Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
राज्य

जुगलबंदी बेली डान्स आणि लावणीची.. आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त ‘संघर्ष’तर्फे ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ कार्यक्रमात रशियाची बेली डान्सर आणि महाराष्ट्राची लावणी यांची अनोखी जुगलबंदी झाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात तिस्टा सेटलवाड, प्रा. नंदिता सरदेसाई, डॉ. नंदिनी पालशेतकर आणि लावणी सम्राज्ञी छाया-माया खुटेगांवकर यांना निवेदिका उत्तरा मोने यांनी बोलते केले. तर दुसऱ्या सत्रात अभिनेत्री दिपाली सय्यद, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, लावणी नृत्यांगना ज्योती जोशी आणि भारूडकार
मीरा उमप यांनी आपली कला सादर केली.

वाइन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आसूड!
जयप्रकाश पवार, नाशिक, ८ मार्च

शेतकऱ्याला अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना नेहमीच तोंड द्यावे लागते. ‘सेलिब्रिटी ड्रींक’ म्हणून गवगवा झालेल्या वाइनची द्राक्षे उत्पादीत करणारे शेतकरी सध्या अशाच सुलतानी संकटाची अनुभूती घेत आहेत. महागडी वाइन निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने खास वाइनची द्राक्षे पायदळी तुडविली जातात. अगदी तोच फाम्र्यूला राज्यातील हजारो वाइन उत्पादक शेतकऱ्यांबाबत वापरताना त्यांना एकतर्फी कराराच्या कात्रीत पकडायचे अन् त्यांचा शेती व्यवसाय, त्यावर अवलंबून असलेले कुटुंब, मजूर या सर्वानाच किमान १० ते १४ वर्षांसाठी बंधनात अडकवून ठेवायचे अर्थात वेठबिगारीसदृश्य षडयंत्र कॉन्ट्रॅक्ट फार्मिगच्या माध्यमातून रचले गेल्याचे दिसते.

पुलावरून पलीकडे जाताच ग्रामस्थांचे डोळे पाणावले
संगमेश्वर, ८ मार्च/वार्ताहर

गेली १२ वर्षे पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या खाडीवासीयांच्या भावना पुलावरून पलीकडे जाताच उफाळून आल्या व नकळत एका तपानंतर आपले स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात त्यांचे डोळेही पाणावले. डिंगणी-फुणगूस या दोन गावांदरम्यान पूल उभारण्याचे १९९७ मध्ये हाती घेतलेले काम नुकतेच पूर्ण झाले असून, या पुलाचे उद्घाटन आता आचारसंहितेमध्ये अडकले असले तरी ठेकेदार असणाऱ्या बंका कन्स्ट्रक्शन कंपनीने सर्व काम पूर्ण केले आहे. पुलाच्या रंगरंगोटीचे कामही अंतिम टप्प्यात असून, या पुलामुळे खाडीभागाच्या पूर्वीच्या सौंदर्यात आणखी मोलाची भर पडली आहे.

शिमगोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांची धूम
संगमेश्वर, ८ मार्च/वार्ताहर

कोकणात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध सणांमध्ये ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला जेवढे महत्त्व आहे, तेवढे खचितच अन्य सणांना असेल. या शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांच्या आगमनाने कोकणात गर्दी झाली असून मुंबईतून कोकणात येण्यासाठी कोकण रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जात असल्याने रेल्वे स्थानके गजबजलेली आहेत. कोकणच्या ग्रामीण भागात शिमगोत्सवाआधी लग्न विधींचे मुहूर्त घेण्याची प्रथा असल्याने फाक पंचमीपासून गावागावांतून उत्साहाचे वातावरण असते व मुंबईकर चाकरमान्यांची गर्दीही झालेली असते.

तहसीलदार आसावरी संसारेंना ‘डॉक्टरेट’
देवरुख, ८ मार्च/वार्ताहर

देवरुखच्या नायब तहसीलदार आसावरी संसारे- खेडेकर यांना संस्कृतमधील अथर्ववेदातील सृजनशीलतेच्या संकल्पना या विषयात मुंबई विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट’ पदवी घोषित करण्यात आली आहे. पाश्चिमात्य वाङ्मयाप्रमाणे भारतातील वेदवाङ्मयात विशेषत: अथर्ववेदामध्येही सृजनशीलतेच्या संकल्पनांचे विविध प्रकार आढळत असल्याचे त्यांनी आपल्या प्रबंधातून स्पष्ट केले आहे.

हस्तकलेतील ‘किमयागार’!
श्रीराम पुरोहित

‘अनंतहस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने?’ असे वर्णन नेहमीच केले जाते. कर्जत तालुक्यातील नेरळ हे माथेरानच्या पायथ्याशीच वसलेले गावदेही अशाच प्रकारच्या एका नव्या उक्तीची प्रचिती सध्या घेत आहे. ‘अनंत’हस्ते ‘अपर्णा’ वराने, देता घेशील किती दो कराने, अशी ही अनोखी उक्ती नेरळकरांच्या अनुभवास येत आहे. नेरळमध्ये समर्थ सेवा मंडळाच्या ‘कै. बापूराव धारप स्मृती सभागृहा’च्या समोर कर्वे मैदान आहे. अनंत कर्वे आणि अपर्णा कर्वे या दांपत्याचे वास्तव्य असलेले हे निवासस्थान सध्या नेरळमधील एक प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे. अनंत कर्वे यांच्या हातात अशी काही कला आहे की, त्यांचा हस्तस्पर्श ज्या वस्तूला होतो, त्या वस्तूचे रूपांतर पाहता पाहता एखाद्या सुंदर कलाकृतीमध्ये होऊन जाते.

वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील गुंडगिरी रोखण्याची मागणी
धुळे, ८ मार्च / वार्ताहर

शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील गुंडगिरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून हे प्रकार रोखण्यासह महाविद्यालयातील विविध समस्या दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी अधिष्ठात्यांकडे केली. परंतु विद्यार्थ्यांना धीर देण्याऐवजी अधिष्ठात्यांनी याप्रकरणी उफराटाच सल्ला दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नासाका, निसाकाकडे कोटय़वधींची पाणीपट्टी बाकी
नाशिक, ८ मार्च / प्रतिनिधी

नाशिक सहकारी साखर कारखान्याकडे एक कोटी, ६५ लाख, ७३ हजार रूपये तर निफाड कारखान्याकडे दोन कोटी, २६ लाख ८८ हजार रूपयांची पाणीपट्टी थकीत असून ही रक्कम १५ मार्च पूर्वी जमा करण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उ. नि. निर्मळ यांनी केले आहे.

राष्ट्रवादीकडून उदयनराजेंच्या उमेदवारीचा मंगळवारी फैसला
सातारा, ८ मार्च / प्रतिनिधी
काँग्रेसनेते, माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची पुणे येथे बारामती होस्टेलमध्ये भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली असून, मुंबई येथे पक्षाच्या संसदीय मंडळाच्या मंगळवारी १० मार्चला होणाऱ्या बैठकीत याबाबत फैसला करण्यात येणार आहे. उदयनराजेंनी शनिवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात बुद्धिवादी नागरिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावून उमेदवारीबाबत जनमताचा कौल मागण्याचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये त्यांनी अपक्ष, काँग्रेस, बसपामधून सातारा लोकसभा लढविण्याची मागणी झाली मात्र बहुसंख्यांचा कल स्वाभिमानाला धक्का न लावता राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज प्रथमच उदयनराजेंनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांना अटक
येवला, ८ मार्च / वार्ताहर
सासरच्या मंडळींनी बहिणीला ठार मारल्याची तक्रार हिंगोली तालुक्यातील टेमरीच्या राजेंद्र पराते यांनी केल्यानंतर येवला शहर पोलिसांनी शहराच्या गुजरवाडा भागातील सोरते कुटुंबियांपैकी चौघांना अटक केली. त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शितल सोरते (नागपूरे) हिला सासरची मंडळी नेहमी त्रास देत. नणंद शांताबाईची वागणूक आक्षेपार्ह असल्याची शितलची तक्रार होती. शितल आपली बदनामी करेल म्हणून संगनमताने सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून ठार केल्याचे फिर्यादीत शितलचा भाऊ राजेंद्र नथुजी पराते यांनी म्हटले आहे.

शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ३४ उमेदवार रिंगणात
शहादा, ८ मार्च / वार्ताहर

शहादा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक २२ मार्च रोजी होणार असून अर्ज माघारीच्या दिवशी या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ५० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १७ जागांसाठी ३४ उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. शहादा तालुका खरेदी विक्री संघ हा नंदुरबार जिल्ह्य़ातील सर्वात मोठा संघ समजला जातो. या संघावर आतापर्यंत पी. के. पाटील गटाचेच वर्चस्व राहिले आहे. यावेळी मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अभूतपूर्व यश संपादन केले असल्याने त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पी. के. पाटील पुरस्कृत लोकशाही पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत किसान पॅनल यांच्यामध्ये लढत होणार आहे.

नाशिक कवीतर्फे महिला दिनानिमित्त काव्यवाचन मेळावा
नाशिक, ८ मार्च / प्रतिनिधी

महिला दिनानिमित्त नाशिक कवी या संस्थेतर्फे ११ मार्च रोजी खुला काव्यवाचन मेळावा येथील कुसुमाग्रज स्मारकमध्ये होणार आहे. सर्व उपस्थित पुरूष व महिला कवींचे स्वरचित काव्यवाचन होईल. या मेळाव्यातील काव्याचा विषयही महिला हाच राहणार आहे. मेळाव्यातील सवरेत्कृष्ट तीन कवितांना विशेष पुरस्कार दिला जाणार असून काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश मेणे हे असतील. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सुजाता डेरे, रोहिणी पाटील व प्रिया भिडे या उपस्थित राहणार असून कार्यक्रम चार वाजता सुरू होईल. काव्यप्रेमी महिलांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी शरद पुराणिक यांच्याशी ९८९०३८६६६२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विनापरवाना डिझेलची अवैध वाहतूक; दोघांना अटक
खोपोली, ८ मार्च/वार्ताहर

जीवनावश्यक वस्तू अधिनियमांचा भंग करून विनापरवाना बाळगलेल्या डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना नऊ लाख ३० हजार रुपयांच्या ऐवजासह गजाआड करण्यात खोपोलीच्या पोलिसांना यश मिळाले आहे. खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. सोनार व त्यांच्या गस्तीपथकाने मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर हॉटेल फूडमॉलसमोर डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला अडवून कागदपत्रांची मागणी केली. टँकरचालक व त्याचे सहकारी कागदपत्रे दाखविण्यास असमर्थ ठरत असल्याचे निदर्शनास येताच नवी मुंबईला राहणारा सद्रीदिन बसरखान व राजेश सिंग हे दोघे आरोपी फरार झाले. पोलिसांनी पप्पू यादव (२१, मुंबई) व दादासाहेब पवार (चौक) या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यात विनापरवाना बाळगलेले दोन लाख ५० हजार रुपयांचे डिझेल व अवैधरीत्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला सहा लाख ८० हजार रुपये किमतीचा टँकर असा एकत्रित नऊ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींच्या विरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिणाच्या शिकारप्रकरणी चौघांना अटक
नागपूर, ८ मार्च/पीटीआय

हरणाची शिकार करून त्याचे मांस आपल्या गाडीतून घेऊन जाणाऱ्या अस्लम खान यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्याचे वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी अस्लम खान यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे मानले जाते. दरम्यान अस्लम खानशी आपला काहीही संबंध नसल्याचे बबनराव पाचपुते यांनी आज स्पष्ट केले. अस्लम खान हा पाचपुते यांचा प्रसिद्धी विभाग सांभाळतो अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे पीटीआयने वृत्तात म्हटले आहे. शनिवारी रात्री हरणाच्या ४० किलो मांसासह अस्लम खान याच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली. अन्य तिघांची नावे मोहम्मद नबाबउद्दीन, महम्मद अफझल आणि शोएब अली अशी आहेत. रामटेक भागात त्यांनी हरणांची शिकार केली आणि दुचाकीवरून पळून जात असताना वनाधिकाऱ्यांनी त्यांना अडविले. त्यावेळी त्यांच्याजवळ मांस सापडले. चारजणांना जेरबंद करण्यात आले असले तरी या प्रकरणातील अन्य दोघेजण पळून गेले. दरम्यान वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी अस्लम खान किंवा या शिकारी व्यक्तींशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच अस्लम माझा प्रसिध्दी अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे वृत्त साफ चुकीचे आहे असे म्हटले आहे.

लेण्याद्री गणपती मंदिरातील दक्षिणापेटी लुटली
जुन्नर, ८ मार्च/वार्ताहर

प्रसिद्ध लेण्याद्री गणपती मंदिरातील दोन मुख्य दरवाजांचे कडीकोयंडे तोडून, आतील दक्षिणापेटी फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगिरिजात्मजाच्या मस्तकावरील चांदीचा तिलकदेखील चोरटय़ांनी लांबविला आहे.