Leading International Marathi News Daily
सोमवार, ९ मार्च २००९
विविध

गुरुवायुर मंदिरातील दहा दिवसांच्या कृष्णोत्सवाचा प्रारंभ रविवारी हत्तींच्या स्पर्धेने झाला त्यावेळी अलोट गर्दी लोटली.

काश्मीरप्रश्न कायम राहिल्यास ‘कारगिल’ची अनेकवार पुनरावृत्ती!
मुशर्रफ यांची दर्पोक्ती

नवी दिल्ली ८ मार्च/पी.टी.आय.

भारत-पाकिस्तान दरम्यानचा काश्मीरचा प्रश्न दीर्घकाळ तसाच राहिला तर कारगिलसारख्या आणखी घटना घडतील, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आज येथे केली. कारगिल कागाळीत मुशर्रफ यांचा मोठा वाटा होता. मुशर्रफ यांनी सांगितले की, पाकिस्तानी समाजात अनेक मुजाहिद्दीन आहेत तसेच मुक्त जिहादी आहेत त्यांची काश्मीर प्रश्नाशी भावनिक गुंतवणूक आहे.

‘अफगाणिस्तानातील लढाई जिंकणे अवघड’
ओबामांची कबुली

न्यूयॉर्क ८ मार्च/पी.टी.आय.

अफगाणिस्तानातील युद्ध अमेरिकेला जिंकता येणार नाही, अशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली असून आता तेथे समेट घडवण्यासाठी आपली सैन्यदले तालिबानांमधील मवाळ गटांशी संपर्क साधतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एअर फोर्स वन या विमानात त्यांची मुलाखत घेताना न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला होता की, अफगाणिस्तानातील युद्ध अमेरिका जिंकत आहे काय, त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. विशेष म्हणजे ओबामा यांनी काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानात अतिरिक्त १७ हजार सैन्य पाठवण्याची घोषणा केली होती.

भारतीय चित्रपट संगीताची पाश्चात्त्य जगाला ‘आवारा’पासूनच ओळख
लंडन, ८ मार्च/पी.टी.आय.

‘स्लमडॉग मिलिऑनर’च्या ऑस्कर यशामुळे संगीतकार ए. आर. रहमान आणि ध्वनिसंकलक रसूल पुकुट्टी यांच्या कामास पाश्चात्त्य जगाची मान्यता मिळाली हे स्वागतार्ह असले तरी भारतीय चित्रपटसंगीत पाश्चात्त्य जगतापर्यंत जाण्याची ही पहिली वेळ नाही. खरे तर ‘आवारा’सारख्या सार्वकालिक लोकप्रिय कलाकृतीपासून ही परंपरा सुरू आहे. लंडनच्या सेंट अ‍ॅँड्रय़ूज विद्यापीठातील चित्रपट विषयाच्या प्रोफेसर दिना आयर्दानोवा यांचे हे मत आहे.

स्लमस्टार्सचे कौतुक होत असताना ‘चायपाव’ मात्र उपेक्षेच्या गर्त अंधारात..
बंगलोर, ८ मार्च/पी.टी.आय.

‘स्लमडॉग मिलिऑनर’मधील बालकलावंतांचे अर्थात स्लमस्टार्सचे सर्वत्र कौतुक होत असताना आणि त्यांच्यावर बॉलीवूडच्या ऑफर्सचाही वर्षांव सुरू झाला असतानाच मुंबईतील झोपडपट्टय़ा व देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनाचा मागोवा घेणाऱ्या ‘सलाम बॉम्बे’मधील स्टार शफीक सईद मात्र उपेक्षेच्या गर्त अंधारात जीवनाची लढाई लढत आहे. ‘सलाम बॉम्बे’ करायचा निर्णय मीरा नायर यांनी घेतला तेव्हा या चित्रपटात नाना पाटेकरसारख्या प्रथितयश कलाकारासोबत झोपडपट्टीतील मुलेच काम करतील, असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे ‘चायपाव’ या रोलसाठी कचरा गोळा करून पोट भरणाऱ्या शफीकची निवड झाली. या चित्रपटाने आपले आयुष्यच बदलल्याचा भास शफीकला झाला.

‘बिग बी’ यंदा खेळणार नाही होळी!
नवी दिल्ली, ८ मार्च/पी.टी.आय.

बॉलीवुडचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यंदा होळी साजरी करणार नाही. मुंबईवर अलीकडेच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अद्याप ताज्या असताना आपण होळी खेळण्याचा विचार मनात आणू शकत नाही, असे ‘बिग बी’ने आपल्या ब्लॉगवर चाहत्यांना उद्देशून लिहिले आहे.

मुंबई हल्ल्याचे धागेदोरे आढळले सात देशांत
इस्लामाबाद, ८ मार्च/वृत्तसंस्था

मुंबईत गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे सात देशांपर्यंत पोहोचल्याचे इंटरपोलचे सरचिटणीस रोनाल्ड के. नोबल यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द नेशन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. रोनाल्ड के. नोबल यांनी पुढे म्हटले आहे की, मुंबई हल्लाप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीत इंटरपोल व पाकिस्तान परस्परांना उत्तम सहकार्य करीत आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे सात देशांपर्यंत पोहोचले आहेत. या कटामध्ये सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांना आम्ही नक्कीच हुडकून काढू व ताब्यात घेऊ.

अपहृत सैनिकांची तालिबान्यांकडून हत्या
पाकिस्तानला हादरा
इस्लामाबाद, ८ मार्च/पी.टी.आय.

पाकिस्तानातील तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तान हद्दीलगतच्या परिसरातून काल अपहरण केलेल्या १४ पाकिस्तानी सैनिकांची आज निर्घृण हत्या केली. काल सुरक्षा सैनिकांशी चकमक झडल्यानंतर १४ सैनिकांचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. आज या सैनिकांचे चाळण झालेले मृतदेह स्थानिक लोकांना रस्त्यावर फेकलेले आढळून आले. सुरक्षा दलाने अतिरेक्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. बाजौर या आदिवासीबहुल भागात लष्कराने केलेल्या कारवाईत आतापर्यंत पंधराशे अतिरेकी ठार झाले आहेत. त्यानंतर ‘महम्मद एजन्सी’ या अतिरेकी संघटेच्या हस्तकांनी लष्करात शिरकाव केला आणि त्यामुळेच काल हे अपहरण शक्य झाले, असा कयास आहे. महम्मद एजन्सीचा म्होरक्या काही दिवसांपूर्वीच लष्कराच्या कारवाईत मारला गेल्याचा दावा लष्कराने आधी केला होता. या संघटनेने मात्र तो फेटाळला होता.