Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

असाही देवमाणूस
मी बडोद्याला आणि पुण्याला शिकत असताना सुटीत घरी येताना सर्व बाडबिस्तरा घेऊन येत असे. कारण परत गेल्यावर ज्या ठिकाणी पूर्वी राहत असे ती जागा मिळण्याची शाश्वती नसायची. संगमनेरहून गावी धांदरफळला जाताना प्रवासाच्या सोयी नसल्याने पायीच जावे लागायचे. त्यामुळे सोबतचे सामान संगमनेरमधील शेटे खानावळीत

 

ठेवून जात असे.
अशाच एका सुटीत मी गावी आलो व पुन्हा परत जाताना सामान घेण्यासाठी शेटे खानावळीत गेलो, तेव्हा समजलं की एक वकील माझं नाव सांगून सामान घेऊन गेले. संगमनेरमध्ये त्यावेळी अगदी थोडेच वकील होते. यात दोनच बहुजन समाजाचे. पैकी एक मुस्लिम, ज्यांचे नाव व ठावठिकाणा मला माहीत नव्हता. दुसरे कोण ते माझ्या लक्षात आले. मी त्यांच्याकडे जाऊन माझे सामान घेतले व पुण्याला गेलो. या पहिल्याच भेटीत मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलो. जवळपास सहा फूट उंची, गोरापान तांबूस वर्ण, पांढरे शुभ्र कपडे, उंच रूंद भाळावर गंधाचा टिळा. प्रथमदर्शनीच त्यांचा समोरच्यावर प्रभाव पडायचा. जाताना त्यांनी मला सांगितले की, येथून पुढे गावी जाताना तुम्ही माझ्याकडे सामान ठेवत जा. पुढे मी तसेच करू लागलो. नंतर मला समजले की ते मूळचे धांदरफळ बुद्रुकचे रहिवासी आहेत. वयाने त्यांच्यापेक्षा खूपच कमी असतानाही ते मला मित्रासारखे वागवायचे.
असाच एकदा पुण्याहून आलो असता त्यांच्याकडे सामान ठेवून गावी जावयास निघालो. तेही निघाले आणि माझ्याबरोबर पायी चालू लागले. त्यांनी चपला हातात घेतल्या होत्या व अनवाणी चालत होते. मलाच लाज वाटली म्हणून त्यांच्याकडे चपला मागितल्या, पण त्यांनी दिल्या नाहीत. म्हणाले, गावातल्या नेहमीच्या चर्मकाराकडे दुरुस्त करायला घेऊन चाललोय. मी विचारले, संगमनेरला का नाही दुरुस्त केल्या. ते म्हणाले, अहो, त्याला पैसे द्यावे लागतात. मनात आलं कंजूष माणूस. पण तसे बोलणार कसा. असेच एकदा संगमनेरला आलो असता ते म्हणाले, चला, भाजी आणायला बाजारात जाऊ. मी त्यांच्याबरोबर निघालो. सतरा ठिकाणी फिरून अखेर त्यांनी अतिशय स्वस्तात भाजी खरेदी केली. माझं एक ठाम मत बनलं. दिसायला देखण्या स्वरूपाआड हा एक पैशावर प्रेम करणारा माणूस आहे.
पुढे ते मला कधी कधी त्यांच्या घरी मुक्कामास ठेवीत. कधी शेतावरही घेऊन जात. एकदा असाच त्यांच्याबरोबर शेतावर गेलो. त्यांनी नवीनच किलरेस्कर इंजिनची पेटी आणून ठेवली होती. आमच्याबरोबर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील एक पाटील होते. त्यांना ते नवीन इंजिन आवडले. त्यांनी ते मागितले. वकीलसाहेबांनी एक सेकंदाचाही विचार न करता देऊन टाकले. पाटलांनी इंजिनाच्या किमतीबद्दल विचारले. वकीलसाहेबांनी उत्तर दिले, इंजिनाची किंमत विचारायची नाही. ती तुम्ही द्यायची नाही व मी घ्यायची नाही. मी तर अवाक्च झालो व मनात लाजलो.
एक दिवस सहज बोलता बोलता त्यांनी मला विचारले, तुम्ही मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेताना कुठे राहत होता? मी म्हणालो, गावी जाऊन-येऊन शिकलो. यावर ते मला म्हणाले, मीही तसेच जाऊन-येऊन शिक्षण घेतले. क्षणभर थांबून ते म्हणाले, खेडेगावातून येणाऱ्या सर्व जाती-जमातीच्या मुलांसाठी संगमनेरला वसतिगृह काढले पाहिजे. सहा-सात महिन्यांतच त्यांनी आपला संकल्प सिद्धीस नेला. अकोले रस्त्यावर म्हाळुंगी नदीतिरावर पुलापलीकडे त्यांनी स्वखर्चाने वसतिगृहाची इमारत उभी केली. मी त्यांना म्हणालो, एवढा खर्च तुम्ही केला. थोडी तरी वर्गणी जमविली पाहिजे. त्यांचे उत्तर आले, समाजाने आपल्यासाठी पुष्कळ केले. आपण थोडेतरी समाजाचे उतराई व्हायला पाहिजे. माझा हा छोटासा प्रयत्न आहे. पुन्हा हा विषय काढू नका. मी आश्चर्यचकित झालो. चपला दुरुस्तीसाठी सात मैल पायी जाऊन पैसे वाचविणारे हेच ते वकील आहेत का!
पुढे एकदा ग्वाल्हेरवरून एक सद्गृहस्थ वकीलसाहेबांकडे आले आणि म्हणाले, मला इंग्लंडला शिकायला जायचे आहे. काही मदत करता येईल काय? वकीलसाहेब उद्गारले, हो का नाही. दुसऱ्याच दिवशी गावी जाऊन जमिनीचे सात-बाराचे उतारे आणले. सावकाराकडे गेले व आपली जमीन गहाण ठेवली. आलेली रक्कम त्या गृहस्थाच्या हाती दिली. त्याला भरभरून आशीर्वाद देऊन रवाना केले. मी विचारले, अहो तुमचे पैशाचे काय? ते म्हणाले, मला इतरांनी अशीच मदत केली म्हणून मी शिकलो. कदाचित तुम्हालाही थोडाबहुत अनुभव असेलच. मग आपण नको का दुसऱ्यांना मदत करायला? आता मात्र माझे डोळे उघडायला लागले. मी वकीलसाहेबांच्या स्वभावाचा ठाव घेऊ लागलो.
एका रविवारी आम्ही दोघे सकाळी असेच बसलो होतो. एक गोरापान, चलाख दिसणारा माझ्या वयाचा मुलगा आला. त्याने त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची व आर्थिक अडचणीची माहिती वकीलसाहेबांना कथन केली. त्यांनी त्याला विचारले, शेती करशील काय? उत्तर आले होय. वकीलसाहेब म्हणाले, उद्या दुपारी कोर्टात ये. तो आला. वकीलसाहेबांनी संगमनेर खुर्दची प्रवराकाठची १५ रुपये साऱ्याची जमीन त्याच्या नावे करून दिली. त्याला जमिनीचा कब्जा दिला अन् ‘सुखी रहा’ म्हणाले. किमतीचे काहीच बोलले नाही. काय हा देवमाणूस! माझी मलाच लाज वाटायला लागली. कंजूष, पैशाचा लोभी म्हणेपर्यंत पाप माझ्या हातून झाले. परंतु हे तर धर्मासारखे उदार. माझ्या पश्चातापाला पारावार राहिला नाही. त्यांच्या अशा बऱ्याच कहाण्या आहेत.
सत्यशोधक विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. १९३५ सालच्या कायद्यानुसार १९३७-३८ साली जी निवडणूक झाली त्यात ते काँग्रेस पक्षाचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. काही काळ ते लोकल बोर्डाचे अध्यक्षही होते. शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं, म्हणून विधानसभेत सर्वप्रथम भाषण करणारे आमदार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले पाहिजे, म्हणून ते पक्षाचा रोष पत्करून आचार्य अत्र्यांबरोबर उभ्या महाराष्ट्रभर फिरले. आपल्या घणाघाती वक्तृत्वाने उभा महाराष्ट्र गाजवला. अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या. या वकिलाचं नाव के. बी. देशमुख! तेच पुढे माझे सासरे झाले.