Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

कोठडीतील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
सीआयडी चौकशीचे आदेश
शेवगाव, ८ मार्च/वार्ताहर

येथील पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या बिर्याण्या चिंग्या भोसले (वय ४०, खांडवी, तालुका गेवराई) या आरोपीने आज पहाटेस कोठडीच्या गजाला शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सीआयडी

 

चौकशीचा आदेश पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांनी संध्याकाळी दिला.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगोरी शिवारात दरोडे घालून तेथील रहिवाशांना बेदम मारहाण करून लूट करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्य़ात शेवगाव पोलिसांनी बिर्याण्या भोसले व दीपक सिल्व्हर काळे या आरोपींना अटक केली होती. आरोपी दि. ६ फेब्रुवारीपासून शेवगावच्या न्यायालयीन कोठडीत होता. गेल्या २७ फेब्रुवारीस त्याला गेवराई पोलिसांनी तपासासाठी नेले होते. त्यानंतर पुन्हा शेवगाव येथे न्यायालयीन कोठडीत ठेवले. शेवगाव पोलिसांनी मृत भोसले याच्याकडून शिंगोरी दरोडय़ातील काही मुद्देमालही हस्तगत केला. याच गुन्ह्य़ातील दीपक काळे (लखमापुरी, ता. शेवगाव) यास गुन्ह्य़ात नसल्याचा निर्वाळा देऊन न्यायालयामार्फत मुक्त केले होते.
आज पहाटे चार-पाचच्या दरम्यान भोसले याने अंगातील शर्ट छताखाली असणाऱ्या गजास बांधून आत्महत्या केली. गार्ड अंमलदार सतीश शुक्रे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर भोसलेची आई, पत्नी व अन्य नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या आकांताने एकच गदारोळ उडाला. भोसले यास पोलिसांनी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. भोसलेचा मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नातेवाईकांच्या मागणीनुसार नेण्यात आला. त्याच्याविरुद्ध विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यास भेट दिली. या वेळी भटक्या-विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते प्रा. किसन चव्हाण व मृत भोसले याच्या नातेवाईकांशी त्यांनी चर्चा करून या प्रकरणाची सीआयडी विभागातर्फे चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या वेळी पोलीस उपअधीक्षक दत्तात्रेय गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे, पोलीस निरीक्षक भास्कर पवार हजर होते. त्यानंतर संध्याकाळी श्री. डोंगरे यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला.
भोसलेच्या पत्नीची तक्रार
भोसलेची हत्या की आत्महत्या याचा तपास व्हावा, तसेच त्याच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी भटके-विमुक्त संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आरोपी ज्या कोठडीत होता, त्याच कोठडीत इतरही सहा-सात आरोपी होते. त्यांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही? तसेच भोसलेची पत्नी नूरकासबाई हिने आपला पती बिर्याण्या यास नगर येथील सबजेलमध्ये पाठवावे, असे दोनवेळा अर्जही दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा तहसीलदार कार्यालयातील जेलर म्हणून कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे असतो. त्याने आपली जबाबदारी पार पाडली नाही, असाही आरोप होत आहे. तथापि गेल्या दोन महिन्यांपासून शेवगावला तहसीलदार नसल्याने अनागोंदी कारभार चालू असल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी या वेळी केला.