Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

भलामोठ्ठा फ्रॉक!
नागपूर, ८ मार्च/प्रतिनिधी

२५५ फूट उंच.. १८० फूट रुंद.. साडेचार हजार मीटर कापड.. ५ लाख रुपये खर्च.. आणि ४५ दिवसांची मेहनत.. कोराडी शहरातील मिता गुलशन या महिलेने आर्थिक कुवत नसतानासुद्धा, सर्वात मोठा फ्रॉक तयार करून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक किंवा लिम्का बुकात नोंद होण्यासाठी नाही तर, फक्त आणि फक्त देशप्रेमासाठी मिताने हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमासाठी मिताला कर्जबाजारीही व्हावे लागले आहे.

धान्य आणखी महागणार?
नागपूर, ८ मार्च/प्रतिनिधी

महागाई निर्देशांकात घट झाली असली तरी यंदा खराब वातावरणामुळे तांदूळ आणि गहू या दोन प्रमुख पिकांवर परिणाम झाला आहे. जानेवारी महिन्यात तांदळाचे नवे पीक आले असले, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तसेच फारशी थंडी न पडल्याने गव्हाच्या पिकावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा गव्हाच्या किमतीही वाढल्या आहेत.

महिला आरक्षणाबाबत युपीएच्या भूमिकेवर संशय -नजमा हेपतुल्ला
नागपूर, ८ मार्च/ प्रतिनिधी

यूपीएच्या अध्यक्षपदी महिला असून देखील महिला आरक्षण विधेयक पारित होऊ शकले नाही. यावरूनच या विधेयकाबाबत युपीएच्या प्रमुख व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होतो, असा आरोप राज्यसभेच्या माजी उपाध्यक्ष व भाजप नेत्या नजमा हेपतुल्ला यांनी केला.महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे म्हणून सर्वच पक्ष व्यासपीठावरून बोलतात पण, त्यासंबंधित विधेयक लोकसभेत संमत होऊ शकत नाही.

.. लेकीच्या माहेरासाठी गं माय सासरी नांदते!
चंद्रकांत ढाकुलकर

काल साऱ्या भारतभर जागतिक महिला दिन साजरा झाला. चर्चासत्र, उद्बोधन, प्रबोधन, विचारमंथनाच्या फैरी झडल्या. नागपूरसह साऱ्या विदर्भातही प्रभातफेऱ्या गावभर फिरल्या पण, याच महिला दिनाच्या अगदी पूर्वसंध्येला साऱ्या समाजमनाला सुन्न करणारी घटना याच विदर्भात घडली, त्याचा साधा ओरखडाही या समाजमनावर उमटला असावा, असे आज अखेर जाणवलेले नाही.

रसवंतीऐवजी आता ‘ज्युस बार’
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील विविध ठिकाणी थंड पेये असलेली दुकाने थाटली जातात. अनेक भागात उसाच्या रसाच्या रसवंती आणि हातठेल्यांचीही वर्दळ वाढली आहे. मात्र, त्यांची संख्या हल्ली रोडावली आहे. ग्रामीण आणि शहरातही पूर्वी अशा रसवंती मोठय़ा प्रमाणात दिसत, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये रसवंतीऐवजी ‘ज्यूस बार’चे दिसू लागल्याने रसवंतींवर संक्रात येते की काय अशी भिती निर्माण झालीआहे.उन्हाळा तापायला लागला की पूर्वी उसाच्या रसवंतींमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत असे.

राज्यस्तरीय नाटय़ महोत्सवात ‘काही क्षण आयुष्याचे’ प्रथम
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

कामगार कल्याण केंद्र निर्मित, रोशन नंदवंशी लिखित व दिग्दर्शित ‘काही क्षण आयुष्याचे’ या नाटकाने राज्यस्तरीय नाटय़ महोत्सवात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ५६ वा राज्यस्तरीय नाटय़ महोत्सवाची अंतिम फेरी २ ते १५ फेब्रुवारीच्यादरम्यान, पार पडली. या स्पर्धेत नागपूर गट क्रमांक १ अंतर्गत ‘काही क्षण आयुष्याचे’ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून उत्कृष्ट नाटय़ लेखन आणि दिग्दर्शनाकरिता प्रथम पुरस्कार मिळाला आहे. प्राश्र्वसंगीतकरिता वीरेंद्र लाटणकर तर, प्रकाश योजनेकरिता मिथून मित्रा यांना प्रथम पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक रोहिणी मोहरील यांना तर, अभिनयातील उत्तेजनार्थ पारितोषिक मनीष मोहरील यांना प्राप्त झाले. सदर नाटक कामगार कल्याण केंद्र आणि स्वानंद सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहोळा १७ मार्चला अभिनेता नाना पाटेकर आणि अन्य उपस्थितांच्या हस्ते पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

बहिरेपणा तपासणी शिबिरात ९० रुग्णांची तपासणी
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

श्रीवर्धन कॉम्प्लेक्समधील सोमानी श्रवणदोष केंद्रात आजपासून सुरू झालेल्या नि:शुल्क बहिरेपणा तपासणी शिबिरात पहिल्या दिवशी, शनिवारी २ ते ८५ वर्षे वयोगटातील ९० नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबिरात प्राथमिक तपासणीनंतर इलेक्ट्रॉनिक ऑडिओमिटरद्वारे श्रवणशक्ती तपासण्यात आली. त्यानंतर आढळून आलेल्या श्रवणदोष प्रकारानुसार कानाच्या मागचे, कानाच्या आतले किंवा डिजिटल सिमेंस श्रवणयंत्रांचे ट्रायल देऊन पूर्वीपेक्षा चांगले ऐकण्याचे अनुभव देण्यात आले. यानंतर श्रवणयंत्र लावून घेण्यास ईच्छुक व्यक्तींच्या कानाचे माप घेण्यात आले. अशा व्यक्तींना दुसऱ्या फेरीत श्रवणयंत्र लावून दिले जाणार आहे. शिबिरात सर्व श्रवणयंत्रावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. सोमानी श्रवणदोष केंद्राच्या संचालिका डॉ. निलू सोमानी, सिमेंस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत जाधव व त्यांचे अन्य सहकारी शिबिरात येणाऱ्यांची श्रवणदोष तपासणी करून योग्य सल्ला देत आहे. हे शिबीर ९ मार्चपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरात येताना जुने तपासणीचे अहवाल सोबत आणावे तसेच केसांना तेल लावू नये, अशी सूचनाही आयोजकांनी केली आहे.

न्या. रोही ‘मॅट’च्या सदस्यपदी
नागपूर, ८ मार्च/ प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. किशोर रोही यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठाचे न्यायिक सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात निवृत्त झालेले न्या. रोही यांचा कार्यकाळ सुमारे तीन वर्षे राहील. मॅटमधून काही महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले जी.एस. कासवा यांच्या जागी ते आले आहेत. या संदर्भात शासकीय आदेश मिळाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला. याशिवाय राज्याचे प्रभारी प्रधान मुख्य वनसंरक्षक विश्वजीत मुजुमदार यांची याच प्राधिकरणावर प्रशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी निवृत्त झालेले एम.एल. गौतम यांच्या जागी त्यांना नेमण्यात आले आहे. मुजुमदार हे अजूनही वनखात्यात कार्यरत असून, प्रधान मुख्य वनसंरक्षक ज्वालाप्रसाद हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. ते मॅटवरील नेमणूक स्वीकारतात की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या मॅटचे उपाध्यक्ष म्हणून न्या. डी.एस. झोटिंग (न्यायिक) व सुरेशचंद्र (प्रशासकीय) हे काम पाहत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सेकंड इनिंग्स’ फॅशन शो
नागपूर, ८ मार्च/प्रतिनिधी

जेसीआय नागफेम आणि विष्णू मनोहर एन्टरटेन्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सेकंड इनिंग्स’ हा फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या शेवटी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश नोंदविणे सुरू आहे. १५ मार्च प्रवेशाची शेवटची तारीख असून सर्व स्पर्धकांना १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्त्रियांसाठी वयोमर्यादा ५० तर पुरुषांसाठी ६० वर्षे ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत तीन फे ऱ्या होणार असून पहिली फेरी परिचय, दुसरी फेरी फंकी आणि प्रश्नोत्तराचा शेवटचा राऊंड ठेवण्यात आला आहे. गेल्यावेळी झालेल्या फॅशन शोमध्ये ३५ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जेसी संगीता (९७६६७७७३५५), जेसी नीता (९८२३९९९०२२), जेसी प्रीती (९८८१७५७६२६), जेसी समता (९९७०२४३८४८), जेसी आभा (९८५०२३८३०४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सुशील कुंजलवार यांचे सुयश
उमरेड, ८ मार्च / वार्ताहर

नूतन आदर्श कला, वाणिज्य आणि म.ह. वेगड विज्ञान महाविद्यालयातील प्रा. सुशील गजाननराव कुंजलवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली आहे. त्यांना निवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. के.एच. माकडे व डॉ. एन.एम. डोंगरवार यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. सुशील कुंजलवार यांना एम.एस्सी.मध्ये सूवर्णपदक मिळाले होते व विद्यापीठातून सर्वप्रथम आले होते, हे विशेष.

रेल्वेमार्गावरील विद्युत तारेला स्पर्श झालेल्या मुलाचा मृत्यू
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

रेल्वेमार्गावरील विद्युत तारेला स्पर्श होऊन भाजलेल्या मुलाचा मेडिकल रुग्णालयात रविवारी सकाळी मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश प्रकाश मडावी (रा. रामबाग) हा त्याच्या तीन-चार साथीदारांसह शनिवारी सायंकाळी अजनी यार्डात गेला. एका टँकरवर चढत असतानाच तोल गेल्याने वरच्या विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला. अचानक मोठा आवाज होत विजेचा लोळ निघाला. त्यात आकाश भाजला आणि खाली पडला. या घटनेनंतर वीज पुरवठा खंडित झाला. आवाज झाल्याने अजनी यार्डातील रेल्वे पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी लगेचच आकाशला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हवालदार अशोक मुळे महिन्याचे मानकरी
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

पाचपावली पोलीस ठाण्यातील हवालदार अशोक मुळे यांची ‘मॅन ऑफ द मंथ’ म्हणून पोलीस आयुक्तांनी निवड केली. अशोक मुळे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ५१ आरोपींना अटक करून १ घरफोडी, ३ चोरी, १ फसवणूक असे एकूण ३३ गुन्हे उघडकीस आणून एकूण २० लाख ९० हजार ६३९ रुपयांचा ऐवज जप्त केला. फेब्रुवारी महिन्यातील या उल्लेखनीय कामाबद्दल पोलीस आयुक्तांनी ‘मॅन ऑफ द मंथ’ म्हणून निवड करीत १ हजार रुपये व प्रशंसापत्र प्रदान केल़े

पाकीट चोरास नागरिकांनी बदडले
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

रेशीमबागेत रविवारी दुपारी प्रवचन संपल्यानंतर पाकीट चोरणाऱ्या एका आरोपीस नागरिकांनी पकडून यथेच्छ बदडले. जखमी चोराला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेशीमबागेत होळी महोत्सवानिमित्त संत आसारामबापू यांची प्रवचने सुरू आहेत. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास प्रवचन संपल्यानंतर मोहनलाल आठवले याच्या खिशातील पाकीट चोरण्याच्या प्रयत्नात आरोपी रणजित हिरालाल मेश्राम (रा. कपील नगर) पकडला गेला. काल प्रवचन संपल्यानंतर दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांनी रणजितला पकडले आणि यथेच्छ बदडले. हे समजताच कोतवाली पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडवले आणि मेडिकल रुग्णालयात दाखल केले.

विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या आज मुंबईत मुलाखती
नागपूर, ८ मार्च/ प्रतिनिधी

विदर्भातील दहा जागांसाठी काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती उद्या मुंबईत होणार असून सर्व इच्छुक उमेदवार मुंबईला रवाना झाले आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय अद्याप व्हायचा असताना काँग्रेसने उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज मुंबईत विदर्भ आणि मराठवाडा वगळता इतर भागातील उमेदवारांच्या मुलाखती निवड मंडळाने घेतल्या. उद्या दुपारी एक वाजता विदर्भ आणि मराठवाडय़ातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. विदर्भातील दहा जागांपैकी बुलढाणा, भंडार-गोंदिया आणि गडचिरोली या तीन जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. उर्वरित सात जागा काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे. यापैकी अमरावतीची जागा काँग्रेस रिपाइं (गवई)साठी सोडणार आहे. नागपूर येथे विद्यमान खासदार व केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार हे प्रमुख दावेदार असले तरी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. रामटेकसाठी जिल्हा काँग्रेसने एकमताने ठराव करून मुकुल वासनिक यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. वर्धेसाठी माजी खासदार दत्ता मेघे आणि हिमाचलच्या राज्यपाल प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस, चंद्रपूर येथे माजी खासदार नरेश पुगलिया आणि संजय देवतळे यांची नावे चर्चेत आहेत.

गांधीसागरात महिलेची आत्महत्या
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

गांधीसागरात उडी घेतलेल्या एका महिलेला सतर्क नाववाल्याने पाण्याबाहेर काढले. मात्र रात्री तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. श्यामलता बनवारीलाल शर्मा (रा. मेन रोड सीताबर्डी) हे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गांधीसागरवर आली. रमण विज्ञान केंद्रासमोर असलेल्या पायऱ्यांवरून तिने अचानक पाण्यात उडी घेतली. तेथून जवळच असलेल्या जगदीश खरे या नाववाल्याचे तिकडे लक्ष गेले. त्याने तातडीने धावपळ करून त्या महिलेला वाचवले आणि काठावर आणले. एव्हाना तेथे बघ्यांची गर्दी झाली. कुणीतरी पोलिसांना कळवले. गणेशपेठ पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी श्यामलताला मेडिकल रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिने गांधीसागरात उडी घेण्यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

हिस्सेवाटणीवरून बहिणीच्या कुटुंबावर हल्ला
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

शेतीच्या हिस्सेवाटणीवरून बहीण व तिच्या कुटुंबावर भावाच्या कुटुंबाने हल्ला केल्याची घटना कन्हानजवळील कामठी कॉलरीत शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा विक्रम हुमणे, त्याची पत्नी शीला व मुलगी नीकिता ही जखमींची नावे असून त्या तिघांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळकृष्ण शंकर उके व त्याची लहान बहीण शीला कृष्णा हुमणे यांच्या शेतीच्या हिस्से वाटणीवरून वाद झाला. बाळकृष्ण उके, त्याची पत्नी अंजना, मुलगा अनिल व मुलगी अर्चना यांनी शीलाच्या घरात शिरून कृष्णा, शीला व नीकिता या तिघांना लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत हे तिघेही गंभीर जखमी झाले. कन्हान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी बाळकृष्ण उके,अंजना, अनिल व अर्चना या चौघांना अटक केली.

मुलीने जाळून घेतले; पित्याविरुद्ध गुन्हा
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

अभ्यंकर नगरातील एका मुलीच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी तिच्या पित्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अभ्यंकर नगरात राहणाऱ्या शिवानी यदुराज चारभे हिने १६ जानेवारीला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पेटवून घेतले होते. मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना २३ जानेवारीला मध्यरात्रीनंतर तिचा मृत्यू झाला. अभ्यंकरनगरातील न्यू भारत विद्यालयाजवळ राहणारा आरोपी यदुराज चारभे याला मद्याचे व्यसन असून तो नशेत पत्नी व तिन्ही मुलींना रोज अश्लील शिवीगाळ व मारहाण करीत अस़े त्यामुळे सर्व त्रस्त होते. त्याला कंटाळून शिवानीने जाळून घेतल्याची तक्रार यदुराजची पत्नी संध्याने अंबाझरी पोलिसांकडे केली. पोलिसांनी तेव्हा आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. संध्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीने यदुराज चरभे याच्याविरुद्ध मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातील वैविध्यपूर्ण पैलूंवर १२ मार्चला व्याख्यान
नागपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्रातर्फे आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त १२ मार्चला प्रा. बा. ह. कल्याणकार यांचे यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातील वैविध्यपूर्ण पैलूंवर व्याख्यान होणार आहे. शंकरनगरातील राष्ट्रभाषा प्रचार सभागृहातील बाबुराव धनवटे सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गिरीश गांधी राहतील. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.