Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

इंग्लंड ५४६, प्रायरचेही शतक, वेस्ट इंडिज १ बाद ९२
पोर्ट ऑफ स्पेन, ८ मार्च/ वृत्तसंस्था

दौऱ्यातील शेवटची आणि निर्णायक कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या ईर्षेने मैदानात

 

उतरलेल्या इंग्लंडने ५४६ धावांचा डोंगर उभारला तो पॉल कॉलिंगवूड (१६१) आणि यष्टिरक्षक मॅट प्रायर (नाबाद १३१) यांच्या २१८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर. कॉलिंगवूडने आज चौफेर फलंदाजी करीत दीडशतकापर्यंत मजल मारून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तर मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला शतकाचे गिफ्ट दिले मॅट प्रायरने. कर्णधार ख्रिस गेलने वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात एकदम झोकात करुन दिली असून, दिवसअखेर त्यांची १९ षटकांत १ बाद ९२ अशी अवस्था होती.
कालच्या २ बाद २८२ वरून पुढे खेळताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. काल शतक झळकावून संघाला मोठय़ा धावसंख्येकडे घेऊन जाणाऱ्या कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसला (१४२) एडवर्ड्सने त्रिफळाचीत करीत संघाला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पहिल्या दिवशी दुखापतीमुळे मैदानाबाहेर पडलेला ओवेश शहा (३३) फलंदाजीला आला, पण त्यालासुद्धा जास्त धावा करता आल्या नाहीत. दिवसाच्या सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर इंग्लंडचा संघ गडगडणार की काय असे वाटू लागले. पण एक बाजू लावून धरणाऱ्या कॉलिंगवूडने यष्टिरक्षक मॅट प्रायरच्या सहाय्याने द्विशतकी भागीदारी रचली आणि इंग्लंडला उपाहारापूर्वी गुंडाळून लवकर फलंदाजीसाठी येण्याचे वेस्ट इंडिजचे स्वप्न भंग पावले. सकाळच्या सत्रात दोन विकेट्स लवकर पडलेल्या असल्यामुळे कॉलिंगवूडने सावध पवित्रा घेतला, पण फलंदाजीला आलेल्या प्रायरने मात्र स्फोटक फंलंदाजी करीत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वीही ठरली. प्रायरचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत कॉलिंगवूडनेही हळूहळू फटके मारायला सुरुवात केली आणि उपाहारापूर्वी शतक पूर्ण करीत संघाला ३७२ धावांपर्यंत मजल मारून दिली. उपाहारनंतर मात्र दोन्हीही फलंदाजांनी दर्जेदार फलंदाजी करीत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसे काढली.
चौफेर टोलेबाजी करीत कॉलिंगवूडने त्याचे दीडशतक तर प्रायरने त्याचे शतक पूर्ण केले. हे दोघे संघाला पाचशे धावांचा टप्पा ओलांडून देतील असे वाटत असताना चहापानाच्या तीन षटके बाकी असताना कॉलिंगवूडला बेकरने पायचीत पकडत वेस्ट इंडिजला दिवसातील तिसरे यश मिळवून दिले. चहापानानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत संघाची धावसंख्या फुगविण्याचा प्रयत्न केला आणि कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने ५४६ धावांवर डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव :- अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस त्रि. गो. एडवर्ड्स १४२, अ‍ॅलिस्टर कूक झे. रामदिन गो. पॉवेल १२, ओवेस शाह धावचीत ब्राव्हो ३३, केव्हिन पीटरसन त्रि. गो. हिन्ड्स १०, पॉल कॉलिंगवूड पायचीत गो. बेकर १६१, मॅट प्रायर नाबाद १३१ स्टुअर्ट ब्रॉड झे. सिमोन्स गो. बेकर १९, ग्रॅमी स्वान नाबाद ११. अवांतर (बाईज ८, लेगबाईज ७, वाईड १, नोबॉल ११) २७. एकूण १५८. ५ षटकांत ६ बाद ५४६ (डाव घोषित) . बाद क्रम : १-२६, २-१५६, ३-२६३, ४-२६८, ५-४८६, ६-५३०. गोलंदाजी : एडवर्ड्स २४-५-६३-१, पॉवेल १६-१-७९-१, बेकर २३-४-७७-२, ब्रेन्डन नॅश २३-३-७७-०, गेल २६-१-८०-०, रायन हाइन्ड्स ३९.५-२-१२६-१, सिमोन्स ६-०-२६-०
वेस्टइंडिज :- ख्रिस गेल नाबाद ४९, डे्व्हॉन स्मिथ त्रि. गो. पनेसार २८, डॅरेन पॉवेल नाबाद ०. अवांतर (बाईज ६, नोबॉल ९) १५. एकूण १९ षटकांत १ बाद ९२.
गोलंदाजी : अ‍ॅन्डरसन ४-०-१३-०, ब्रॉड ५-०-१९-०, खान ४-०-२७-०, स्वान ४-०-२१-०, पनेसार २-०-६-१.