Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

‘सामान्यातले असामान्यत्व फुलविणे म्हणजे सहकार’
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

सामान्यातले असामान्यत्व फुलविणे म्हणजे सहकार. मात्र, सहकाराचा मूलमंत्र विसरलेल्या राज्यकर्त्यांनी देशाला दरिद्री ठेवले आहे. देश महासत्ता बनवायचा असेल, तर सहकाराशिवाय पर्याय नाही. सर्वसामान्यांचा आधार बनून त्यांना उभे करण्याचा सहकाराचा उद्देश नगर र्मचट्स बँक पूर्ण

 

करीत आहे, असे प्रतिपादन सारस्वत बँकेचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ ठाकूर यांनी केले.
नगर र्मचट्स बँकेच्या गुलमोहर रस्ता शाखेचे आज नूतन इमारतीत स्थलांतर झाले. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ठाकूर बोलत होते.
आमदार अनिल राठोड, महापौर संग्राम जगताप, बँकेचे संस्थापक हस्तीमल मुनोत, अध्यक्ष आनंदराम मुनोत, उपाध्यक्ष संजय बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पितळे आदींसह संचालक या वेळी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले की, देशातील ७५ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली असताना देश महासत्ता होणार असल्याचा दावा करणे म्हणजे भूलथाप आहे. सरकारी अनुदानावर चालणारे साखर कारखाने, गिरण्या यांच्यामुळे सहकारात भ्रष्टाचार आला. नागरी सहकारी बँकांनीच खऱ्या अर्थाने सहकार सफल केला. शाखा विलिनीकरण होण्याच्या या काळात ‘र्मचट्स’ची प्रगती ही त्यांच्या आदर्श व्यवहाराची साक्ष आहे.
गुजराथी म्हणाले की, स्वार्थातून सहकार चळवळीला ग्रहण लागले. अशा काळात ‘र्मचट्स’च्या संचालकांनी स्वतसाठी गाडय़ा-घोडय़ा न वापरता काटकसरीचा आदर्श निर्माण केला. साडेनऊ टक्के व्याजाने कर्ज देणारी, कर्मचाऱ्यांना विमा, ४ टक्के रिबेट देणारी नगर र्मचट्स राज्यातील एकमेव बँक आहे.
हस्तीमल मुनोत यांचेही भाषण झाले. महिला दिनानिमित्त बँकेच्या संचालिका मीना मुनोत, शकुंतला बोरा, प्रमिला बोरा यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.