Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

गेलच्या शतकानंतरही वेस्ट इंडिजच ४ बाद २२३
पोर्ट ऑफ स्पेन, ८ मार्च/ वृत्तसंस्था

येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या अंतिम आणि निर्णायक कसोटीच्या मालिकेत १-० अश्या पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने उपाहापर्यंत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवत सामन्यावर चांगलीच पकड मिळविली होती. काल ‘नाईट वॉचमन’ म्हणून आलेल्या डॅरेन पॉवेलला (०) भोपळासुद्धा फोडू न देता स्टुअर्ट ब्रॉडने तंबूत धाडले तर रामनरेश सरवानला (१४) पदार्पण करणाऱ्या अमजद खानने पायचीत पकडत वेस्ट इंडिजला तिसरा धक्का दिला. दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने कर्णधार ख्रिस गेलवर काही काळ दडपण आले होते. पण काल अर्धशतकाच्या उंबठय़ावर असलेल्या कर्णधार ख्रिस गेलने ( नाबाद १००) आज शतक झळकावित संघाचा डाव सावरला, पण त्यानंतर दुखापतीमुळे त्यालातंबूत परतावे लागले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्ट इंडिजची ६० षटकात ४ बाद २२३ अशी अवस्था होती. त्यावेळी त्यावेळी शिवनारायण चंद्रपॉलबरोबर (नाबाद ५) ब्रॅन्डन नॅश (नाबाद ४ ) खळत होता. दौऱ्यातील शेवटची आणि निर्णायक कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या ईर्षेने मैदानात उतरलेल्या इंग्लंडने ५४६ धावांचा डोंगर उभारला तो पॉल कॉलिंगवूड (१६१) आणि यष्टिरक्षक मॅट प्रायर (नाबाद १३१) यांच्या २१८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर. कॉलिंगवूडने आज चौफेर फलंदाजी करीत दीडशतकापर्यंत मजल मारून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तर मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला शतकाचे गिफ्ट दिले मॅट प्रायरने. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात एकदम झोकात करुन दिली असून, दिवसअखेर त्यांची १९ षटकांत १ बाद ९२ अशी अवस्था होती. कालच्या २ बाद २८२ वरून पुढे खेळताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. काल शतक झळकावून संघाला मोठय़ा धावसंख्येकडे घेऊन जाणाऱ्या कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसला (१४२) एडवर्ड्सने त्रिफळाचीत करीत संघाला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पहिल्या दिवशी दुखापतीमुळे मैदानाबाहेर पडलेला ओवेश शहा (३३) फलंदाजीला आला, पण त्यालासुद्धा जास्त धावा करता आल्या नाहीत. दिवसाच्या सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर इंग्लंडचा संघ गडगडणार की काय असे वाटू लागले. पण एक बाजू लावून धरणाऱ्या कॉलिंगवूडने यष्टिरक्षक मॅट प्रायरच्या सहाय्याने द्विशतकी भागीदारी रचली. फलंदाजीला आलेल्या प्रायरने .स्फोटक फंलंदाजी करीत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वीही ठरली. प्रायरचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत कॉलिंगवूडनेही हळूहळू फटके मारायला सुरुवात केली आणि उपाहारापूर्वी शतक पूर्ण करीत संघाला ३७२ धावांपर्यंत मजल मारून दिली. उपाहारनंतर चौफेर टोलेबाजी करीत कॉलिंगवूडने त्याचे दीडशतक तर प्रायरने त्याचे शतक पूर्ण केले. चहापानाला तीन षटके बाकी असताना कॉलिंगवूडला बेकरने पायचीत पकडत वेस्ट इंडिजला दिवसातील तिसरे यश मिळवून दिले. चहापानानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत संघाची धावसंख्या फुगविण्याचा प्रयत्न केला आणि कर्णधार स्ट्रॉसने ५४६ धावांवर डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला होता.