्मान अब्दुल रहमान नागोरी (४०) हे नागपाडा येथील जरीवाला इमारतीत राहतात. व्यापारी असलेल्या नागोरी यांनी दीड वर्षांपूर्वी राजसिंग कँुवर बहाद्दूर सिंग (२८) याला पगाराच्या कारणावरून कामावरून काढून टाकले होते. नागोरी यांनी नोकरीवरून काढून टाकून आपल्यावर अन्याय केला असल्याच्या भावनेतून सिंग याने त्याचा सूड उगवायचे ठरवले. त्यानुसार शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तो नागोरी यांच्या जरीवाला इमारतीतील घरी घुसला. सुरूवातीला नागोरी दाम्पत्याला शिवीगाळ करून नंतर त्याने दोघांवरही आपल्याकडील कोयत्याने वार करून तेथून पळ काढला. नागोरी दाम्पत्याला जवळच्या फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस सिंग याच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी करीत असून लवकरच फरारी सिंगला गजाआड करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

‘निसर्ग मित्र’तर्फे अनोखा महिलादिन
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ‘निसर्ग मित्र’ या ट्रेकींग ग्रुपने महिलादिनाच्या पूर्वसंध्येला महिलांसाठी विशेष ‘नाईट ट्रेकींग’चे आयोजन केले होते. या अनोख्या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील १०१ महिलांनी सहभाग घेतला. पनवेलजवळच्या ईर्षांल गडावर या रात्रीच्या टेकींगचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळेत शिकणाऱ्या मुलींसोबत महाविद्यालयीन तरूणी, विविध क्षेत्रात कार्यरत स्त्रिया, गृहिणी सहभागी झाल्या होत्या. एवढेच नाहीतर ६८ वर्षांच्या आजीबाईंचा या ट्रेकींगमधील सहभाग हे या ट्रेकींगचे खास वैशिष्टय़ ठरले. या आजीबाईंनी चक्क साडी नेसून ट्रेकींग केले. पोलीस क्षेत्रातील चारजणींचाही यात समावेश होता. या उपक्रमात सहभागी झालेल्या ८० टक्के महिला पहिल्यांदाच ट्रेकींग करीत होत्या. रात्रीच्या ट्रेकींगनंतर स्त्रियांशीसंबंधित विषयावर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. या ट्रेकींगचे आयोजन ग्रुपच्या ज्योती कानिटकर यांनी केले.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा विशेष लोकलने पाहणी दौरा
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक भारत भूषण मोदगिल यांनी आज काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांची कसून पाहाणी केली. हा पाहणी दौरा त्यांनी पाच डब्यांच्या विशेष लोकलने केला. दरम्यान, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. एन. वर्मा यांनीही वांद्रे ते विरार या स्थानकांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. मोदगिल हे मध्य रेल्वेच्या काही स्थानकांना भेटी देऊन तेथील सुरक्षाव्यवस्था, स्वच्छता या बाबींची पाहणी करणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही आठवडय़ांपासून मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवरील स्वच्छता मोहीमेसोबत स्थानकांच्या रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सकाळी मोदगिल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकाळी साडेनऊ वाजता सीएसटी स्थानकापासून पाहणीला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी भायखळा, दादर, सायन, घाटकोपर, कांजुरमार्ग, मुलुंड, ठाणे, ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांना भेटी देऊन तेथील स्वच्छता आणि सुरक्षेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी सीएसटी स्थानकावरील नव्या इंडिकेटरचे आणि कल्याण येथील १२ मीटर पादचारी पुलाचे उद्घाटन केले.

पालिका आयुक्तांविरुद्ध आव्हाड याची पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

कचऱ्याने भरलेला ट्रक पालिका मुख्यालयासमोर रिकामा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध महापालिकेनेगुन्हा दाखल केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आव्हाड यांनी आज मुलुंड-ठाणे सीमेवरील डमपिग ग्राऊंडप्रकरणी पालिका आयुक्तांविरुद्धच नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबईतील सर्व कचरा मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला जातो. दिवसाला हजारो टन कचरा या ग्राऊंडवर टाकण्यात येत असल्याने या परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास स्थानिक रहिवाशांकडून गेल्या काही महिन्यांपासून विरोध होत असून हा कचरा अन्यत्र टाकण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र पालिकाप्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून पालिकेला धडा शिकविण्यासाठी हाच एक मार्ग उरल्याचे सांगत आव्हाड यांनी कचऱ्याने भरलेला ट्रक बोरिबंदर येथील पालिका मुख्यालयासमोर रिकामा केला होता. आव्हाड यांच्या कृतीनंतर पालिका प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणूनोव्हाड यांनी नवघर पोलीस ठाण्यात पालिका आयुक्तांविरुद्धच तक्रार केली. मुलुंड-ठाणे सीमेवरील डमपिग ग्राऊंडची मुदत संपल्यानंतरही ते बंद केलेले नाही. असे करून पालिका प्रशासन स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप आव्हाड यांनी या तक्रारीत केला आहे. आव्हाड यांच्या तक्रारीची दखल घेऊन उद्या त्या तक्रारीची प्रत पालिका आयुक्तांना पाठवून त्यावर त्यांचा खुलासा मागण्यात येणार असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली.

बेस्ट बसच्या धडकेत दोन भाऊ जागीच ठार
मुंबई, ८ मार्च / प्रतिनिधी

शीव (प.) येथील इंदिरा बाजाराजवळ शनिवारी रात्री उशिरा बेस्ट बसच्या धडकेत दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला अटक केली आहे. कृष्णा (४०) आणि बाबू अय्यर (३५) अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. अय्यर बंधू शनिवारी रात्री उशिरा ते बेस्ट टर्मिनलशेजारील इंदिरा बाजार येथून पायी घरी परतत होते. त्याचवेळी बेस्ट बसचा चालक अभिजीत शिर्के (२३) हा बस टर्मिनलमध्ये लावण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रयत्न करीत असतानाच त्याने अय्यर बंधुंना धडक दिली.