Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

डार्विनवादाचे विरोधक

डार्विनवाद म्हणजे चार्ल्स डार्विन आणि अल्फ्रेड रसेल वॅलेस यांनी मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत. कुठल्याही जीवशास्त्राच्या प्राध्यापकाला विचारलं तर तो या सिद्धांताचं ‘जग बदलणारा सिद्धांत’ असं वर्णन करेल. आधुनिक जीवशास्त्र, वैद्यक, रेण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान हे या सिद्धांताच्या पायावर उभे आहेत. इ. स. १९७३ मध्ये थिओडोसिअस दोब्झान्स्की या अनुवंश-शास्त्रज्ञानं ‘द अमेरिकन बायॉलॉजी टीचर’ या मासिकात एक लेख लिहिला. त्यात तो म्हणतो- ‘जीवशास्त्रातील कुठल्याही बाबीचा अर्थ लावायचा तर त्यासाठी उत्क्रांतीच्या सिद्धांताची मदत घ्यावी लागते.’ दोब्झान्स्कीनं हे म्हणायचं कारणही तसंच होतं. धार्मिक विरोधाला न जुमानता उत्क्रांतीचा सिद्धांत निर्भयपणे शिकवला गेला तरच अमेरिकी वैज्ञानिक जीवशास्त्रासंबंधित विषयांचे संशोधन करू शकतील आणि त्यासाठी त्या वेळी शाळेत शिकत असलेल्या भावी वैज्ञानिकांना उत्क्रांतीवाद नीट समजावून द्यायला हवा, असं त्याचं म्हणणं होतं. गेल्या वर्षी म्हणजे इ.स. २००८ मध्ये आर्थर लँडी लुइझिआनाचे राज्यपाल बॉबी जिंदाल यांना हेच समजावून सांगत होते.
आर्थर लँडी हे जीवशास्त्राचे ख्यातनाम प्राध्यापक असून पेशीशास्त्र आणि जीवरसायन शास्त्रातील

 

अधिकारी व्यक्ती म्हणून ते जगप्रसिद्ध आहेत. लँडीनी उत्क्रांतीवादाचं महत्त्व बॉबी जिंदाल यांना समजावून द्यावं याला कारणही तसंच झालं होतं. लुइझिआनाच्या लोकप्रतिनिधिगृहापुढं आलेल्या एका ठरावाचं कायद्यात रुपांतर करण्याचा प्रस्ताव बॉबी जिंदाल यांच्याकडे पाठविण्यात आला होता.हा ‘लुइझियाना सायन्स एज्युकेशन अ‍ॅक्ट’ म्हणजे उत्क्रांतीवाद शिकविण्याच्या विरोधातला ठराव होता. बॉबी जिंदाल लँडीच्या अनुवंशशास्त्राच्या वर्गातले एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते, याची लँडींना आठवण होती. त्यामुळंच लँडी लुइझिआनाच्या या राज्यपालांना भेटायला आले होते. जिंदाल यांना उत्क्रांतीचं महत्त्व नव्यानं पटवून देण्याच्या या उद्योगात अमेरिकन ‘इन्स्टिटय़ूट ऑफ बायॉलॉजिकल सायन्सेस’ ही संस्थाही लँडींना साथ देत होती. त्यांनी तर जिंदाल यांना लिहिलेल्या पत्रात ‘या ठरावाचं कायद्यात रुपांतर झालं तर विज्ञान शिक्षणापेक्षा लुइझिआनात राजकारण महत्त्वाचं मानलं जातं, असं मानलं जाईल’ असे लिहिलं होतं. ‘द अमेरिकन असोसिएशन ऑफ अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेनं, हा कायदा झाला तर वैज्ञानिक तत्त्वनिष्ठ विचारांची ती गळचेपी ठरेल, असे म्हटलं होतं. याआधी अमेरिकेतील जीवशास्त्र शिक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेनं लुइझिआनाच्या लोकप्रतिनिधींना, हा ठराव पारित करू नका, त्याचा पराभव करा’, असं आवाहन केलेलं होतं. ह्य़ा ठरावाचं कायद्यात रुपांतर झालं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल गोंधळ निर्माण होईल. ज्याचा विज्ञानाशी कोणताही संबंध नाही, असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाबद्दल कलुषित विचार उत्पन्न करतील, सबब प्रस्तुत ठरावाच्या विरोधात मतदान करणंच योग्य ठरेल, असं लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात आलं होतं. याचा कसलाही उपयोग झाला नाही. २६ जून २००८ या दिवशी बॉबी जिंदाल यांना हा कायदा अमलात आल्याची सही केली, असं जाहीर करण्यात आलं. ज्या कायद्यात एवढा विरोध होता, तो कायदा आहे तरी काय, हे बघणं इथं आवश्यक ठरतं. वरकरणी हा कायदा अतिशय निरुपद्रवी दिसतो. या कायद्याचे महत्त्वाचे कलम शिक्षकांनी, शाळांनी आणि शाळा चालकांनी सार्वजनिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतून जे वैज्ञानिक सिद्धांत शिकवले जातात त्यांचे वस्तुनिष्ठ परीक्षण, तर्कशुद्ध पृथ:करण आणि खुल्या चर्चेने निराकरण करण्याचे वातावरण निर्माण करावे आणि त्याची जोपासना करावी, असे आहे. खरंतर हे सर्व कायद्याने विज्ञान शिक्षकांना सांगायची काहीच गरज नाही, कारण विज्ञान असच शिकवायचं असतं. पण ह्य़ा कायद्याचं लक्ष ‘उत्क्रांती’ असून या कायद्यामुळे ‘क्रिएशनिझम’ म्हणजे ‘सृष्टी परमेश्वराने निर्माण केली’, ही धार्मिक बायबलप्रणीत दंतकथाही शाळांतून शिकवणे आवश्यक ठरणार आहे. अमेरिकेत परमेश्वरनिर्मित सृष्टीवादानं गेली दीडशे वर्षे डार्विनप्रणीत उत्क्रांतीवादाला विरोध केला आहे. १९२० नंतरच्या दशकांत ‘उत्क्रांती’ शिकविण्यावर बंदी घालण्याचे कायदे झाले. टेनेसी राज्यात बटलर अ‍ॅक्ट अमलात आला. त्यामुळे जॉन टी. स्कोप्स हा शिक्षक अमर झाला. (ह्य़ा खटल्याची पूर्ण हकीकत माझ्या ‘उत्क्रांतीची नवलकथा’ या पुस्तकात दिली आहे.) त्याला दोषी ठरविण्यात आले. पण खटल्याबद्दलच्या तांत्रिक चुकीमुळे पुढे त्याची सुटका झाली. यानंतर मंदी आणि दुसरे महायुद्ध या काळातल्या इतर प्रश्नांमुळे उत्क्रांतीकडे दुर्लक्ष झाले.
इ.स. १९६८ मध्ये अर्कान्सास राज्यात पुन्हा उत्क्रांती न्यायालयात गेली. अेपर्सन विरुद्ध अर्कान्सास या खटल्यात धार्मिक शिक्षणवाद्यांनी नवा पवित्रा घेतला. क्रिएशनिझम हाही शास्त्रीय विचार असून त्याला शिक्षणात उत्क्रांतीएवढाच वेळ मिळायला हवा म्हणून परमेश्वरनिर्मित सृष्टीनिर्मितीला ‘सायंटिफिक क्रिएशनिझम’ असं नवं नाव देण्यात आलं. त्याचा ‘क्रिएशन सायन्स’ असाही उल्लेख करण्यात येऊ लागला. १९८१ पर्यंत २७ राज्यांमधून अशा तऱ्हेचे खटले चालून उत्क्रांतीइतकाच वेळ ‘वैज्ञानिक परमेश्वरनिर्मित सृष्टी विचारा’ला द्यावा, असे कायदे करण्यात आले. हा कायदा लुइझिआनातही अमलात आला. ‘द बॅलन्सड ट्रीटमेंट अ‍ॅक्ट फॉर क्रीएशन सायन्स अ‍ॅण्ड इव्होल्युशन सायन्स’ असं ह्य़ा कायद्याला म्हणण्यात आलं.
‘लुइझिआना बॅलन्स्ड ट्रीटमेंट अ‍ॅक्ट’ ज्या पुराव्यांवर आधारित होता, ते विचार परमेश्वरवाद्यांनी प्रसारित केलेल्या ‘शून्यातून विश्वनिर्मिती’ (क्रिएशन अ‍ॅड् निहीलो) या परिपत्रकात एकत्रित केले होते. या शून्यातून विश्वनिर्मिती परिपत्रकाने सृष्टीनिर्मिती ही अगदी अलीकडची बाब आहे, सर्व जगात एक महापूर आला, त्यातून वाचलेले प्राणी आज आपण पाहतो. माणूस आणि अेप यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, हे महत्त्वाचे मुद्दे होते आणि कायद्यानं शाळेत ते शिकवणं सक्तीचं केलं होतं.
१९८१ मध्ये अर्कान्सास राज्यात हा कायदा पास होताच, त्या विरोधात लगेचच दाद मागण्यात आली आणि तो कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे लुइझिआना बॅलन्सड ट्रीटमेंट अ‍ॅक्ट जेव्हा लोकप्रतिनिधिगृहात चर्चेत होता, तेव्हा क्रिएशनिझम संबंधीचे बायबलसंबंधीचे विशेषत: जेनेसिस खंडासंबंधीचे सर्व उल्लेख गाळून ‘क्रिएशन’विषयीचे शास्त्रीय पुरावे आणि त्यातून निष्पन्न होणारे निष्कर्ष शिकवणं आवश्यक आहे, असं १९८१ मध्ये म्हणण्यात आलं. पुढं १९८७ मध्ये हा कायदा बेकायदा आहे, असं ठरविण्यात आलं. ‘क्रिएशनिझम’ त्याचं बाह्य़स्वरुप बदलण्यात पटाईत आहे. १९८९ मध्ये ‘क्रिएशनिझम’ला ‘अिंटेलिजंट डिझाइन’ हे नवं लेबल चिकटविण्यात आलं. ‘ऑफ पांडाज अ‍ॅण्ड पीपल’ नावाची एक पाठय़पुस्तक पुरवणी तयार करून ती शाळांच्या माथी मारण्यात लुइझिआना राज्यास यश आलं. ही पुरवणी पुस्तिका ‘द फाउंडेशन फॉर थॉट्स अ‍ॅण्ड अेथिक्स’या संस्थेनं प्रसारित केलेली होती. ही संस्था स्वत:ला खिश्चन विचारांची संरक्षक म्हणवून घेते. लुइझिआनाचा बॅलन्सड ट्रीटमेंट अ‍ॅक्ट म्हणजे समतोल न्याय्य भूमिकेच्या कायद्यात बसविता यावं म्हणून ‘इंटेलिजंट डिझाइन’चा सिद्धांत हा कुठल्याही धर्मग्रंथावर आधारलेला नाही (थोडक्यात म्हणजे बायबलचा आणि याचा काही संबंध नाही) असा दावा ही संस्था करतेच, पण यात कुठल्याही अतिमानवी किंवा अमानवी सूत्राचाही संबंध नाही, असं या संस्थेचं म्हणणं आहं. ‘हा जो डिझायनर किंवा विश्वनिर्माता आहे तो परमेश्वरच आहे असं नाही, तर अवकाशातून आलेले बुद्धिमान परग्रहवासी किंवा एखादा कालप्रवास करणारा पेशी वैज्ञानिक यालाही हे जीवन निर्मितीचं श्रेय असू शकतं; असंही या पुस्तकाचे लेखक दावा करतात, पण जर खोलात जाऊन विचार केला तर इंटेलिजंट डिझाईन म्हणजेच नव्या बाटलीतला क्रिएशनिझम आहे, हे कळायला वेळ लागत नाही. पृथ्वीची निर्मिती अगदी अलीकडची आहे. जगबुडीच्या वेळी नोहानं बरेच प्राणी वाचवले, इत्यादी अनेक बाबी या इंटेलिजंट डिझाइनमध्येही आढळतात. इ. स. २००५ मध्ये किझमिलर विरुद्ध डोव्हर एरिया स्कूल डिस्ट्रिक्ट या खटल्यात पुन्हा एकदा डार्विनप्रणीत उत्क्रांतीवाद न्यायालयात हजर झाला. डोव्हर कौंटीत उत्क्रांती शिकविताना ‘हा सिद्धांत नसून एक विचार आहे. हा विचार सजीव निर्मितीच्या अनेक विचारांपैकी एक आहे. या विचारात अनेक त्रुटी असून त्याबाबत कुठलेही स्पष्टीकरण उपलब्ध नाही,’ असं शिक्षकांना स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगावं लागत असे. पेनसिल्व्हानियातील या कौंटीत याबरोबरच ‘ऑफ पांडाज अ‍ॅण्ड पीपल’ हा एक विश्वसनीय सिद्धांत असून तो उत्क्रांतीच्या विचारांना योग्य पर्याय आहे,’ असंही सांगणं सक्तीचं होतं.
याविरुद्ध अकरा स्थानिक पालकांनी अमेरिकेच्या केंद्रीय न्यायालयात धाव घेतली. हे धोरण असंविधानिक आहे, असा त्यांचा दावा होता. न्यायालयाने इंटेलिजन्ट डिझाइनला वैज्ञानिक सिद्धांत म्हणणं योग्य होणार नाही. धार्मिक विचारांवर आधारित असलेल्या या विचारांमागे कुठलेही तर्कशुद्ध स्पष्टीकरण नाही, असा निकाल दिला. किझमिलर विरुद्ध डोव्हर एरिया स्कूल डिस्ट्रिक्ट या खटल्यात जी तज्ज्ञ आली होती त्या बार्बरा फॉरेस्टची साक्ष क्रिएशनिझम सिद्धांताच्या दृष्टीनं फार घातक ठरली. बार्बरा फॉरेस्ट या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक असून त्यांनी ‘क्रिएशनिझम्स ट्रोजन हॉर्स: द वेज ऑफ इंटेलिजन्ट डिझाईन’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. ‘ऑफ पांडाज अ‍ॅण्ड पीपल’मध्ये जे ‘क्रिएशनिझम’चे उल्लेख होते, ते १९८७ मध्ये लुइझिआनाच्या न्यायालयाने ‘बॅलन्सड ट्रीटमेंट अ‍ॅक्ट’ मोडीत काढल्यावर बदलण्यात आले आणि क्रिएशनिझम या शब्दाच्या जागी ‘इंटेलिजंट डिझाइन’ हा शब्द टाकण्यात आला हे दाखवून दिलं. तर, मायकेल बीबी या जीवरसायन शास्त्रज्ञानं, जगातल्या कुठल्याही वैज्ञानिक नियतकालिकामध्ये ‘इंटेलिजंट डिझाइन’ या विषयावर एकही शोधनिबंध प्रसिद्ध झाला नसल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर या खटल्यातील हवाच निघून गेली. अमेरिकेत जेवढा विरोध डार्विनवादाला झाला आहे,तेवढा विरोध दुसऱ्या कुठल्याही ख्रिश्चन देशात झालेला नाही. १९२५ मधली ‘स्क्रोप्स ट्रायल’ आपण बघितलीच. १९६८ मध्ये एपर्सन विरुद्ध अर्कान्सास या खटल्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं उत्क्रांतीचा सिद्धांत शिकविण्यावर बंदी घालता येणार नाही, ते विचार स्वातंत्र्यावर आक्रमण ठरेल असा निकाल दिला होता. १९८१ मध्ये लुइझिआना आणि इतर २५ राज्यांनी ‘इक्वल ट्रीटमेंट’ म्हणजे ‘उत्क्रांती आणि क्रिएशन सायन्स’ यांना समान वेळ शिक्षकांनी द्यावा, असे कायदे केले. १९८७ मध्ये सुप्रीम कोर्टाने ते सर्व कायदे रद्द करायला लावले. १९८९ मध्ये ‘ऑफ पांडाज अ‍ॅण्ड पीपल’ प्रसिद्ध झालं, त्याचं काय झालं ते आपण बघितलंच. दरम्यानच्या काळात गुल्ड-एल्डरिज यांनी एक ‘ट्रंकेटेड इक्विलिब्रियम’ नावाचा सिद्धांत मांडला. स्टीफन जे. गुल्ड यांनी त्यांचे सहकारी यांनी मांडलेल्या या सिद्धांतात, उत्क्रांती डार्विनने सांगितली तशी होत नाही तर ती अचानक घडते, याचं कारण उत्परिवर्तने, असा हा सिद्धांत होता. (याचं विस्तृत स्पष्टीकरण माझ्या ‘उत्क्रांतीची नवलकथा’मध्ये दिलेलं आहे) त्यामुळं क्रिएशनिझमवाल्यांनी त्यांची साक्ष काढली. तेव्हा गुल्डनी न्यायालयात, उत्क्रांती घडते; पण डार्विन म्हणतात त्या प्रकारे ती घडत नाही. डार्विनच्या काळात विज्ञानाची प्रगती झाली नव्हती. त्यामुळे आम्ही म्हणतो ते बारकावे त्यांना कळणं शक्य नव्हतं. उत्क्रांती झालीच; फक्त तिची प्रक्रिया थोडी वेगळी आहे, असं आमचं म्हणणं आहे, असंही त्यांनी त्यांच्या साक्षीत सांगितलं होतं. इ. स. २००८ मध्ये बऱ्याच राज्यांनी इंटेलिजंट डिझाइन शिक्षणक्रमात घुसवायचा प्रयत्न केला. अलबामा, फ्लोरिडा, मिशिगन, मिसुरी आणि साऊथ कॅरोलायना या राज्यांचे हे प्रयत्न फसले असले तरी फ्लोरिडानं पुन्हा नव्यानं प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आपण आज एकविसाव्या शतकात आहोत, असं म्हणतो आणि पृथ्वीच्या पाठीवरच्या सर्वात प्रगत देशात जे काय घडतंय ते बघितलं की आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.
निरंजन घाटे