Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ही एक सर्वोत्तम खेळी - सचिन
ख्राईस्टचर्च, ८ मार्च / वृत्तसंस्था

१९८९ पासून मी भारतीय संघात आहे. सध्याची भारतीय फलंदाजी ही १९ वर्षांच्या कारकिर्दीत मी

 

पाहिलेली सर्वोत्तम फलंदाजी आहे, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली आहे.
सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन म्हणाला की, कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू, मोहंमद अझहरुद्दिन, सौरव गांगुली, राहुल द्रविड अशा फलंदाजांबरोबर मी खेळलो आहे. परंतु महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालील संघातील वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग ही फलंदाजांची फळी माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे.चार-पाच षटकांत पन्नास किंवा त्याहून धावा फटकाविण्याची क्षमता असलेले पाच ते सहा फलंदाज सध्याच्या संघात आहेत, असे स्फोटक फलंदाज असल्यावर कितीही मोठे आव्हान असले तरी ते आम्ही पेलू शकू याची आम्हाला खात्री आहे.
आजच्या खेळीबद्दल तो म्हणाला की, सेहवागसारखा फलंदाज खेळत असल्यावर मी नेहमीच दुय्यम भूमिका घेणे पसंत करतो. सेहवाग भरात असल्यावर खेळपट्टीवर टिकून राहणे आणि एकेरी धावा काढून सेहवागला फलंदाजीची जास्तीत जास्त संधी देण्याचे आमचे डावपेच असतात. आज तसे काही नव्हते. त्यामुळे डावाच्या प्रारंभापासूनच फटके मारण्यास सुरुवात केली. आजच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्याने गोलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. आमचे गोलंदाज आजच्या चुकांपासूननक्कीच काही धडे घेतील आणि पुढील सामन्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली. तेंडुलकर म्हणाला की, आजची शतकी खेळी ही माझ्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे.आज एका टप्प्यावर आम्हाला वेगाने धावा जमविता येणे अवघड झाले होते. अशा वेळी आम्हाला धावसंख्येला वेग देणे शक्य झाले त्याबद्दल मी समाधानी आहे. त्यामुळेच आजची खेळी माझ्या दृष्टीने मोलाची आहे.
एका क्षणी आपण द्विशतक करू शकतो असा विचार माझ्या मनात आला होता. आपण पन्नास षटके खेळलो तर द्विशतक पूर्ण करू शकू असे मला वाटले होते. दुसऱ्या सामन्यात एक चेंडू माझ्या पोटावर आदळला होता. आज त्या जागेवरच मला वेदना होऊ लागल्या. या वेदना सहन करण्यापलीकडे गेल्यावर मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, असेही सचिन म्हणाला.
चौथ्या सामन्यात तू खेळू शकशील का असे विचारले असता तो म्हणाला की, याचा निर्णय उद्या होईल. रायडर आणि मॅककुलम ही जोडी ज्या पद्धतीने खेळत होती ते पाहता तुम्हाला भारताच्या पराभवाची भीती वाटली होती का असे विचारले असता तो म्हणाला की, त्यांनी डावाची सुरुवात तर जोरदार केली होती. मात्र एकापाठोपाठ गडी बाद होत गेल्याने त्यांच्या हातून सामना निसटला.
एकदिवसीय सामन्यांत पन्नास शतके झळकाविण्याचा विक्रम करणार का असे विचारले असता तो म्हणाला की, मी अशा तऱ्हेची उद्दिष्टे ठेवून कधीच मैदानात उतरत नसतो. खेळाचा आनंद घेण्याची माझी वृत्ती आहे.