Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

‘श्रीगोंदे’च्या पदाधिकाऱ्यांचे वीजप्रश्नी आजपासून उपोषण
श्रीगोंदे, ८ मार्च/वार्ताहर

श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्यास अखंडितपणे व उच्चदाबाने वीजपुरवठा करण्यासाठी सन १९९७पासून पाठपुरावा करूनही वीज कंपनीने कार्यवाही केली नाही. कारखान्यास अखंडित वीज पुरविण्याच्या मागणीसाठी उद्यापासून (सोमवार) उपोषण सुरू करण्याचे कारखान्याच्या संचालक

 

मंडळाने ठरविले आहे. अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष केशवराव मगर, कार्यकारी संचालक, कार्यकर्ते, अधिकारी व कामगार उपोषणात सहभागी होणार आहेत.
श्री. मगर यांनी सांगितले की, श्रीगोंदे कारखाना वीज कंपनीचा उच्चदाब औद्योगिक ग्राहक असून कारखान्याला वीजकपात न करता सलग उच्चदाबाने वीजपुरवठा करावा, यासाठी कारखान्याने सन १९८५मध्ये स्वखर्चाने स्वतंत्र ११ केव्ही अतिदाब वाहिनी टाकून स्वमालकीचे रोहित्र बसविले आहे. त्यामुळे कारखान्यास अखंडित वीजपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, वीज कंपनीने काही दिवस सलग वीजपुरवठा केल्यावर कारखान्याच्या लाईनवर इतर ग्राहकांना वीजकनेक्शन जोडून दिली व पुन्हा वीजकपात सुरू केली. त्यामुळे कारखान्यास गळीत हंगाम चालू नसताना ५०० अश्वशक्तीचे जनित्र चालवून वीजनिर्मिती करावी लागते. परिणामी कारखान्यास लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. श्री. नागवडे यांनी याप्रश्नी सतत पाठपुरावा, पत्रव्यवहार केला. तत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे व विद्यमान ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्याही निदर्शनास हा प्रकार आणला. मात्र, कंपनीने या मागणीकडे कानाडोळा करण्याची भूमिका घेतली. त्यामुळेच उद्यापासून उपोषण करण्यात येणार असल्याचे वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, कारखान्याच्या मागणीकडे कानाडोळा करणाऱ्या वीज कंपनीने जागे होत कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. याबाबत लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, कारखान्याने कंपनी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करीत नाही, तोपर्यंत उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.