Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सबलांचा गौरव
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

अबला नसून सबला असल्याचे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविणाऱ्या महिलांचा सत्कार करीत विविध संस्था-संघटनांनी आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. रोटरीने ५६०

 

विद्यार्थिनींची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी केली.
जय आनंद महावीर महिला मंडळातर्फे आज लक्ष्मीबाई कानडे, मीना शिंदे, प्रतिभा गांधी, निर्मला सुराणा व लीला दायमा यांचा प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करीत केलेल्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. छाया फिरोदिया यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या महिलांना गौरविण्यात आले.
मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. महिला गटात स्नेहल छाजेड (प्रथम), सायली मोडकर (द्वितीय), अर्चना सोळंकी (तृतीय), संगीता क्षीरसागर, रूपाली नेवासकर, संध्या पावसे (उत्तेजनार्थ) विजेत्या ठरल्या. युवती गटात मेघा कांबळे व पूजा तागड यांनी बक्षिसे मिळविली. हेमा निसळ व गौरी जोशी परीक्षक होत्या.
‘प्रयास ग्रूप’तर्फे हॉबी होम, आईस्क्रीम, संगणक, प्रशिक्षण वर्ग, वन मिनिट स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले. अर्चना लढ्ढा, सुनीता लोंढे, प्राजक्ता गांधी यांनी मार्गदर्शन केले. कुमूदिनी जोशी, विजया बोरा, शारदा लढ्ढा, अलका मुंदडा या वेळी उपस्थित होत्या.
केडगावातील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात रोटरी मिडटाऊनच्या वतीने रक्तगट व हिमोग्लोबीन शिबिरात ५६० विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. डॉ. बी. बी. शिंदे, सुधीर तावरे, शिवाजी मोटे, मुख्याध्यापिका कारले या वेळी उपस्थित होते.
आयुर्वेद व्यासपीठच्या नगर शाखेतर्फे पाईपलाईन रस्त्यावरील जय बजरंग विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. छाया फिरोदिया यांनी शिबिराचे उद्घाटन केले. महापालिकेच्या डॉ. सुजाता साळवी, आशा शेलार या वेळी उपस्थित होत्या. डॉ. दीपा भणगे यांनी प्रस्ताविक , तर अंशु मुळे यांनी सूत्रसंचालन केले.
साईसूर्य नेत्र सेवातर्फे ‘स्त्रिया व त्यांचे आरोग्य’ याविषयी परिसंवाद घेण्यात आला. डॉ. रेणुका पाठक, डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मार्गदर्शन केले. मेघना फडणीस यांनी प्रास्ताविक केले. ओम मल्टिस्पेशालिटी क्लिनिकमध्ये मोफत स्त्री रोग चिकित्सा शिबिर घेण्यात आले. ४४ महिलांची मोफत तपासणी करून त्यांना होमिओपॅथिक औषधे देण्यात आली. तालुका पंचायत समितीतही महिला दिन साजरा करण्यात आला.
स्नेहालय संस्थेतर्फे देहव्यापार सोडून पुनर्वसित झालेल्या जिल्ह्य़ातील ५ महिलांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विश्वस्त मीना शिंदे यांनी १ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह या महिलांना प्रदान केले. या वेळी २०० शोषित महिला उपस्थित होत्या.