Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

सिद्धिबागेच्या नूतनीकरणात दुसऱ्याच दिवशी खोडा
त्यांना हवा ‘टक्का’!
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

खुद्द महापौरांच्याही इच्छेला न जुमानण्याच्या काही ज्येष्ठ माजी व आजी पदाधिकाऱ्यांच्या वृत्तीतूनच सिद्धिबागेच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बंद पडले. यामुळे शहराच्या मध्यभागातील मुलांना सुटीत ही बाग उपलब्ध करून देण्याची महापौर संग्राम जगताप यांची इच्छा अपुरीच राहण्याची चिन्हे आहेत.
काम सुरू करण्याच्या कार्यक्रमाला हे आजी-माजी पदाधिकारीही उपस्थित होते, हे विशेष! तत्कालीन उपमहापौर दीपक सूळ यांनी सुमारे १७ लाखांचा हा आराखडा विशेष प्रयत्न करून आयुक्त कल्याण केळकर यांच्याकडून मंजूर करून घेतला. त्यानंतर कार्यारंभ आदेशही ठेकेदाराला देण्यात आला. पण मनपा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम लांबणीवर पडले. ते आता महापौर जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने सुरू झाले, तर त्यावर लगेचच ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचे गंडांतर

 

आले.
‘टक्केवारी’चा मनपातील नेहमीचा रिवाज या कामात आडवा आला असल्याची माहिती मिळाली. मनपाचे अभियंता यावर काही बोलायला तयार नाहीत व काम घेतलेल्या ठेकेदाराला काही सांगायचे नाही. सूळ यांचे म्हणणे ‘कामाला आमची काही हरकत नाही’ असे आहे, तर याच भागातील माजी नगरसेवक कृष्णा जाधव व विद्यमान नगरसेवक असलेले त्यांचे चिरंजीव धनंजय जाधव हे तर कार्यक्रमाला उपस्थित होते. मग कामावर संक्रांत आणली कोणी, यावर ‘एका ज्येष्ठाने’ इतकीच चर्चा मनपा वर्तुळात आहे. लहान मुलांशी निगडीत कामांतून तरी कसली अपेक्षा बाळगू नये, असेही यावर ठेकेदार वर्तुळात बोलले जाते. ‘आमचे समाधान झाल्याशिवाय काम सुरू करायचे नाही’, असा दमच काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मजुरांना संबंधितांकडून देण्यात आल्याची माहिती मिळाली. असे ‘समाधान’ करण्याची गरज वाटत नाही म्हणून ठेकेदाराने दुसऱ्याच दिवशी सर्व मजूर काढून घेतल्याने हे काम सध्या बंदच आहे.
सिद्धिबाग ही शहरातील एकमेव मध्यवर्ती बाग आहे. तिची अवस्था एखाद्या सार्वजनिक कचराकुंडीसारखी झाली आहे. मनपाच्या उद्यान विभागाचे या बागेकडे लक्ष नाही. गांजा, अफू, चरस असली व्यसने करणाऱ्यांचा ही बाग म्हणजे हक्काचा अड्डा झाला आहे. तिची ही दुरवस्था बघूनच सूळ यांनी १७ लाख खर्चाचा विकास आराखडा बनवला. त्यात हिरवळ, प्रकाशयोजना, खेळणी, बाके आदींचा समावेश आहे. हे काम झाल्यावर या बागेला एक वेगळेच नवे रूप येईल. मात्र, ते व्हावे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपल्याला काय मिळवता येईल, याच हेतूने काहीजणांकडून कामाला आडकाठी आणली जात आहे. महापौरांनीच यात लक्ष घालून संबंधिताला समज द्यावी, अशी स्थानिक नागरिकांची इच्छा आहे.
आचारसंहितेची आडकाठी नाही
लोकसभेची निवडणूक आचारसंहिता सुरू असली, तरी कार्यारंभ आदेश त्यापूर्वीच निघाला असल्याने हे काम आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही. मनपा ते या कालावधीतही सुरू करू शकते. मात्र, त्या ‘ज्येष्ठ हातामुळे’ मनपाचे अभियंते ठेकेदाराला संरक्षण द्यायला तयार नाहीत.