Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
व्यक्तिवेध

पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे (एएफएमसी) यंदाचे दीक्षान्त संचलन ऐतिहासिक ठरले. त्याची मानवंदना स्वीकारण्यास कुणी व्हीव्हीआयपी व्यक्ती आल्यामुळे वा संस्थेचे कोणते विशेष संचलन असल्यामुळे नव्हे, तर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमुळे त्यावर प्रसिद्धीझोत होता. तेवीस वर्षीय हरलिन चोप्रा त्या वेळी केंद्रस्थानी होती. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करताना ती डॉक्टर व लेफ्टनंट झालीच, शिवाय दीक्षान्त संचलनाचे नेतृत्व करणारी पहिली महिला कॅडेट होण्याचा मान तिने पटकाविला! यापूर्वी वहिदा प्रीझम या काश्मीरकन्येने २००६ साली दीक्षान्त संचलनाची सलामी दिली होती. ही कामगिरी करणारी ती पहिली महिला ऑफिसर ठरली. हरलिनने मात्र पदवी प्राप्त करताना कॅडेट म्हणून हा आगळा बहुमान संपादन केला. आघाडीच्या औषधनिर्माण कंपनीत प्रशिक्षण व्यवस्थापक असलेल्या लुधियानाच्या केजेएस चोप्रा व नीलम यांची हरलिन ही एकुलती एक कन्या. दहावीच्या परीक्षेत ९४.६ टक्के गुण मिळवीत तिने उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्दीची नांदी केली. त्यानंतर २००४ साली ‘एएफएमसी’मध्ये दाखल होत करिअरची दिशा निश्चित केली. चोप्रा दाम्पत्याने तिच्या निर्णयामध्ये

 

आडकाठी न आणता पूर्णत: पाठिंबा दिला. म्हणूनच की काय, मुलीच्या ऐतिहासिक संचलनाचे साक्षीदार होताना त्यांनी सार्थ अभिमानाच्या आनंदाश्रूंना वाट करून दिली! ‘मला डॉक्टर व्हायचे होतेच. परंतु, त्याच्याच जोडीला देशसेवेचे ध्येय होते. ‘एएफएमसी’त प्रवेश मिळाला नि हा सुवर्णमध्य साधला गेला,’ असे हरलिन सांगते. पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, ऑप्थॅल्मॉलॉजी अशा विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवीत हरलिनने शैक्षणिक आघाडीवर बाजी मारली. त्याचप्रमाणे विद्यार्थी विज्ञान सोसायटीची ती सक्रिय कार्यकर्ती होती. राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय काँग्रेसमध्ये सवरेत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कारही तिने पटकाविला. अर्थात, ‘एएफएमसी’ ही लष्करी धाटणीची प्रशिक्षणसंस्था. त्यामुळेच शारीरिक तंदुरुस्ती हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची. त्यामध्येही हरलिन मागे राहिली नाही. संचलनाचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य कॅडेटमध्ये तिचा समावेश करण्यात आल्यावर गेले महिनाभर त्यांचा सराव सुरू होता. अखेरच्या क्षणी मात्र हरलिनचा एक आगळा पैलू निर्णायक ठरला. तो म्हणजे आवाज! ‘महिनाभर मी घशाची अतोनात काळजी घेतली. गरम पाणीच पीत होते. त्याचप्रमाणे संचलनादरम्यानच्या आदेशांचा अर्थ समजून घेत भरपूर सराव केला. केवळ पहाडी आवाज काढून आदेश दिल्याने कुणी संचलनाचे नेतृत्व करू शकत नाही. त्याच्या जोडीला तुमची देहबोली, आत्मविश्वास आणि सहकाऱ्यांना तुमच्याप्रती असलेला आदरभावही महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच या यशाचे सर्व श्रेय संस्थेतील अधिकारी व सहाध्यायींना देते. संचलनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे खरोखरीच एक स्वप्नवत अनुभव ठरला,’ अशा शब्दांत या यशाचा रहस्यभेद तिने केला. हरलिन आता लवकरच दिल्लीतील लष्करी वैद्यकीय मुख्यालयात एका वर्षांच्या प्रशिक्षणासाठी रुजू होईल. ‘क्लिनिकल रीसर्च’ या क्षेत्रात तिला स्पेशलायझेशन करायचे आहे. लष्करामध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ पदभार सांभाळणे, हे तिचे अंतिम ध्येय आहे. हरलिनसह तिच्या सहाध्यायी मुलींमुळे संस्थेतील यंदाचे संचलन खऱ्या अर्थाने ‘महिलादिन स्पेशल’ ठरले. हरलिनच्या नेतृत्वाबरोबरच ४३ पैकी तब्बल २८ पुरस्कारांवर महिला कॅडेटने हक्क सांगितला! या तुकडीमधून लष्करात दाखल झालेल्या १०३ जणांमध्ये ८४ मुले व १९ मुलींचा समावेश आहे. लष्करामध्ये मुलींना पूर्णवेळ कमिशन देण्याबद्दल खुद्द संरक्षण क्षेत्रामध्येच दुमत आहे. हरलिनसारख्या कर्तबगार मुलींच्या यशामुळे या वादाचा निवाडा महिला अधिकाऱ्यांच्या बाजूने होण्यास निश्चितच भक्कम आधार मिळेल. या ऐतिहासिक संचलनादरम्यान हरलिनने टाकलेले प्रत्येक पाऊल आणि दिलेली प्रत्येक कमांड समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिला करीत असलेल्या यशस्वी नेतृत्वाचे प्रतीक म्हणून प्रेरणादायी ठरेल!