Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ विजय
ख्राईस्टचर्च, ८ मार्च / पीटीआय

सचिन तेंडुलकरच्या (१६३) ‘मास्टर ब्लास्टर’ खेळीच्या जोरावर भारताने आज रोमहर्षक ठरलेल्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत न्यूझीलंडचा ५८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली व मालिका गमावणार नाही, याची हमीच दिली. व्हेटोरीच्या जागी

 

न्यूझीलंडचे नेतृत्व करणाऱ्या ब्रेंडन मॅक् क्युलमने प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या भारताने ४ बाद ३९२ धावांची भक्कम मजल मारली आणि यजमान संघाचा डाव ४५.१ षटकात ३३४ धावांवर संपुष्टात आणला. सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतील ४३वे शतक साजरे करताना ‘लाजवाब’ खेळी केली. न्यूझीलंड भूमीत पहिलेच एकदिवसीय शतक झळकावणाऱ्या सचिनला मात्र जखमी झाल्यामुळे निवृत्त व्हावे लागले.
न्यूझीलंडने भारताला सुरुवातीलाच तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्यामुळे ही लढत रोमहर्षक झाली. ब्रेंडन मॅक् क्युलम (७१) आणि जेस रायडर (१०५) यांनी तडाखेबंद फलंदाजी करत १६६ धावांची दमदार सलामी देत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या पण, मधल्या काही षटकांमध्ये त्यांचे फलंदाज थोडय़ा थोडय़ा अंतराने बाद झाल्यामुळे त्यांचे विजयाचे मनसुबे उधळले गेले. आता यजमान संघाला मालिका बरोबरीत राखण्यसाठी ११ मार्च (हॅमिल्टन) आणि १४ मार्च (ऑकलंड) येथे होणारे उर्वरित दोन्ही सामनेजिंकणे गरजेचे आहे.
सलामीवीर जेसी रायडर आणि मॅक् क्युलम यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यास भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणाची साथ लाभली आणि या जोडीने न्यूझीलंडला २२व्या षटकातच बिनबाद १६६ धावांची सलामी दिली. त्यामुळे भारतीय गोटात खळबळ उडाली होती परंतु, सलामीची ही जोडी माघारी परतताच यजमान संघाची ३४व्या षटकात ७ बाद २१८ अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर कायले मिल्स (५४) आणि टीम साऊदीने नवव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत सामन्यात निर्माण केलेली रंगत अखेर क्षणिकच ठरली. अव्वल ऑफस्पिनर हरभजन सिंग, झहीर खान आणि युवराज सिंग यांनी अनुक्रमे ५६, ६५ व ७१ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी दोन बळी मिळवले.
डनेडिनला १९९२च्या मार्चमध्ये काढलेल्या ८४ धावा, सचिन तेंडुलकरची यापूर्वीची न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम खेळी होती. आज त्याने १३३ चेंडूंमध्ये १६ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचत ही ‘मास्टर ब्लास्टर’ खेळी केली. दिवस/रात्र रंगलेल्या आजच्या या लढतीत सचिन तेंडुलकर ४५व्या षटकात पोटाचा स्नायू दुखावल्यामुळे निवृत्त झाला. १९९९च्या नोव्हेंबर महिन्यात हैदराबादला याच प्रतिस्पध्र्याविरुद्ध काढलेल्या १८६ धावांचा वैयक्तिक तसेच पाकिस्तानच्या सईद अन्वरचा सार्वकालिक सर्वोत्तम असलेला १९३ धावांचा विक्रम सचिन तेंडुलकर आज मोडणार असेच एकवेळेस वाटत होते पण, तो जखमी झाल्यामुळे हे दोन्ही विक्रम आज अबाधित राहिले. कारकीर्दीतला ४२५वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या सचिनने यापूर्वीचे शतक (११७ नाबाद) गेल्यावर्षी मार्च महिन्यात सिडनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले होते. ६० चेंडूंमध्ये १० चौकार आणि ६ षटकारांचा वर्षांव करत ८७ धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या युवराज सिंगसोबत तिसऱ्या विकेटसाठी सचिनने ११० चेंडूंमध्ये १३८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंड खेळाडूंची पुरती भंबेरीच उडाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ५६ चेंडूंवर ६८ आणि सुरेश रैनाने १८ चेंडूंमध्ये ३८ धावा फटकावल्या. रैनाच्या तडाखेबंद खेळीत ५ षटकारांचा समावेश होता. आघाडीच्या फलंदाजांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. वेस्ट इंडिजमधील २००७च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बम्र्युडा संघाविरुद्ध काढलेल्या ४१३ धावा, ही भारताची सर्वोत्तम एकदिवसीय धावसंख्या आहे. ४०व्या षटकात भारताची ३ बाद २८३ अशी स्थिती होती आणि त्यावेळी पाहुणा संघ लीलया ४०० धावांचा टप्पा पार करेल, असेच वाटत होते पण, यासाठी अखेर त्यांना ८ धावा कमी पडल्या.
३६व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या ग्रँट इलॉटच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध पाचवे एकदिवसीय शतक पूर्ण केले ते १०१ चेंडूंमध्ये. मात्र, त्यानंतरच्या ६३ धावा त्याने अवघ्या ३२ चेंडूत फटकावल्या. ही त्याची दुसरी सर्वोत्तम तर तिसरी १५० हून अधिक धावांची खेळी ठरली. दक्षिण आफ्रिकेतील २००३च्या विश्वचषकात सचिनने नामिबियाविरुद्ध पिटमॅरित्झबर्गला १५२ धावा काढल्या होत्या. २०व्या षटकापर्यंत न्यूझीलंड संघासाठी सर्व काही सुरळीत सुरू होते. भारताची त्यावेळी २ बाद १०५ अशी अवस्था होती. बॅटिंग पॉवरप्लेने सामन्याचे चित्रच पालटले. तेंडुलकर व युवराजने २३ ते २७ षटकादरम्यान ६९ धावांची लूट केली आणि भारताची षटकामागील धावांची सरासरी एकदम वाढली. या पाच षटकांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पुरती वाताहत झाली.
धोनी व रैनाने मग तो वेग आणखीनच वाढवला. अगदी मैत्रीपूर्ण लढत सुरू असल्याप्रमाणे भारतीय फंलदाजांनी त्यावेळी चौकार व षटकारांचा वर्षांव केला. भारतीय संघाच्या धावांचा वेग रोखण्यासाठी मॅक् क्युलमने सात गोलंदाजांचा उपयोग केला पण, त्यांच्या फलंदाजीपुढे त्याचे सारे प्रयत्न निर्थकच ठरले. मात्र, ३५ वर्षांचा सचिन तेंडुलकरची धावांची भूक अद्यापही पूर्वीप्रमाणेच कायम आहे, हेच त्याच्या फलंदाजीतून आज स्पष्ट झाले. युवराजचा झंझावात सुरू होताच सचिनने त्याला योग्य साथ दिली पण, सचिननेही कट आणि फ्लिकच्या फटक्यांनी साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले.
भारत :- वीरेंद्र सेहवाग त्रि. गो. माइल्स ०३, सचिन तेंडुलकर जखमी निवृत्त १६३, गौतम गंभीर झे. मॅक् ग्लॅशन गो. बटलर १५, युवराज सिंग झे. मॅक् ग्लॅशन गो. इलिऑट ८७, महेंद्रसिंग धोनी झे. मॅक् ग्लॅशन गो. माइल्स ६८, सुरेश रैना नाबाद ३८, युसूफ पठाण नाबाद १. अवांतर (लेगबाईज ५, वाईड ८, नोबॉल ४) १७. एकूण ५० षटकांत ४ बाद ३९२. बाद क्रम : १-१५, २-६५, ३-२०३, ४-३८२. गोलंदाजी : मिल्स १०-०-५८-२, साऊदी १०-०-१०५-०, बटलर ५-०-३७-१, ओराम ८-१-३४-०, पटेल ५-०-३७-०, रायडर ५-०-५६-०, इलियट ७-०-६०-१.
न्यूझीलंड : जेसी रायडर झे. खान गो. हरभजन १०५, ब्रेंडन मॅक् क्युलम धावबाद (रैना/धोनी) ७१, रॉस टेलर धावबाद (युवराज/धोनी) ७, मार्टिन गुप्तील पायचित गो. युवराज १, ग्रँट इलिऑट त्रि. गो. खान १८, जेकब ओराम त्रि. गो. हरभजन सिंग ७, पीटर मॅक् ग्लॅशन त्रि. गो. खान ७, इयन बटलर त्रि. गो. युवराज २४, कायले मिल्स झे. खान गो. पठाण ५४, टीम साऊदी झे. व गो. कुमार ३२, जीतन पटेल नाबाद ०. अवांतर (लेगबाईज २, वाईड ४, नोबॉल २) ८. एकूण ४५.१ षटकात सर्वबाद ३३४. बाद क्रम : १-१६६, २-१७९, ३-१८२, ४-१८८, ५-२०३, ६-२१७, ७-२१८, ८-२५१, ९-३३४, १०-३३४. गोलंदाजी : झहीर खान ९-०-६५-२, प्रवीण कुमार ८.१-०-६०-१, मुनाफ पटेल ७.२-०-७९-०, युवराज सिंग १०-०-७१-२, हरभजन सिंग १०-०-५६-२, युसूफ पठाण ०.४-०-१-१.