Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा

अंजुमला साधायची आहे विश्वचषकांची हॅट्ट्रीक
नवी दिल्ली, ८ मार्च/ पीटीआय

१९८३ साली इंग्लंडमध्ये आणि २००७ साली दक्षिण आफ्रिकेत ट्वेंन्टी-२० असे दोन विश्वचषक भारताने जिंकले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेला महिलांचा विश्वचषक स्पर्धा जिंकून आम्हाला अनोखी अशी विश्वचषक विजयाची हॅट्ट्रीक साधायची आहे, असे मत विश्वचषक खेळायला गेलेल्या भारतीय संघातील वरीष्ठ खेळाडू आणि माजी कर्णधार अंजुम चोप्राने व्यक्त केले आहे. सामन्यात विजयी होणे सर्वांनाच आवडते, पण या विश्वचषकाचे अजिंक्यपद आमच्यासाठी फार मोलाचे असेल.

भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ विजय
ख्राईस्टचर्च, ८ मार्च / पीटीआय

सचिन तेंडुलकरच्या (१६३) ‘मास्टर ब्लास्टर’ खेळीच्या जोरावर भारताने आज रोमहर्षक ठरलेल्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत न्यूझीलंडचा ५८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली व मालिका गमावणार नाही, याची हमीच दिली. व्हेटोरीच्या जागी न्यूझीलंडचे नेतृत्व करणाऱ्या ब्रेंडन मॅक् क्युलमने प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या भारताने ४ बाद ३९२ धावांची भक्कम मजल मारली आणि यजमान संघाचा डाव ४५.१ षटकात ३३४ धावांवर संपुष्टात आणला. सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतील ४३वे शतक साजरे करताना ‘लाजवाब’ खेळी केली. न्यूझीलंड भूमीत पहिलेच एकदिवसीय शतक झळकावणाऱ्या सचिनला मात्र जखमी झाल्यामुळे निवृत्त व्हावे लागले.

सोमदेवची लूविरुद्ध सरशी; भारताची तैपेईवर ३-२ ने मात
काओसियंग, ८ मार्च / पीटीआय

सोमदेव देवबर्मनने जागतिक टेनिस क्रमवारीत ५९व्या स्थानावर असलेल्या चायनिज तायपेईच्या लू येन-हसुनचा ६-१, ६-२, ६-३ गुणांनी पराभव केला. सोमदेवच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आज भारताने चायनिज तायपेईची झुंज ३-२ने मोडून काढली आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया-ओशेनिया गट-१च्या लढतीत तिसऱ्या आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. सोमदेवने आज एकेरीत परतीच्या लढतीत क्रमवारीत वरचे स्थान असलेल्या लूविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत वर्चस्व गाजवले.

इंग्लंड ५४६, प्रायरचेही शतक, वेस्ट इंडिज १ बाद ९२
पोर्ट ऑफ स्पेन, ८ मार्च/ वृत्तसंस्था

दौऱ्यातील शेवटची आणि निर्णायक कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या ईर्षेने मैदानात उतरलेल्या इंग्लंडने ५४६ धावांचा डोंगर उभारला तो पॉल कॉलिंगवूड (१६१) आणि यष्टिरक्षक मॅट प्रायर (नाबाद १३१) यांच्या २१८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर. कॉलिंगवूडने आज चौफेर फलंदाजी करीत दीडशतकापर्यंत मजल मारून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तर मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला शतकाचे गिफ्ट दिले मॅट प्रायरने. कर्णधार ख्रिस गेलने वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात एकदम झोकात करुन दिली असून, दिवसअखेर त्यांची १९ षटकांत १ बाद ९२ अशी अवस्था होती.

ही एक सर्वोत्तम खेळी - सचिन
ख्राईस्टचर्च, ८ मार्च / वृत्तसंस्था

१९८९ पासून मी भारतीय संघात आहे. सध्याची भारतीय फलंदाजी ही १९ वर्षांच्या कारकिर्दीत मी पाहिलेली सर्वोत्तम फलंदाजी आहे, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली आहे.
सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन म्हणाला की, कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू, मोहंमद अझहरुद्दिन, सौरव गांगुली, राहुल द्रविड अशा फलंदाजांबरोबर मी खेळलो आहे. परंतु महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालील संघातील वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग ही फलंदाजांची फळी माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे.

ऑस्ट्रेलियाची कसोटीवरील पकड मजबूत
दक्षिण आफ्रिका १३८ धावांत गारद
दरबान, ८ मार्च / वृत्तसंस्था

फिलिप ह्युजेसच्या नाबाद ९८ धावा आणि रिकी पॉन्टिंगच्या ८१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चहापानानंतर आपली आघाडी ४३३ धावापर्यंत वाढविली. त्यामुळे या कसोटीतही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड झाले आहे. सामन्याचे अद्याप दोन दिवस शिल्लक असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसरी कसोटीही जिंकण्याची नामी संधी आहे.

मोहन बने यांच्या ऑलिम्पिकवरील पुस्तकाचे आज प्रकाशन
मुंबई, ९ मार्च / क्री. प्र.

वृत्तछायाचित्रकार मोहन बने यांनी लिहिलेल्या ‘ऑलिम्पिकचे सोनेरी सीमोल्लंघन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या सोमवार, ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा माळा, बाळ शास्त्री, जांभेकर मार्ग (महापालिकेसमोर), छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई-१ येथे आयोजित करण्यात आला आहे.

गेलच्या शतकानंतरही वेस्ट इंडिजच ४ बाद २२३
पोर्ट ऑफ स्पेन, ८ मार्च/ वृत्तसंस्था

येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या अंतिम आणि निर्णायक कसोटीच्या मालिकेत १-० अश्या पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने उपाहापर्यंत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवत सामन्यावर चांगलीच पकड मिळविली होती. काल ‘नाईट वॉचमन’ म्हणून आलेल्या डॅरेन पॉवेलला (०) भोपळासुद्धा फोडू न देता स्टुअर्ट ब्रॉडने तंबूत धाडले तर रामनरेश सरवानला (१४) पदार्पण करणाऱ्या अमजद खानने पायचीत पकडत वेस्ट इंडिजला तिसरा धक्का दिला. दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने कर्णधार ख्रिस गेलवर काही काळ दडपण आले होते.

सचिनमुळे सामन्यावर वर्चस्व - धोनी
ख्राईस्टचर्च, ८ मार्च / वृत्तसंस्था

सचिन तेंडुलकरच्या अफलातून खेळीचा भारताच्या आजच्या विजयात मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सामना संपल्यानंतर व्यक्त केली. मात्र, न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना लवकर बाद न करता आल्याबद्दल त्याने नाराजीही प्रकट केली. धोनी म्हणाला की, सचिन तेंडुलकरचे फलंदाजीतील श्रेष्ठत्व मी नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याने आज मारलेले काही फटके तर थक्क करायला लावणारे होते. त्याच्या जबरदस्त खेळीमुळेच प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजविण्याची संधी आम्हाला मिळाली. यावेळी धोनीने युवराजच्या फलंदाजीचीही प्रशंसा केली. तो म्हणाला की, युवराज जेव्हा भरात असतो त्यावेळी त्याला बाद करणे खूप अवघड असते. सचिन आणि युवराज ज्या पद्धतीने खेळत होते ते पाहिल्यावरच आज आम्ही ३९० च्या पलीकडे मजल मारणार याची आम्हाला कल्पना आली होती. धोनीने सांगितले की, माझा आमच्या फलंदाजांवर प्रचंड विश्वास आहे. या विश्वासामुळेच अनेकदा मी एक जादा गोलंदाज घेऊन खेळण्याचे टाळतो.

‘योजनाबद्ध खेळाचे फळ’
अनुभवी लूविरुद्ध योजनाबद्ध खेळ केल्यामुळेच सोमदेव देवबर्मनला विजय मिळवता आला, अशी प्रतिक्रिया भारताचे डेव्हिस चषक कर्णधार एस.पी. मिश्रा यांनी व्यक्त केली.
सोमदेवच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आज चायनिज तायपेईविरुद्ध ३-२ने विजय मिळवत डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया-ओसेनिया गट-१च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अलीकडच्या काळात झालेल्या डेव्हिस चषक लढतीतील ही सर्वोत्तम लढत ठरली.
आखलेल्या योजनेनुसार खेळ केल्यामुळे लूविरुद्ध सरशी साधता आली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या सोमदेवने पहिल्या दोन सेटमध्ये विजय मिळवल्यानंतर लढत जिंकणारच हे निश्चित झाले. या लढतीत सहज विजय मिळण्याची अपेक्षा नव्हती, असेही मिश्रा यांनी कबूल केले.

आनंद चौथा; ग्रिसचुकला विजेतेपद
लिनारेस, ८ मार्च / पीटीआय

विश्वविजेता आणि भारताचा सुपरग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याला अखेर येथील मॅजिस्ट्रल सिऊदाद डी लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धचा डाव त्याने बरोबरीत सोडविला. हा डाव त्याने जिंकला असता आणि सोबत ग्रिसचुकला आपल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असता तरच त्याला पहिल्या स्थानावर झेप घेता आली असती. मात्र ते शक्य होऊ शकले नाही. या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीनंतर अखेर रशियाचा ग्रॅण्डमास्टर अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक याला स्पर्धेचे विजेतेपद मिळाले. ग्रिसचुकने अखेरच्या लढतीत अर्मेनियाच्या लेव्हॉन अ‍ॅरोनियनविरुद्ध बरोबरी साधली आणि आपला विजय निश्चित केला. ग्रिसचुकच्या खात्यात ८ गुण होते. युक्रेनच्या इव्हानचुकला दुसरे स्थान मिळाले. नॉर्वेच्या कार्लसनला ७.५ गुणांसह तिसरे स्थान मिळाले.