Leading International Marathi News Daily
मंगळवार, १० मार्च २००९

२६/११ ची सुनावणी २३ मार्चपासून
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कसाब कोर्टासमोर
मुंबई, ९ मार्च / प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबसह दोन भारतीय संशयित फईम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख यांनी आरोपपत्राची प्रत उर्दूमध्ये देण्याची केलेली विनंती मुख्य महानगर दंडाधिकारी एन. एन. श्रीमंगले यांनी आज फेटाळून लावली व त्यांच्याविरुद्धचा खटला विशेष न्यायालयात वर्ग केला. त्यामुळे येत्या २३ मार्चपासून विशेष न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांच्यासमोर कसाबच्या खटल्याच्या सुनावणीस सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज कसाबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पवारांचा गेम.. युतीवर नेम..!
राष्ट्रवादीला शिवसेनेऐवजी प्रतिस्पर्धी हवा भाजप !

मुंबई, ९ मार्च / खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी व शिवसेना यांतील गुफ्तगू वाढल्याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी मतदारसंघात शिवसेनेऐवजी भाजपचा उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीच्या निवडून येऊ शकतील अशा मतदारसंघांतील मतभेद टाळण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पुढाकार घेतला. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी ती जागा नको, अशी मागणी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी केली.

युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच!
मुंबई, ९ मार्च/ खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात शिवसेनेने २२ तर भाजपने २६ जागा लढण्याचे सूत्र निश्चित झाल्यानंतरही काही जागांवरील मतभेदामुळे सेना-भाजपतील जागावाटपच्या चर्चेचे गुऱ्हाळ आजही सुरूच राहिले. त्यामुळे युतीची घोषणा आणखी दोन दिवस होऊ शकणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. भाजपबरोबरच्या चर्चेत भिवंडीतील जागेच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने ताणून धरले असले तरी प्रत्यक्षात शरद पवार यांच्या काँग्रेसबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटीत पवारांना अधिकाधिक फायदा व्हावा या हेतूने शिवसेना अजूनही युतीची घोषणा करण्यास तयार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

युतीत सूत्र २६ - २२ चेच, पण २६ कुणाला?
मुंबई, ९ मार्च/प्रतिनिधी

शिवसेना-भाजपा युतीचा फॉम्र्युला २६ - २२ चाच राहणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले तरीही दोन्ही पक्षांचे नेते २६ जागा आम्हाला, असे छातीठोकपणे सांगत आहेत. सोमवारी युतीची औपचारिक घोषणा होणार होती. मात्र ऐन वेळी सुभाष देसाई यांनी नितीन गडकरी यांच्या घरी पुन्हा एकदा गडकरी-मुंडे-तावडे यांची भेट घेऊन भिवंडीची जागा आम्हाला हवी असल्याचे सांगून घोषणा लांबणीवर टाकली. शिवसेनेच्या गोटातून मात्र ही घोषणा लांबणीवर टाकण्यामागे दुसरेतिसरे काही नसून भाजपच्या घटलेल्या शक्तीमुळे २६-२२ च्या फॉम्र्युल्यात आम्हाला २६ जागा सोडल्यासच काँग्रेस-एनसीपीचा पाडाव होऊ शकतो, असे सेनेतील नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे भाजपचे राज्यातील दोन्ही ज्येष्ठ नेते शिवसेनेची २६ जागांची मागणी हास्यास्पद असल्याचे सांगत आहेत. अशी कोणतीही मागणी सेनेने केली नसली तरी त्यांनी दक्षिण मुंबई, यवतमाळ, कल्याण अशा ज्या जागांवर वाद होते त्या सगळ्या जागा पदरात पाडून घेतल्यावरही आता त्यांना भिवंडी हवी आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. दिल्लीतील नेत्यांच्या दबावामुळे आम्ही गप्प आहोत. मात्र आता पाणी डोक्यावरून जाऊ लागत असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानी लष्कर बंडाच्या पवित्र्यात?
नवी दिल्ली, ९ मार्च/पीटीआय

पाकिस्तान पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या आवर्तात सापडण्याची चिन्हे आहेत. त्या देशामध्ये उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगांमुळे टेकीला आलेले विद्यमान अध्यक्ष असीफ अली झरदारी आपल्या हातातून सत्ता निसटू नये यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत असतानाच दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी लष्कर पुन्हा बंड करण्याच्या पवित्र्यात असल्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने दिलेल्या निर्देशानूसार पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी यांनी असीफ अली झरदारी यांना देशाचा गाडा सुरळीत कसा हाकला जाईल याकडे अधिक लक्ष पुरविण्याची सूचना नुकतीच केली असे सांगितले जाते.

आचारसंहितेमुळे ‘शिववडा’ शिळा होणार !
बंधुराज लोणे
मुंबई, ९ मार्च

शिवसेना कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘शिव वडापाव’वर आचार संहितेचे सावट आले असून त्यामुळे येत्या १ मे रोजी शिव वडापाव योजना धुमधडाक्यात सुरू करण्याचा ठाकरे यांचा बेत त्यांना पुढे ढकलावा लागणार आहे. ‘शिव वडापाव’ ही योजना ठाकरे यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. या योजनेला पालिकेतील विरोधी पक्षांनी तीव्र आपेक्ष घेतला आहे. या योजनेचे नाव बदलावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र शिवसेना या नावावर ठाम राहिली असून पालिकेच्या विविध समित्यांमध्ये या योजनेला मंजूरी घेण्यात आली आहे. गेल्या १९ फेब्रुवारी रोजी सुधार समितीत शिवसेनेचे पूर्ण बहुमत नसतानाही या योजनेला मान्यता घेण्यात शिवसेनेला यश आले.

अकरावी-बारावीसाठी आता एकपुस्तकी धोरण!
आशिष पेंडसे
पुणे, ९ मार्च

कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर एकाच अधिकृत पुस्तकाला मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असून राज्य शासनानेही त्याला अनुमती दिली आहे. त्यामुळेच आगामी शैक्षणिक वर्षांपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांना एकाच विषयासाठी आठ-दहा पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार नाही! कालांतराने हा निर्णय बारावीसाठीसुद्धा राबविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मानेवरील अभ्यासाचे जोखड कमी होणार असले, तरी प्रकाशक लॉबीकडून मात्र या निर्णयात खो घातला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सचिन तेंडुलकर हॅमिल्टनच्या चौथ्या लढतीला मुकणार?
ख्राईस्टचर्च, ९ मार्च / पीटीआय

न्यूझीलंडविरुद्ध काल झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीदरम्यान सचिन तेंडुलकरच्या ओटीपोटाला झालेली दुखापत कुठली काळजी करण्याइतपत गंभीर नसली तरी येत्या बुधवारी हॅमिल्टनला होणाऱ्या चौथ्या लढतीतील त्याच्या सहभागापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. कालच्या तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात १६३ धावा फटकावणारा सचिन तेंडुलकर दुखापतीमुळे निवृत्त झाला होता. त्याच्या दुखापतीवर येथील स्थानिक इस्पितळात एमआरआय स्कॅन करण्यात आले. या स्कॅनचा निकाल उघड केला नसला तरी मिळालेल्या माहितीनुसार सचिनच्या ओटीपोटाला दुखापत झाली आहे पण, ती काळजी करण्यासारखी नाही. परंतु सचिन चौथ्या लढतीसाठी उपलबद्ध आहे की नाही, याबाबत मात्र उद्या होणाऱ्या भारतीय संघाच्या सराव सत्रानंतरच स्पष्ट होईल.

काँ. प्रभाकर संझगिरी यांचे निधन
मुंबई, ९ मार्च / प्रतिनिधी

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रभाकर संझगिरी यांचे आज रात्री दहाच्या सुमारास विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचे ते १७ वर्षे अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र ‘सीटू’चेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील शेतमजूर आणि कामगारांच्या लढय़ासाठी त्यांचे योगदान होते. ‘महिंद्रा’चे कामगार असोत वा सोलापूरमधील शेतमजूर असोत त्यांना संघटीत करून सरकारच्या विरोधात लढण्याचे तंत्र संझगिरी यांनीच शिकवले. संयुक्त पक्षाच्या फुटीनंतर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाराष्ट्रात वाढविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. पक्षात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्क्‍सवाद, लेनिनवादाबरोबरच भारतातील सांस्कृतिक प्रश्नांची जाण करून देण्यामध्ये संझगिरी यांचा मोलाचा वाटा होता. त्यांची अंत्ययात्रा उद्या भांडुप येथील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातून सायंकाळी ४ वाजता निघणार आहे.

टीव्ही मालिकेमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
मुंबई, ९ मार्च / प्रतिनिधी

टीव्ही मालिकेमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून निवृत्त बँक अधिकारी महिलेकडून तीन लाख रुपये लुटल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दहिसर येथे राहणाऱ्या सीमा मुणगेकर (४९) या पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरीला होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. स्वेच्छानिवृत्तीनंतर अभिनयाची त्यांची आवड पुन्हा जागृत झाली. त्याच वेळेस त्यांनी एका इंग्रजी दैनिकात ‘पेज ३, मेंबर ऑफ असोसिएशन ऑफ पिक्चर अ‍ॅण्ड प्रोडय़ुसर्स’ची जाहिरात पाहिली. जाहिरातीमध्ये टीव्ही सिरियलमध्ये काम मिळवून देण्याचा दावा करण्यात आला होता. मुणगेकर यांनी तात्काळ जाहिरातीमध्ये दिलेल्या क्रमांकावर दूरध्वनी करून जाहिरातीविषयीची माहिती घेतली. त्या वेळी प्रकरणातील फरारी आरोपी नेहा देसाई हिने मुणगेकर यांना कंपनीच्या कांदिवली येथील निकुंज छाया इमारतीतील कार्यालयात भेटण्यास बोलावले. मुणगेकर या नेहाला भेटायला गेल्यावर त्यांची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली व त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेण्यात येऊन त्यासाठी १० हजार रुपयांची रक्कमही घेण्यात आली. याशिवाय मुणगेकर यांना लवकरच तुम्हाला तीन-चार सिरियलमध्ये काम मिळवून दिले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार काही दिवसांनी नेहाने मुणगेकर यांना दूरध्वनी करून त्यांना ‘मिलेनियम साडी’च्या जाहिरातीसाठी त्यांची निवड झाल्याचे सांगितले. मात्र त्यासाठी त्यांना कंपनीला तीन लाख रुपये द्यावे लागतील आणि जाहितीचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या तीन लाख रुपयांसोबत कामाचा मोबदला म्हणून आणखी सहा-सात लाख रुपये मिळतील असे सांगितले. दुप्पट फायदा होणार असल्याच्या आशेखातर मुणगेकर यांनी तीन लाख रुपयेही दिले. मात्र पैसे भरल्यानंतर बरेच दिवस कंपनीकडून काही कळविण्यात न आल्याने मुणगेकर कांदिवली येथील कंपनीच्या कार्यालयात गेल्या. पण तेथे त्यांना कार्यालयाला टाळे असल्याचे आढळून आले.

 


प्रत्येक शुक्रवारी