Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सोमदेवची लूविरुद्ध सरशी; भारताची तैपेईवर ३-२ ने मात
काओसियंग, ८ मार्च / पीटीआय

सोमदेव देवबर्मनने जागतिक टेनिस क्रमवारीत ५९व्या स्थानावर असलेल्या चायनिज तायपेईच्या लू

 

येन-हसुनचा ६-१, ६-२, ६-३ गुणांनी पराभव केला. सोमदेवच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आज भारताने चायनिज तायपेईची झुंज ३-२ने मोडून काढली आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया-ओशेनिया गट-१च्या लढतीत तिसऱ्या आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
सोमदेवने आज एकेरीत परतीच्या लढतीत क्रमवारीत वरचे स्थान असलेल्या लूविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत वर्चस्व गाजवले. याउलट विजयासाठी पसंती देण्यात येत असलेल्या रोहण बोपण्णाला परतीच्या दुसऱ्या एकेरी लढतीत त्सुंग-ह्य़ू यांग याच्याविरुद्ध ३-६, ७-६(६), ६-७(५) गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. आता भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. या लढतीत विजय मिळवला तर भारत विश्व गट प्लेऑफ साठी पात्र ठरेल. भारतीय संघाने यापूर्वी विश्व गटासाठी १९९८मध्ये पात्रता मिळवली होती. गेल्या वर्षी भारतीय संघाला प्लेऑफमध्ये रोमानियाविरुद्ध १-४ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यावेळी भारताला आशिया-ओसेनिया गट-१ मध्ये खेळावे लागले.
काल पेस-भूपती जोडीने दुहेरीत विजय मिळवल्यानंतर भारताने २-१ अशी आघाडी मिळवली होती. आज त्यापुढे खेळताना सोमदेवने परतीच्या एकेरीच्या पहिल्या लढतीत विजय मिळवत भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. सोमदेवने पहिल्या दिवशी टी चेनचा पराभव केला होता तर बोपण्णाला लूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या मोसमात डेव्हिड नालबंडियन आणि लेटेन ह्युईटविरुद्ध विजय मिळवणाऱ्या लू याला आजच्या लढतीत विजयासाठी पसंती देण्यात येत होती पण, त्याने अनेक टाळण्याजोग्या चुका केल्यामुळे सोमदेवला वरचढ ठरण्याची संधी मिळाली. लूने सोमदेवविरुद्ध बेसलाईनवर खेळण्याचे तंत्र अवलंबले पण, सोमदेवविरुद्ध त्याला यश आले नाही.