Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

गोळीबाराचे प्रकरण पद्धतशीर दडपले!
श्रीरामपूर, ८ मार्च/प्रतिनिधी

वसुलीच्या वादातून शहराच्या मध्यवर्ती भागात आज सकाळी अकराच्या सुमारास तरुणावर गोळीबार करण्यात आला. अण्णासाहेब अप्पासाहेब पोलादे (वय ४५) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. साखर कामगार रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु

 

गोळीबाराचे प्रकरण पोलिसांनी दडपले!
शहर पोलीस ठाण्यात गोळीबारप्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदविला नसून, केवळ पोलादे यांचा जबाब घेऊन त्याची नोंद करण्यात आली. मी घासगल्लीत माझा मित्र सुभाष नन्नवरे याच्याकडे गेलो होतो. त्याने मला छऱ्याची बंदूक दाखविली. त्यावेळी बंदुकीतून छरा उडून माझ्या पायात घुसला. त्याबद्दल माझी तक्रार नाही, असे नोंदीत नमूद केले आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी - पोलादे हे बाजार समितीत कर्मचारी असून, त्यांचे व्यापाऱ्यांशी देण्या-घेण्याचे व्यवहार आहेत. बेलापूर येथील व्यापाऱ्याकडे थकलेले पैसे वसुलीचे काम त्यांनी नन्नवरे यास दिले. वसुलीच्या वादातून आज घासगल्लीत दोघांत वाद झाला. रागाच्या भरात नन्नवरे याने पोलादे यांच्यावर गोळी झाडली. उजव्या पायाच्या जांघेच्या भागातून गोळी आरपार गेली. पोलादे यांना नन्नवरे याने स्वतच कामगार रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलादे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाने तब्बल ४ तास उशिरा पोलिसांना माहिती कळविली.
रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असताना गोळीबार करणारा नन्नवरे, काही नगरसेवक व भुसार मालाचे व्यापारी उपस्थित होते. त्यावेळी प्रकरण आपसात तडजोडीने मिटवून पोलिसांत तक्रार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गोळीबारातील गोळी बदलून तेथे छरा दाखविला.
हिंदी चित्रपटातील कथेला साजेशा घटनांची मालिका आज दिवसभर सुरू होती. मध्यवर्ती भागातील गुंडाने केलेल्या गोळीबारानंतर पोलीस यंत्रणा ठाण्यातून गायब झाली! ठाण्यात केवळ दोन पोलीस कर्मचारी. निरीक्षक शंकरराव जाधव यांचा मोबाईल ‘स्वीच ऑफ’ होता. त्यांचा दिवसभर कोणालाच ठावठिकाणा नव्हता. अन्य पोलीस अधिकारी ‘अगा जे घडलेचि नाही’ असे मोबाईलवर सांगत होते! ठाण्यात त्यांचा पत्ताच नव्हता. गुन्हेगारांच्या मदतीला पोलीस यंत्रणा कशी राबते, याचा अनुभव आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेतला. ‘अर्थकारणा’पुढे कर्तव्यदक्षता, संवेदना कशा बोथट झाल्या आहेत, त्याचा विदारक अनुभव आला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची सही झालेली. ज्यांच्याकडे सूत्रे आहेत, ते संगमनेरचे उपअधीक्षकही रजेवर. ‘पोलिसांना सूचना देतो,’ या पलीकडे त्यांनी काही केले नाही. अधीक्षक अशोक डोंगरे यांचाही मोबाईल ‘स्वीच ऑफ’. अतिरिक्त अधीक्षक दराडे यांनी चौकशीचे आदेश देण्याचे माध्यमांना सांगितले. परंतु रात्री उशिरापर्यंत तपासात काहीही प्रगती नव्हती. दिवसभराच्या
घडामोडींनंतर प्रकरणावर पद्धतशीर पडदा पडल्याचे स्पष्ट झाले!
गोळीबार करणाऱ्या नन्नवरे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. घटनेनंतर तो शहरातून निघून गेला. परंतु जाताना सर्व प्रकरणावर पडदा टाकला. खरे तर गोळीबारानंतर नन्नवरे यास ताब्यात घेऊन शस्त्र ताब्यात घ्यायला हवे, स्वत फिर्यादी होऊन अधिकाऱ्यांनी तपास करायला हवा होता. गोळीऐवजी छरा दाखविणाऱ्याचा जबाब घेऊन प्रसंगी कारवाईचा बडगा उगारावा, अशी लोकांची अपेक्षा होती. परंतु घडले उलटेच. घडलेली घटना पोलिसांच्या गावीच नव्हती. पोलीस अधीक्षक डोंगरे यांनी शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी गुन्ह्य़ाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपवावा, अशी मागणी होत आहे. अशा प्रकारे तपास झाला नाही, तर शहरात गुंडाराज सुरू होण्याचा धोका आहे.