Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

श्रेष्ठींसमोर कलमाडी गैरहजर; कार्यकर्त्यांचा गोंधळ
पुणे, ८ मार्च/विशेष प्रतिनिधी

‘‘खासदार सुरेश कलमाडी यांच्या मागे केवळ त्यांची पुणे विकास आघाडी आहे, काँग्रेस नाही. काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्यांना उमेदवारी न देता निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्या,’’ अशी मागणी पक्षाचे आमदार मोहन जोशी यांनी आज मुंबईत झालेल्या उमेदवार निवड समितीच्या बैठकीसमोर केली.

विद्यापीठ, डीएड परीक्षा लांबणीवर
पुणे, ८ मार्च/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे राज्यातील बहुतांश विद्यापीठांना आपल्या काही दिवशीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागणार असून शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या (डीएड) परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

..हाती कथलाचा वाळा
निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. मग गल्ली ते दिल्लीतील राजकारणावरच्या गप्पांपासून ‘बापूं’पर्यंत विषय चर्चीले जातात. काही मंडळी विशिष्ट विचारांनी प्रेरित असल्याने ते पक्षनिष्ठेने काम करतात तर काहींच्या निष्ठा कामावर ठरतात. निवडणुकीतील ‘बापूं’चा संचार हा अनेकांना ‘जीवनसत्त्व’ देणारा ठरतो.

मोदींच्या सभेसाठी भाजपसुद्धा जागेच्या शोधात
पुणे, ८ मार्च / खास प्रतिनिधी

शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्यास निवडणूक आयोगाने मनाई केल्यामुळे येत्या रविवारी (१५ मार्च) होणारे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्यस्तरीय संमेलन आणि त्यानिमित्त होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजप आता जागेच्या शोधात आहे.

भांबुडर्य़ातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण
पुणे, ८ मार्च / खास प्रतिनिधी

भांबुर्डा येथील सरकारी मालकीच्या अत्यंत मोक्याच्या साडेसहा हजार चौरस फूट जागेवर आजूबाजूच्या काही सोसायटय़ांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले आहेत. या जागेत बांधलेल्या शेड तसेच मुलांची खेळणी जप्त करण्याची सूचनाही तहसीलदारांना देण्यात आली आहे.भांबुर्डा येथील भूमापन क्रमांक २७० ही जागा सरकारी मालकीची आहे. हे संपूर्ण क्षेत्र एक एकर सोळा गुंठे एवढे आहे. त्यातील काही जागा डॉ. विखे-पाटील फौंडेशन संस्था तसेच हणुमंता जाधव यांना यापूर्वी वाटप करण्यात आली आहे. उर्वरित साडेसहा हजार चौरस फूट क्षेत्र रिक्त आहे. या जागेवर सरकारचे नाव व ‘ओपन स्पेस’ म्हणून नोंद करण्यात आले आहे.

अमोल कुचेकर मृत्यूप्रकरणी उपनिरीक्षक निलंबित
अंत्यसंस्काराच्या वेळी जमावाचा पोलीस चौकी व बसवर हल्ला

पुणे, ८ मार्च / प्रतिनिधी

घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असताना अमोल कुचेकर याचा मृत्यू झाल्याप्रकरणी वारजे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक रामदास शेळके यांना आज निलंबित करण्यात आले. दरम्यान, कुचेकर याच्या पार्थिवावर वारजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संतप्त जमावाने वारजे पोलीस ठाण्यावर तसेच रस्त्यावरील सहा ‘पीएमपी’ बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक बसचालक, वाहक तसेच दोन प्रवासी जखमी झाले.

‘विश्वज्योतिरुक्थ्यं’दरम्यान विद्वतचर्चेचे आयोजन
हडपसर, ८ मार्च/ वार्ताहर

वेदविज्ञान अनुसंधान संस्थेच्या वतीने समाज एकीकरण आणि विश्वशांतीसाठी महंमदवाडी येथील गंगा कोर्टयार्ड येथे ‘विश्वज्योतिरुक्थ्यं’ या महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञाबरोबरच येथे या सहा दिवसांत विद्वत्चर्चा, विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. विद्वतचर्चेमध्ये या वेळी डॉ. विजय भटकर, प्राचार्य कलूरकर, वैज्ञानिक डॉ. यक्सम्बेकर, तसेच ऑस्ट्रिया येथून आलेले अ‍ॅडवर्ड अ‍ॅचेबनर, क्लाऊस विल्हेम व परिवार सहभागी झाले होते. ६ मार्च रोजी चालू झालेल्या या यज्ञ समारंभात या विविध धार्मिक विधिबरोबरच सोमवार (दि. ९ मार्च) रोजी अग्निशोमिय याग, मंगळवार १० मार्च रोजी यज्ञपुच्छ तर बुधवारी (११ मार्च) सांगता समारंभापूर्वी अवभृथस्नान तळेगाव येथील इंद्रायणी काठावर होणार असल्याची माहिती पारखे यांनी दिली.

स्वीकार प्रकल्पाच्या निधीसंकलनासाठी ‘ओळख ना पाळख’
पुणे,८ मार्च/प्रतिनिधी

एच.आय.व्ही बाधित मुलांसाठी व महिलांसाठी काम करणाऱ्या आशा सामाजिक प्रतिष्ठानच्या स्वीकार या संस्थेतर्फे ११ मार्च रोजी प्रशांत दामले यांच्या ‘ओळख ना पाळख’ या मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वीकार प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी निधीसंकलन करण्याकरिता या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून ते कोथरूडमधील यशवंतराव चव्हण नाटय़गृहात सायंकाळी ४.४५ वाजता होणार आहे,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुपर्ण शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी उपमहापौर चंद्रकांत मोकाटे,शिवसेना गटनेते शाम देशपांडे,स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश निकम,शशिकांत सुतार,सुनेत्रा पवार,ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.मुरलीधर पाटकर यांची उपस्थिती असणार आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसमवेत शहिदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.शहीद हेमंत करकरे यांच्या कुटुंबीयांतर्फे ‘लोकसत्ता’च्या उपसंपादिका अमृता करकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.तसेच स्वीकारमधील मुलांचा नृत्याविष्कार यावेळी सादर करण्यात येणार आहे.स्वीकारला मदत करू इच्छिणाऱ्यांनी या मदतनिधी कार्यक्रमाचे पासेस विकत घेऊन संस्थेस साहाय्य करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

मोटारसायकलच्या धडकेने भोसरी यथे तरुण ठार
पिंपरी, ८ मार्च/प्रतिनिधी

भोसरी येथील गवळी माथ्याजवळ शनिवारी रात्री मोबाईलवर बोलत थांबलेल्या तरुणास मोटारसायकल येऊन धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम किमती पवार (वय-२८, रा.विठ्ठलनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे, तर नीलेश नारायण मडखंडे (वय ३०) हा तरुण गंभीर जखमी आहे. रात्रीच्या सुमारास हे दोघे भोसरीकडे निघाले होते. मोबाईलवर फोन आल्यावर हे दोघे रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्याच दरम्यान मागच्या बाजूने वेगात पल्सर मोटारसायकलवर आलेला दुसरा चालक त्यांना धडकला. या अपघातात शिवरामचा जागीच मृत्यू झाला, तर नीलेशच्या तोंडाला, छातीला व डोक्यास जबर मार बसला. धडक देणाऱ्या मोटारसायकलस्वाराचे (एमएच १४ सीडी ८१८८) नाव अद्याप समजू शकले नाही. भोसरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी कदम
पिंपरी, ८ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या प्रदेश युवक अध्यक्षपदी पिंपरीतील हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांची आज नियुक्ती करण्यात आली. पनवेल येथे जागतिक महिला दिनानिमित्त देशभरातील महिला इंटक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही निवड करण्यात आली. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार डॉ. जी. संजीव रेड्डी व प्रदेश अध्यक्ष व आमदार जयप्रकाश छाजेड यांनी त्यांची निवड घोषित केली.

रक्तदान चळवळीत बचत गटांनी पुढाकार घ्यावा-महापौर
पिंपरी, ८ मार्च / प्रतिनिधी

रक्तदानाबाबत सामाजात अजूनही फार गैरसमज असून, ही चळवळ वाढविण्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन पिंपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके यांनी केले.
स्व.राजेश बहल स्पोर्टस् फाउंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आझम पानसरे,पालिकेतील पक्षनेते जगदिश शेट्टी,नगरसेवक हनुमंत गावडे,शिक्षण मंडळ सदस्य मायले खत्री तसेच प्रसाद शेट्टी,सुनील पालांडे,संभाजी पार्टे,मिलिंद मस्करनेस,प्रदीप पवार,अनिल म्हमाणे,रमेश पोरे,अजय पवार आदी यावेळी उपस्थित होते. या शिबिरात १०५ जणांनी रक्तदान केले.