Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

जगातील विचारवंत, धर्मोपदेशक मानवाच्या ऐहिक आणि अन्य विकासाची वाट शोधताना निसर्गाला फार महत्त्व देताना दिसत नाहीत. व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्ती आणि समाज, असा विचार केला गेला आहे. पण याबरोबरच व्यक्ती आणि विश्व, व्यक्ती आणि विश्वाची नियंत्रक शक्ती याबद्दल विचार, त्यावर आधारित आचार हे भारतात जसे, जितके आणि निरंतर्याने घडले तसे अन्यत्र घडले असे

 

दिसून येत नाही. म्हणूनच इथे संतपरंपरा आजही दिसते. अन्यत्र संतपरंपरा दाखविणे अवघड जाते. मध्यकालीन वायव्य अन् उत्तर भारताच्या इतिहासात मोगल आक्रमण आणि त्याला तोंड देणाऱ्या शक्ती यांच्या संघर्षांबरोबरच तत्कालीन समाजपुरुषांची कामगिरी ध्यानी घेण्यासारखी आहे. किंबहुना ती अधिक महत्त्वाची ठरते. आज वायव्य भारत वा गांधार म्हणण्याची सोय राहिलेली नाही. उर्वरित वायव्य भारत ज्यांच्यामुळे आज शिल्लक आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे जनआंदोलन सिक्ख बांधवांचे आहे. आद्य सिक्ख आहेत गुरू नानकदेव यांच्या काळाचा वेध घेण्यापूर्वी त्यांच्या कर्मभूमीत आधी काय काय घडून गेले होते, ते पाहणे महत्त्वाचे ठरते. परकीय प्रदेशातून इथे आक्रमक म्हणून आलेले मुसलमान आणि एत्तदेशीय बहुजन हिंदू यांचे पूर्ण सख्य होऊशकले नाही. मुसलमान टोळ्यांचे पुढारी बव्हंशी लुटारू वृत्तीचे आणि असंस्कृत होते. तुलनेने स्थानिक प्रजा सहिष्णू, सोशिक व अधिक सुसंस्कृत होती. व्यक्तिगत स्वार्थाच्या मानवी मर्यादा एतद्देशीयांनादेखील होत्या, पण एकमेकांचे शिरकाण करावे, अनीतीनेच वागावे हे त्यांच्या रक्तात नव्हते. इस्लामच्या मूलतत्त्वांपेक्षा त्यांच्या युद्धखोर प्रसारकांनी जे अमानवीय उद्देश दृष्टीसमोर ठेवले, त्यात जिहाद पुकारणे, जिझिया लादणे आणि अन्य धर्मियांना काफीर ठरविणे या बाबी प्राधान्याने होत्या. इतरांना संपविण्यासाठी धर्मयुद्ध ही कल्पनाच अधार्मिक म्हणायला हवी. जे आपल्या मताचे नाहीत वा अन्य धर्मपंथाचे आहेत, त्यांना गुलाम बनविणे वा त्यांच्यावर कर लादणे ही जिझियामागची प्रवृत्ती आणि काफीर म्हणजे वध्य. प्रजेकडे अशा चमत्कारिक दृष्टीने पाहणारे मुसलमान शासक अन्य कोणत्याही देशात शासक म्हणून टिकू शकत नाहीत. इथे टिकले याचे सर्वात महत्त्वाचे कारण येथील जनांची अतिसोशिक वृत्ती आणि आपापसातील बेकी. ल्ल अशोक कामत

चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे तेथे कोणते परिणाम दिसून येतात?
चंद्रावर वातावरण नसल्यानं अनेक गंमतीशीर गोष्टी घडून येतात. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणातल्या धुळीच्या कणांमुळे, तसंच विविध वायूंच्या रेणूंमुळे सूर्यप्रकाशाचं विकिरण होतं. म्हणजे सूर्यप्रकाश सर्वत्र विखुरतो. पण चंद्रावर तसं होत नाही. त्यामुळे चंद्रावरचं आकाश नेहमी काळंच दिसतं- दिवसासुद्धा! त्यामुळे चंद्राच्या आकाशात दिवसासुद्धा तारे चमकताना दिसतात! पण हे तारे लुकलुकणार मात्र नाहीत, कारण ताऱ्यांचं लुकलुकणं हासुद्धा वातावरणामुळे घडून येणाराच परिणाम आहे! एखाद्या ग्रहाभोवतीचं वातावरण हे त्या ग्रहासाठी एक संरक्षक कवच असतं. चंद्राला हे कवच लाभलेलं नाही. त्यामुळे सूर्याकडून येणारे अतिनील (अल्ट्राव्हायोलेट), अवरक्त (इन्फ्रारेड), गॅमा असे सर्व प्रकारचे तरंग चंद्रभूमीपर्यंत पोचत असतात. त्यामुळे ही भूमी जीवसृष्टीसाठी अनुकूल नाही. तापमान तर १२० अंश सेल्सियसपर्यंत जातं. यामुळे चंद्रभूमी ‘रापून’ गेली आहे. रात्रीच्या वेळी चंद्राचं तापमान उणे १५० अंश सेंटिग्रेड इतकं घसरतं. सूर्याच्या पोटात सतत प्रचंड खळबळ चालू असते. त्यातून हजारो/लाखो कि.मी. उंचीच्या ज्वाला निर्माण होत असतात. या ज्वालांमधून विद्युतभारित कणांचे झोत बाहेर पडतात. चंद्राभोवती कवच नसल्याने हे कण चंद्रावर आदळतात. या कणांची चंद्रावरच्या मातीशी अणुगर्भीय क्रिया घडून येते. वैश्विक किरणांबाबतसुद्धा असंच घडतं. चंद्रावर जाऊन आलेल्या अंतराळवीरांच्या हेल्मेटवर अनेक बारीक खड्डे दिसून आले. हे खड्डे विश्वकिरणांमुळे निर्माण झाले होते! चंद्राच्या मातीवर होणाऱ्या या क्रियांवरून चंद्राचं, तसंच तेथे असलेल्या विवरांचं ‘वय’ ठरवण्यास खूप मदत होते! चंद्रावर वातावरण नसल्यानं तेथे माणसासारखी जीवसृष्टी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण सूक्ष्म जिवाणूसुद्धा असण्याची संभाव्यता खूपच कमी आहे.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

जम्मू-काश्मीर संस्थानाचे राजपुत्र करणसिंग यांचा जन्म ९ मार्च १९३१ रोजी महाराजा हरिसिंग आणि महाराणी तारादेवी या शाही दाम्पत्याच्या पोटी फ्रान्समधील केन्स या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण त्या काळातील राजघराण्याच्या शाही परंपरेतून झाले. दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र हा विषय घेऊन ते एम.ए. झाले. विद्यार्थिदशेत त्यांनी विवेकानंद, योगी अरविंद यांची चरित्रे वाचल्याने अध्यात्माकडे त्यांचा ओढा वाढला होता. त्यातच रोनल्ड निक्सन आणि पुढे धर्मातर केल्यानंतर कृष्णप्रेम व माधव आशिश यांना ते भेटले. े नेपाळच्या राजघराण्यातील यशराज लक्ष्मीशी त्यांचा विवाह झाला. १९४९ च्या सुमारास जम्मू-काश्मीर संस्थानाचे प्रमुख कारभारी म्हणून महाराजा हरिसिंग यांनी त्यांची नेमणूक केली. काश्मीरचे महाराजा अशी वाटचाल त्यांनी सुरू केली असताना संस्थानची परिस्थिती बिघडली. भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा हरिसिंग यांनी काश्मीर स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या आक्रमणामुळे हरिसिंगांनी संस्थान भारतात विलीन केले. तेव्हा भारत सरकारने करणसिंग यांना ‘सदर-इ-रियासद’ हे पद दिले. पुढे हे पद रद्द करून त्यांना काश्मीरचे गव्हर्नर केले. यानंतर काँग्रेसतर्फे पर्यटन, विमान वाहतूक, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री अशा विविध केंद्रीय स्तरावरच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. राजकारणाबरोबर समाजकारणाचीही त्यांना आवड असल्याने जम्मू-काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू, जागतिक आरोग्य मंडळ, संस्कृत मंडळ, संगीत मंडळ या संस्थेत त्यांनी काम केले. अमेरिकेचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम केले. ‘इन डिफेन्स ऑफ रीलिजन’ हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले आहे.् नेहरू प्रतिष्ठानचे ते आजीवन विश्वस्त आहेत. त्यांना सन्माननीय मेजर जनरल ऑफ इंडियन आर्मी, कर्नल ऑफ जम्मू-काश्मीर असे किताबही दिले आहेत. ल्ल संजय शा. वझरेकर

आठ वर्षांच्या अक्षदाला शाळेच्या होस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घरात घेतला गेला. अक्षदा होस्टेलमध्ये राहायला आली. होस्टेल छान होते. पण अक्षदा फार दु:खी झाली. तिला वाटले, घरच्यांना मी आवडत नाही, म्हणून मला असे घरातून दूर ठेवले. तिला घरच्यांचा राग यायला लागला. ती अभ्यासाकडे नीट लक्ष देईना. मित्रमैत्रिणींशी भांडू लागली. वैतागून एकदा तिने घरी पत्र पाठवले- ‘प्रिय आईस, मला इथे हॉस्टेलवर राहायला आवडत नाही. तू मला घरी घेऊन जा. मला न्यायला जर कोणी आले नाही तर मी ओडोमास खाऊन जीव देईन- तुमची अक्षदा’. पत्र वाचून आई-बाबांना फार वाईट वाटले. आईची प्रकृती वारंवार बिघडे. सतत हॉस्पिटलमध्ये जावे लागे. घर सांभाळताना बाबांची फार तारांबळ उडायची. या सगळय़ा धावपळीत अक्षदाकडे, तिच्या अभ्यासाकडे लक्ष कोण देणार? तिला शिस्त लावणे, तिच्यावर चांगले संस्कार करणे यासाठी वेळ कुठून काढणार? तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर तिचे व्यक्तिमत्त्व योग्यप्रकारे फुलणार नाही असा विचार करूनच तिला उत्तम शाळेच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बाबा आईला पत्र वाचून म्हणाले,‘‘ तू काळजी करू नकोस. तिच्या भल्यासाठीच आपण तिला दूर ठेवले आहे. मी बोलेन तिच्याशी.’’ मधे चार दिवस गेले. बाबा रविवारी अक्षदाला भेटायला जाणार होते. त्याआधीच अक्षदाचे दुसरे पत्र येऊन थडकले. ‘आई-बाबांना सप्रेम नमस्कार, मी पत्र पाठवूनही तुम्ही मला न्यायला आला नाहीत. त्यामुळे मी बूटपॉलिश पिऊन मरून जाणार आहे. मला वाटते, तुम्हाला मी मुळीच आवडत नाही. म्हणून मला तुम्ही इथे ठेवले आहे.. अक्षदा’. पत्राखाली रडक्या चेहऱ्याचे चित्र काढलेले होते. बाबा फार अस्वस्थ झाले. त्यांनी ऑफिसला सुट्टी काढली. अक्षदाच्या मुख्याध्यापिकांना भेटून, त्यांची परवानगी काढून अक्षदाला बाहेर घेऊन गेले. दोघे मिळून रेस्टॉरंटमध्ये जेवले. पुस्तकाच्या दुकानात जाऊन पुस्तके खरेदी केली. मग एका बागेत गप्पा मारत बसले. बाबांनी तिला पूर्वी मुलांना कसे गुरुगृही पाठवायचे शिक्षणासाठी, तिथे सगळय़ा कामांचे शिक्षण मिळायचे, मुले हुशार होऊन शिक्षण पूर्ण करून घरी परतायची आणि मग त्यातला कुणी मोठा राजा झाला, कुणी महान ऋषी झाला, कुणी गणिती झाला, याच्या गोष्टी सांगितल्या. हे कुमार घरी वाढले असते तर आश्रम स्वच्छ करणे, लाकडे आणणे, पाणी आणणे अशी कामे शिकले नसते. आश्रमात फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित होई ते झाले नसते.. अक्षदा म्हणाली, ‘बाबा, मीही सारे काही शिकून खऱ्या अर्थाने मोठी होऊन घरी परत येईन.’ संध्याकाळ होत आली होती. दोघे हातात हात घालून होस्टेलकडे निघाले. आई-वडील आपल्या मुलांच्या भल्याचा आणि भविष्याचा विचार नेहमीच करत असतात. मुलांना हे लक्षात येत नाही. आपल्यावर अन्याय होतोय असे वाटून ती विनाकारण दु:खी होतात. आजचा संकल्प : माझ्या मनातले घरच्यांशी मी मोकळेपणाने बोलेन. विनाकारण दु:खी होणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com