Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

अंजुमला साधायची आहे विश्वचषकांची हॅट्ट्रीक
नवी दिल्ली, ८ मार्च/ पीटीआय

१९८३ साली इंग्लंडमध्ये आणि २००७ साली दक्षिण आफ्रिकेत ट्वेंन्टी-२० असे दोन विश्वचषक

 

भारताने जिंकले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेला महिलांचा विश्वचषक स्पर्धा जिंकून आम्हाला अनोखी अशी विश्वचषक विजयाची हॅट्ट्रीक साधायची आहे, असे मत विश्वचषक खेळायला गेलेल्या भारतीय संघातील वरीष्ठ खेळाडू आणि माजी कर्णधार अंजुम चोप्राने व्यक्त केले आहे.
सामन्यात विजयी होणे सर्वांनाच आवडते, पण या विश्वचषकाचे अजिंक्यपद आमच्यासाठी फार मोलाचे असेल. कारण यापूर्वी पुरुषांनी दोन विश्वचषक जिंकून दिल्यामुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली असून हा तिसरा विश्वचषक भारतात नेऊन आम्ही देशवासियांना अनोख्या हॅट्ट्रीकचा आनंद देऊ इच्छितो, असे तिने यावेळी सांगितले. ती पुढे म्हणाली की, विश्वचषकावर आपल्या देशाचे नाव कोरणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि ते स्वप्न सत्यात उतरविणे हा एक संस्मरणीय अनुभव असेल. पण विश्वचशक जिंकण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे असून उद्याच्या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.
पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात १० विकेट्सने धूळ चारीत भारतीय महिला संघाने दणदणीत सलामी दिली आहे. त्याबद्दल ती म्हणाली की, प्रत्येक सामन्याची सुरुवात चांगली होणे आवश्यक असते. पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात पराभूत केल्याने संघाचे मनोधैर्य कमालीचे उंचाविले असून असाच विजयाचा धुमधडाका आम्हाला कायम ठेवायचा आहे. मी चांगल्या फॉर्मात असून यासाठी मला सराव सामन्यांचा चांगलाच फायदा झाला.
इंग्लंडबरोबर होणाऱ्या उद्याच्या सामन्याबद्दल अंजुम म्हणाली की, इंग्लंडविरूद्धचा सामना आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि जर जर का प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केला तर आम्हाला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही. गेल्यावर्षांपासून इंग्लंडचा संघ चांगल्यच फॉर्मात आहे. दोन्हा संघातील खेळाडूंना प्रत्येकाच्या खेळाची चांगलीच माहिती असल्याने हा सामना चांगलाच रंगतदार होईले.
कर्णधार झुलन गोस्वामीबद्दल ती म्हणाली की, झुलन माझ्या लहान बहिणी सारखी आहे. आम्ही दोघी बरीच वर्षे एकत्र क्रिकेट खेळत आहोत. मैदानावर असताना तिच्यामध्ये सामना जिंकण्याची जिद्द असते आणि त्यासाठी ती सर्वस्व पणाला लावते. संघासीठी सर्वतोपरी प्रयत्न करायला मी तयार आहे, असे अंजुमने सांगितले. ती पुढे म्हणाली की, भारतासाठी खेळणे ही माझ्यासाठी आभिमानास्पद गोष्ट आहे. भारताचे प्रतिधिीत्व करताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत असते.
अंजुमचा हा चौथा विश्वचषक असून त्यामधल्या कामगिरीबद्दल ती म्हणाली की, न्यूझीलंडमध्ये २००० साली आणि दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकात माझी कांमगिरी चांगली झाली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती मला या विशचषकामध्ये करायची आहे.