Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

वाळूउपसा रोखण्याच्या आदेशाला केराची टोपली!
श्रीगोंदे, ८ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील भीमा व घोड नदीपात्रात सुरू असणारा वाळूचा उपसा त्वरित थांबवून तस्करांवर कडक कारवाई करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी दिलेल्या आदेशाला येथील महसूल यंत्रणेने केराची टोपली दाखवित, वाळूतस्करांना हात दाखविण्याऐवजी चक्क हातभार

 

लावला.
तालुक्यातील बिनधास्त सुरू असणाऱ्या वाळूउपशाचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी अन्बलगन यांनी यावर तातडीने कारवाई करण्याबाबतचे आदेश प्रांत कार्यालयाला दिले. तेथून येथील तहसील कार्यालयात तो आदेश ‘फॉरवर्ड’ करण्यात आला. मात्र, नंतर या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. वाळूतस्करांना मदतीसाठी निरोप पाठवून दोन दिवसांत सगळ्या बोटी वर घ्या, ट्रॅक्टरवाल्यांनी उपसा करू नये, साहेब येणार आहेत असा निरोप पाठविला. तहसील कार्यालयात अधिक चौकशी केली असता, येथे तहसीलदार नाहीत, शिवाय श्रीगोंदेची यात्रा आहे. महसूल यंत्रणा यात्रेत गुंतली आहे. यापूर्वी वाळूतस्करीचे पाठविलेले अहवाल अजून जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडून आहेत. आता काय फरक पडणार आहे, अशी कुजबूज ऐकायला मिळाली. एकीकडे भीमा व घोड पात्रांतून बेसुमार वाळूउपसा महसूलच्याच आशीर्वादाने सुरू असताना दुसरीकडे काष्टी येथील काढलेला लिलाव घेण्यास मात्र कुणीही ठेकेदार धजावला नाही. भूजल सर्वेक्षणात काष्टीत मोठय़ा प्रमाणात वाळू असलेल्या अहवालावरून तेथील वाळूचा लिलाव काढला होता. पण ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी लिलाव होता, तेथे वाळू नव्हे खडक उरला आहे. कारण वाळू कधीच चोरीला गेली आहे. दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणारे सांगळे उद्या (सोमवारी) तहसीलदाराचा पदभार स्वीकारणार असल्याचे समजले. आता ते तरी वाळूतस्करांना हिसका दाखविणार का, याविषयी उत्सुकता आहे.