Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

रखडलेल्या केडगाव पाणीयोजनेचे काम सुरू
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

रखडलेले केडगाव पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर सुरू झाले. नागापूर ते केडगावमधील लालाजीनगर अशी सुमारे साडेतेरा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यासाठी लाईन-आऊट

 

करण्यास ठेकेदाराने सुरुवात केली.
संपूर्ण केडगावला नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेचे काम पुण्यातील ‘अ‍ॅक्वा पंपस्’ कंपनीने घेतले आहे. टाक्या तसेच वीजपंप असे तांत्रिक काम करणाऱ्या या कंपनीने पाईपलाईन टाकण्याचेही काम घेतले. मात्र, त्यासाठी त्यांना योग्य ठेकेदार मिळत नव्हता. त्यामुळे संपूर्ण कामच रखडले होते.
कंपनीने योजनेसाठी लागणारे वीजपंप व अन्य साहित्याची ऑर्डर दिली होती. मात्र, प्रत्यक्षात काम काहीच दिसत नसल्याने स्थानिक राजकीय व्यक्तींकडून आरडाओरड सुरू झाली. नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी तर काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, मनपाने कंपनीला पत्र देऊन काम तातडीने सुरू करण्याची सूचना दिली.
त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी अभियंता एस. ए. शेख यांनी मनपात येऊन महापौर संग्राम जगताप, उपायुक्त अच्युत हांगे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांच्याशी चर्चा केली. जलवाहिनीचे काम एका ठेकेदाराने घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर काम लगेच सुरू करत असल्याबाबतचे पत्रही दिले. मनपाने या योजनेचे सर्व पाईप कंपनीला हस्तांतरित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
त्याप्रमाणे पाईप हस्तांतरित करण्यात येत असून, कंपनीने लाईन आऊटचे काम सुरू केले असल्याचे निकम यांनी सांगितले. या योजनेसाठी नागापूर येथील टाकीतून पाणी घेतले जाईल. तेथून ते जलवाहिनीतून लालाजीनगर येथील केडगावसाठीच्या टाकीत आणले जाणार आहे. या टाकीपासून केडगावअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याच्या कामाची वर्कऑर्डरही दिलेली असून, मुख्य वाहिनीचे व टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर हेही काम सुरू होईल, असे निकम म्हणाले. या संपूर्ण योजनेसाठी वेळेचे बंधन असून, विहित वेळेत काम पूर्ण व्हावे, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.