Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

नगर र्मचट्स बँकेच्या गुलमोहर रस्ता शाखेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार एकनाथ ठाकूर, हस्तीमल मुनोत, आनंदराम मुनोत, संजय बोरा, मीना मुनोत आदी.

गोळीबाराचे प्रकरण पद्धतशीर दडपले!
श्रीरामपूर, ८ मार्च/प्रतिनिधी

वसुलीच्या वादातून शहराच्या मध्यवर्ती भागात आज सकाळी अकराच्या सुमारास तरुणावर गोळीबार करण्यात आला. अण्णासाहेब अप्पासाहेब पोलादे (वय ४५) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. साखर कामगार रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु गोळीबाराचे प्रकरण पोलिसांनी दडपले!

कोठडीतील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
सीआयडी चौकशीचे आदेश

शेवगाव, ८ मार्च/वार्ताहर

येथील पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या बिर्याण्या चिंग्या भोसले (वय ४०, खांडवी, तालुका गेवराई) या आरोपीने आज पहाटेस कोठडीच्या गजाला शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांनी संध्याकाळी दिला.सुमारे दोन महिन्यांपूर्वी तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगोरी शिवारात दरोडे घालून तेथील रहिवाशांना बेदम मारहाण करून लूट करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.

असाही देवमाणूस
मी बडोद्याला आणि पुण्याला शिकत असताना सुटीत घरी येताना सर्व बाडबिस्तरा घेऊन येत असे. कारण परत गेल्यावर ज्या ठिकाणी पूर्वी राहत असे ती जागा मिळण्याची शाश्वती नसायची. संगमनेरहून गावी धांदरफळला जाताना प्रवासाच्या सोयी नसल्याने पायीच जावे लागायचे. त्यामुळे सोबतचे सामान संगमनेरमधील शेटे खानावळीत ठेवून जात असे.अशाच एका सुटीत मी गावी आलो व पुन्हा परत जाताना सामान घेण्यासाठी शेटे खानावळीत गेलो, तेव्हा समजलं की एक वकील माझं नाव सांगून सामान घेऊन गेले.

‘सामान्यातले असामान्यत्व फुलविणे म्हणजे सहकार’
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

सामान्यातले असामान्यत्व फुलविणे म्हणजे सहकार. मात्र, सहकाराचा मूलमंत्र विसरलेल्या राज्यकर्त्यांनी देशाला दरिद्री ठेवले आहे. देश महासत्ता बनवायचा असेल, तर सहकाराशिवाय पर्याय नाही. सर्वसामान्यांचा आधार बनून त्यांना उभे करण्याचा सहकाराचा उद्देश नगर र्मचट्स बँक पूर्ण करीत आहे, असे प्रतिपादन सारस्वत बँकेचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ ठाकूर यांनी केले.

वाळूउपसा रोखण्याच्या आदेशाला केराची टोपली!
श्रीगोंदे, ८ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील भीमा व घोड नदीपात्रात सुरू असणारा वाळूचा उपसा त्वरित थांबवून तस्करांवर कडक कारवाई करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी दिलेल्या आदेशाला येथील महसूल यंत्रणेने केराची टोपली दाखवित, वाळूतस्करांना हात दाखविण्याऐवजी चक्क हातभार लावला.

टेम्पोतील प्रवाशाकडील ४५ हजार रुपये लुटले
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

टेम्पोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडील ४५ हजार रुपये टेम्पोचालक व चौघाजणांनी लुटले. हा प्रकार काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विळद घाटात नगर-मनमाड रस्त्यावर घडला. एमआयडीसी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भानुदास महादेव खरात (रा. डॉन बॉस्को कॉलनी, सावेडी) यांनी फिर्याद दिली. खरात काल रात्री एमएच १६ क्यू १५९३ या क्रमांकाच्या टेम्पोतून नगरकडे येत होते. विळद घाटात दोन मोटरसायकलवरून आलेल्या चौघाजणांनी टेम्पो अडवला. या चौघांनी खरात यांना धमकावून त्यांच्याजवळील ४५ हजार रुपये रोख व मोबाईल काढून घेतला. विशेष म्हणजे या चोरटय़ांना टेम्पोचालकाने मदत केली. खरात यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात तरुण व टेम्पोचालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे.

जुगारअड्डय़ावरील छाप्यात सहाजणांना अटक
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल जयभवानीच्या मागे चालणाऱ्या जुगारअड्डय़ावर छापा घालून सहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून ७ हजार १८० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. आज दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या जालिंदर रंगनाथ आम्ले, अशोक भास्कर पवार, नवनाथ भगवान जाधव, लक्ष्मण मोहन शिंदे, माधव नामदेव शिंदे, आदेश आसाराम लोंढे (रा. बोल्हेगाव, सिद्धार्थनगर) यांना अटक केली. या सर्वाविरुद्ध तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परदेशी, पोलीस अरुण घोडके, दीपक हराळ, सुनील चव्हाण, गणेश धुमाळ, राजू वाघ, जाकीर सय्यद, चालक रक्ताटे यांनी ही कारवाई केली.

वृत्तपत्राचा एजंट असल्याचे सांगून फसवणाऱ्यास अटक
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

वृत्तपत्राचा एजंट असल्याचे सांगून बिले उकळणाऱ्या एका मुलास सुडकेमळ्यातील नागरिकांनी पकडून तोफखाना पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.
आज दुपारी सुडकेमळ्यातील आर्यन गार्डनमध्ये हा मुलगा गेला व तेथील नागरिकांना पेपरचे बिल मागू लागला. आपण बिल भरल्याचे लोकांनी सांगितले. आपण स्वत पेपरचे एजंट असल्याचे या मुलाने सांगितल्यावर एका नागरिकाने खऱ्या एजंटला दूरध्वनी केला. तो आल्यानंतर या बनावट एजंटचे पितळ उघडे पडले. नंतर नागरिकांनी या बनावट एजंटला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. या मुलाने सुडकेमळ्यात अनेकांना गंडा घातला. कधी पेपरचे बिल, तर कधी विजेचे बिल त्याने मागितले. वीजबिल मागून तो सव्‍‌र्हे सुरू असल्याचे नागरिकांना सांगत असे. तोफखाना पोलिसांनी परवाच एका तोतया पोलिसास पकडून गजाआड केले.

सैनिक क्लबच्या आवारातील चंदनाच्या २ झाडांची चोरी
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

औरंगाबाद रस्त्यावरील सैनिक क्लबच्या आवारातील दोन चंदनाची झाडे चोरटय़ांनी काल रात्री कापून नेली. या झाडाची किंमत एक हजार रुपये असून, या प्रकरणी किशनसिंग जयलाल सांगवान यांनी तोफखाना ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरटय़ांनी चंदनाची झाडे खोडापासून कापून नेली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

अज्ञात वाहनाची धडक बसून तरुणाचा मृत्यू
नगर, ८ मार्च/प्रतिनिधी

अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नगर-पाथर्डी रस्त्यावर कौडगाव शिवारात झाला. नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अशोक रामभाऊ लांडगे (वय ३२, रा. पिंपळगाव लांडगा) असे मृताचे नाव आहे. अज्ञात वाहनाची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांचा भाऊ राजेंद्र लांडगे यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविले. तेथे त्यांचे निधन झाले.