Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९

किन्हीत बिबटय़ाचा धुमाकूळ, मायलेकासह तिघे गंभीर जखमी
बल्लारपूर, ८ मार्च/ प्रतिनिधी

तालुक्यातील किन्ही येथे बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून त्याच्या हल्ल्यात मायलेकासह तिघे गंभीर जखमी झाले. तिघांनाही चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये श्रीपाद रामू मडावी (३७), शांता गजानन भोंगळे (५५) व राहुल गजानन भोंगळे (३५) या मायलेकाचा समावेश आहे.
किन्ही येथे शनिवारी रात्रीपासून बिबटय़ाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी पहाटे गावातील श्रीपाद रामू मडावी हा मित्राला घेऊन गावाजवळील नाल्यावर शौचासाठी गेला.

देशाचे राजकारण बदलण्याची युवकांमध्ये ताकद -ऋषी वैद्य
गोंदिया, ८ मार्च / वार्ताहर

देशाचे राजकारण बदलण्याची ताकद युवकांमध्ये आहे. सूचना व औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून राजीव गांधी यांनी देशात क्रांती घडविली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत समोर जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ऋषी वैद्य यांनी केले.

आंबेडकरांची पवारांशी जवळीक, काँग्रेसपासून दुरावा!
अकोला, ८ मार्च/ प्रतिनिधी

भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वाढलेली जवळीक आणि काँग्रेसपासून झालेला दुरावा अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलवणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहोळ्यातील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली होती. या टीकेचे तीव्र पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उमटले होते. राष्ट्रवादीच्या येथील नेत्यांनी अंबेडकरांच्या टीकेचा निषेध करून प्रत्युत्तर दिले होते. अ‍ॅड. आंबेडकरांचे पवारांशी असलेले हे राजकीय वितुष्ट वाढणार असल्याचे बोलले जात असतानाच त्यात आता परिवर्तन घडून आले आहे.

गोसीखुर्दला अखेर राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा
चंद्रपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा प्रदान करण्यात आला असून केंद्र शासनाचे तसे पत्र गोसीखुर्द संघर्ष समितीला मिळाले आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प झाल्याने आता वर्षांला किमान एक हजार कोटी रुपयाची तरतूद उपलब्ध होईल, असा आशावाद या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळावा, यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी गोसीखुर्द संघर्ष समिती स्थापन करून केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला.

अमरावती विभागातील प्रकल्पांत १९ टक्केच पाणी..
अमरावती, ८ मार्च / प्रतिनिधी

एकबुर्जी प्रकल्पात ४.४८ टक्के साठा
उमा व अडाण प्रकल्प कोरडे
पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना
अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये केवळ १९ टक्के जलसाठा असून पावसाळ्यापर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. गेल्या वर्षी याच काळात मोठय़ा, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये २९ टक्के साठा होता.

वर्धेत ‘नव्या चेहऱ्या’ची परंपरा कायम राहणार? वर्धा लोकसभा मतदारसंघ
प्रशांत देशमुख, वर्धा, ८ मार्च

लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदाराला ‘विश्रांती’ देत नवा चेहरा निवडून देण्याची परंपरा गेल्या सहा निवडणुकीपासून रुजू करणारा वर्धा मतदारसंघ यावेळी ही परंपरा पुढे चालू ठेवणार काय, असा प्रश्न निवडणुकीची घोषणा होताच पुढे आला आहे.

आरोग्य शिबिरात २२५ रुग्णांची तपासणी
पुलगाव, ८ मार्च / वार्ताहर

दादासाहेब दांडेकर स्मृतिप्रीत्यर्थ विठ्ठल मंदिर व धनश्री ग्रामीण अकृषी पत संस्थेच्यावतीने झालेल्या रोगनिदान शिबिरात २२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुख्य समन्वयक बी. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन सुनील राऊत यांनी केले. प्रास्ताविक यशवंत दांडेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रवीण जैन यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे संचालन उमा बिचाल यांनी केले. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माणिक शिरपूरकर, डॉ. प्रकाश क्षत्रीय , डॉ. सचिन कारोटकर, डॉ. खान, डॉ. चंद्रशेखर काळे, डॉ. बानाईत, डॉ. लोखंडे यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी दिलीप अग्रवाल, सतीश पाटील, प्रवीण जैन, वसंत चिनेवार, सुरेश हनमंते, विजय साहू, संजय पाटील, अशोक अवथनकर उपस्थित होते. या कार्यक्रमात सुधाकर दांडेकर, मुकुंद दांडेकर, केशव दांडेकर, मंदा भागवत यावेळी उपस्थित होते. आभार केशव दांडेकर यांनी मानले. रुग्णांना विनामूल्य औषधाचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिनकर ओक विजय फलके, तानाजी पवार, संजय हनमंते, सुरेश पारिसे, श्याम मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कर्नाटक ‘एम्टा’ विरोधात निवेदन
चंद्रपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

भद्रावती परिसरात कर्नाटक एम्टा कोल माईन्सने केंद्र व राज्य शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून कामे सुरू केली असून कंपनीच्या या नियमबाह्य़ कृतीविरुद्ध रिपाइंचे वरिष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्ह्य़ाच्या पुनर्वसन अधिकारी डी.एम. मनकवडे यांना निवेदन सादर केले.

आयुर्वेद उपचार शिबीर
खामगाव, ८ मार्च / वार्ताहर

जायंटस् ग्रुप ऑफ खामगाव मेन शाश्वत आयुर्वेदच्या वतीने नुकतेच येथे आयुर्वेद उपचार शिबीर झाले. या शिबिराचे उद्घाटन पुंजाजी टिकार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवाजीराव देशमुख, शिवशंकर लोखंडकार, सुनील डांगे,अरुण भटकर उपस्थित होते. रुग्णांची तपासणी डॉ. दीपक पाचपोर, डॉ. मोहन खारगडे, डॉ. दीप्ती खोरगडे, अंबादास भापळे व डॉ. प्रदीप टिकार यांनी केली.

चोरी करताना चार महिलांना अटक
खामगाव, ८ मार्च / वार्ताहर

चौधरी फॅशनमधून चार महिलांनी साडी चोरण्याचा प्रयत्न केला. तेथील कामगार व सुरक्षा रक्षकाच्या सूचकतेने चौघींना चोरीच्या साडीसह पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. चौघींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लग्न सराई सुरू असल्याने चौधरी फॅशनमध्ये ग्राहक म्हणून प्रतिभा शंकर रामटेके, छाया सुधीर मेश्राम, आशा भीमराव रामटेके व संतोषी वसंता बावणे (सर्व रा. रेल्वे क्वॉर्टरजवळ, कोठारी फैल) यांनी १ हजार ३५२ रुपये किमतीची साडी चोरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चौघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

प्राध्यापक महासंघाचा आज मुंबईत मोर्चा
यवतमाळ, ८ मार्च / वार्ताहर
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापकांना राज्य कर्मचाऱ्यांसोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांचा प्रश्न सोडवावा व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एम.पुक्टो) वतीने सोमवार ९ मार्चला दुपारी १२ वाजता मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.आझाद मैदानावर निघणाऱ्या या मोर्चास संघटनेचे नेते प्रा. सदाशिवन, डॉ. एकनाथ कठाडे व आमदार प्रा. बी.टी. देशमुख मार्गदर्शन करणार आहेत, अशी मागणी डॉ. विवेक देशमुख यांनी दिली.

एस.टी. कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक
चंद्रपूर, ८ मार्च / प्रतिनिधी

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक अशोक तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी अशोक अग्रवाल तर विभागीय सचिवपदी मधू दानव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुशील कुंजलवार यांचे सुयश
उमरेड, ८ मार्च / वार्ताहर

नूतन आदर्श कला, वाणिज्य आणि म.ह. वेगड विज्ञान महाविद्यालयातील प्रा. सुशील गजाननराव कुंजलवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली आहे. त्यांना निवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. के.एच. माकडे व डॉ. एन.एम. डोंगरवार यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. सुशील कुंजलवार यांना एम.एस्सी.मध्ये सूवर्णपदक मिळाले होते व विद्यापीठातून सर्वप्रथम आले होते, हे विशेष.

‘निर्मल ग्रामसाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे’
दर्यापूर, ८ मार्च / वार्ताहर

शासनाच्या विविध योजना आदर्श गाव करण्याकरिता आहेत. तंटामुक्त ग्राम करण्याकरिता प्रामुख्याने गाव दारूबंदी बरोबरच गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, वेसनमुक्त अभियान बरोबरच हागणदारी मुक्त गाव म्हणजेच निर्मल ग्राम पुरस्कार मिळण्याकरिता सर्व गावातील ग्रामस्थांनी पुढे येऊन गाव सर्व पुरस्काराकरिता कसे पुढे येईल याकरिता प्रयत्न करावे, असे प्रतिपादन दर्यापूर तहसीलदार अरुण नेमाडे यांनी केले. दर्यापूर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली खैरी ग्रामपंचायतला महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून गडीकर, बाबुलाल चौरपगार, खैरीचे माजी सरपंच दिनकर देशमुख, पाटील सुखदेव खांडेकर आदींच्या उपस्थितीत तंटामुक्त ग्राम पुरस्काराचे वितरण अरुण नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

होळीसाठी नैसर्गिक रंग तयार करा- माळी
बुलढाणा, ८ मार्च / प्रतिनिधी

रासायनिक रंग पर्यावरणासाठी तसेच उपभोक्तयांसाठी घातक असतात म्हणून नैसर्गिक रंग तयार करून होळी खेळावी. होळी जाळण्यासाठी लाकूड व गोवऱ्यांचा वापर जनतेने टाळावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण उपसंचालक संजय माळी यांनी केले आहे. सामाजिक वनीकरण विभागाद्वारे बुलढाणा येथे आयोजित राष्ट्रीय हरित सेनेच्या शाळांच्या अध्यापकासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन होळीची संख्या कमी करणे, प्रतिकात्मक ‘एक गाव एक होळी’ ही संकल्पना जनतेमध्ये रूजवणे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून रंगाचा हा उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याच्यादृष्टीने सामाजिक वनीकरण विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये नैसर्गिक रंग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून जनतेने या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राष्ट्रीय हरितसेना जिल्हा समवेत बाजारातील रासायनिक रंग वापरण्याऐवजी अगदी सुलभ व पांरपरिक पद्धतीने नैसर्गिक रंग घरच्या घरीच तयार करण्यात येऊ शकतात. त्याबद्दलचे प्रसिद्धीपत्रक सुद्धा जिल्हाभर वितरित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

देखभालीच्या नावाखाली गॅसधारकांची लूट
यवतमाळ, ८ मार्च / वार्ताहर

स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून शासनाने सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी कंपनीचे उत्पादन खपवण्यासाठी पाईप आणि देखभालीच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लूट सुरू असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. जिल्ह्य़ातील १,३६,८८५ ग्राहकांकूडन काही गॅस कंपन्या वर्षांकाठी ३ कोटी ३८ लाख ३६ हजार ८२५ रुपयांची सक्तीने वसुली करतात. त्याचप्रमाणे नवीन गॅस कनेक्शनसाठी शेगडी खरेदीची सक्ती करण्यात येते. २१ दिवसांच्या अवधीत एकाही गॅस ग्राहकाला वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार राज्याचे अन्न नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रमेश बंग यांची शिवसेना जिल्हा कार्यालयाचे सचिव प्रमोद जाठे यांच्यासह शिवसैनिकांनी थेट भेट घेऊन केली. याप्रसंगी शिवसेनेचे प्रमोद जाठे, पिंटू बांग, विनोद आदे, प्रवीण कोरडे, विशाल पावडे, संतोष डोमाळे, विठ्ठल भुजाडे, राजू वाघ, संतोष बोरकुटे, प्रशांत कराळे, रिंगू ठेंगाडे, लक्ष्मण जाधव, देवानंद बांधेकर, संदीप गवळी, पप्पू चिकराम, चंद्रकांत पोहेकर, कुणाल देशमुख आदी शिवसैनिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार
भंडारा, ८ मार्च / वार्ताहर

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असून त्याची अधिकृत घोषणा धूळवडीनंतर करणार असल्याचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर लिचड यांच्याकडे पटोले यांनी याबाबत रीतसर अर्ज सादर केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीत आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या कोटय़ात आहे. या जागेकरिता नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षां पटेल यांनी फार पूर्वीपासून मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे आमदार नाना पटोले यांच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.आमदार पटोले यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरू शकतात. दरम्यान, नाना पटोले यांना भाजपची उमेदवारी बहाल केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. पटोले यांनी ही शक्यता मात्र फेटाळून लावली आहे. नाना पटोले यांच्याशिवाय अडय़ाळचे आमदार बंडू सावरबांधे, साकोलीचे सेवक वाघाये आणि भंडाराचे माजी आमदार आनंद वंजारी यांनीही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

उतावळी प्रकल्पाचे पाणी रस्त्यावर
बुलढाणा, ८ मार्च / प्रतिनिधी

उतावळी प्रकल्पांतर्गत मायनर ‘गेट नंबर’ २ व ३ जवळील नायगाव देशमुख, राहेर या रस्त्यावर मायनर पाझरून ३ ते ४ फूट पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा रस्ताच बंद झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्याचा गैरवापर होत असताना देखील या गंभीर बाबीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू, हरभरा, भुईमूग ही पिके उभी असून काढणीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सकाळी उठून आपल्या बैलगाडीने शेतामध्ये जाणे-येणे करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात ‘मायनर’ पाझरत असल्याने मायगाव देशमुख ते राहेर या रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे जवळपास रस्त्यामध्ये पाच ते सहा फुटांचा खड्डा पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून बैलगाडीची वाहतूक करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.

‘कब्रस्थान’च्या संरक्षण िभतीची मागणी
मूर्तीजापूर,८ मार्च / वार्ताहर

येथील अल्पसंख्याक समाजाच्या कब्रस्थानच्या संरक्षणासाठी आवार भिंत बांधण्याची मागणी नगर प्रशासनाकडे मौलाना आझाद विचार मंचच्या शिष्टमंडळाने नुकतीच केली. प्रभारी मुख्याधिकारी वैशाली देवकर यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने अल्पसंख्याक मुख्य शहरांसाठी विकासार्थ १८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये ‘क’ नगरपालिकांसाठी १० लाख रुपयांचा विकासनिधी आहे. मूर्तीजापूर पालिकेंतर्गत अल्पसंख्याक समाजाची लोकवस्ती १० टक्क्यांहून अधिक असल्याचे या विचारमंचाचे म्हणणे आहे. येथील कब्रस्थान असुरक्षित असल्यामुळे त्यामधील कबरांना धोका निर्माण झाल्याने तेथे संरक्षक भिंतीची गरज आहे. या भिंतीच्या निर्मितीसाठी पालिकेने तात्काळ निधी उपलब्ध करून काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष शहाबाज खान यांनी केली आहे.