Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

ठाण्याच्या रिगणात एकनाथ शिंदे उतरणार?
दिलीप शिंदे
ठाणे, ११ मार्च

शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक कोण लढविणार, यावर शिवसेनेत रणकंदन माजले आहे. विद्यमान खासदार आनंद परांजपे यांच्या ऐवजी जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांना आयत्यावेळी ठाण्याच्या रिंगणात उतरविले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
युतीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण व ठाणे असे दोन मतदारसंघ निर्माण झाले आहेत.

उत्तर प्रदेशात ठाकूर उमेदवारांसाठी सपा-भाजपचा छुपा समझोता
समर खडस
मुंबई, ११ मार्च

देशाचे पंतप्रधानपद कोणाकडे जाणार याचा आराखडा उत्तर प्रदेशच्याच निकालांवर ठरत असतो. यंदा उत्तर प्रदेशात जर मायावतींना ४० ते ५० जागा मिळाल्या तर त्यांचा हत्ती पंतप्रधानपदाच्या शर्यतीत खूपच पुढे जाणार आहे. मात्र या हत्तीला जेरबंद करण्यासाठी मुलायमसिंग यादव आणि भाजपच्या राजनाथ सिंग यांचा झालेला छुपा समझोता, हा जागांच्या वाटपामुळे स्पष्ट होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशात सपा व भाजप जितके ठाकूर उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत तितक्या उमेदवारांचा विजय निर्धोक व्हावा यासाठी अमर सिंग व राजनाथ सिंग यांत समझोता झाल्याचे अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेणे वा मतदारसंघ बदलणे यातून स्पष्ट झाले आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या ‘रंगपंचमी’वर मनसे डागणार तोफ !
संदीप आचार्य
मुंबई, ११ मार्च

लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांची धुळवड सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पत्ते अद्यापि उघड केलेले नाहीत. एकीकडे शिवसेना-भाजप तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षात जागावाटपाचा शिमगा सुरू असताना सपा-बसपाने आपले उमेदवार जाहीर करून राजकीय धुळवडीतील पहिला रंग उधळला आहे. रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा खासदार रामदास आठवले शिर्डी मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या घरी पिंगा घालत आहेत. या पाश्र्वभूमीवर गेले वर्षभर मराठी आणि परप्रांतीयांच्या प्रश्नांवरून राज्यभरात होळी पेटविणारी मनसे आपल्या प्रचारात कोणते ‘राज रंग’ दाखवणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

शांतता, शिवसेनेच्या उमेदवाराचा शोध चालू आहे!
आसाराम लोमटे
परभणी, ११ मार्च

लोकसभेच्या निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघातील उमेदवार अजून निश्चित व्हायचे असले तरीही जो पक्ष सध्या लोकसभेत जिल्ह्य़ाचे प्रतिनिधित्व करतो, त्या शिवसेनेला अद्यापि लोकसभेसाठी प्रबळ उमेदवार म्हणून कोणी निश्चित करता येईना. काँग्रेस आघाडीत परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला येणार हे स्पष्ट आहे. शिवसेनेला आपला हा बालेकिल्ला राखायचा असेल तर प्रभावी उमेदवाराची आवश्यकता आहे.

प्रत्यंचेचा चहा पोहे कार्यक्रम
प्रत्यंचा आज सकाळपासूनच नटूनथटून बसली होती. संजयकाकांच्या सांगण्याप्रमाणे तिने मेक-अप केला होता. कालच ती फेशिअलही करून आली होती. आज तिला बारामतीचं स्थळ पहायला येणार होतं. संजयकाकांनीच हे स्थळ आणलं होतं. अलीकडे संजयकाका दिल्लीला गेल्यापासून त्याची मोठ्ठय़ा लोकांत उठबस चालू झाली होती. त्याच्या ओळखीतून हे स्थळ आलं होतं. स्थळं मोठं तालेवार होतं. बागायती जमीन, द्राक्षं, ऊस, ग्रीन हाऊस असल्यामुळं घराणं पहिल्यपासूनच गब्बरगंड होतं.

एसके विरुद्ध डीएसके..
लोकसभेच्या निवडणुकीतील पुण्याची लढत कोणाकोणात आहे? एक आहे तो भारतीय जनता पक्षाचा संभाव्य उमेदवार (तो कोण असेल याची भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच अधिक आतुरतेने वाट पाहतो आहे), दुसरे आहेत काँग्रेसचे सुरेश कलमाडी (अर्थात काँग्रेसमधील काही जणांचा अजूनही कलमाडी या नावाला आक्षेप आहे, तो भाग वेगळा) आणि तिसरे आहेत बहुजन समाज पक्षाने नुकतीच उमेदवारी देऊ केलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी. पैगंबर जयंतीच्या नुकत्याच झालेल्या मिरवणुकीत यापैकी कुलकर्णी प्रथमपासूनच उपस्थित होते (आपण प्रथमच मिरवणुकीत सहभागी झाल्याची मनमोकळी कबुलीही त्यांनी दिली). त्यानंतर थेट दिल्लीहून कलमाडी आले आणि तेही मिरवणुकीत सहभागी झाले. या दोघांची उपस्थिती हा मिरवणुकीत सहभागी झालेल्या राजकीय कार्यकर्त्यांचा चर्चेचा विषय होता. एका नगरसेवकाने टिपणी केली, ‘‘या निवडणुकीत एसके (कलमाडी) विरुद्ध डीएसके (कुलकर्णी) अशीच लढत आतापर्यंत होताना दिसते आहे.’’ त्याच्या या टिपणीला चांगलीच दाद मिळाली.

नॉट रिचेबल..
निवडणुकीच्या रणधुमाळीनेही सायबर महामार्गावर बिगुल वाजविण्यास प्रारंभ केला आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून पहिल्यांदाच उमेदवारी मागणाऱ्या भावी खासदारांची संकेतस्थळे सायबरविश्वामध्ये चर्चेचा विषय ठरली आहेत. पुण्याचं विकासाचं ध्यास घेतलेले एक बहुचर्चित खासदारही मागे नाहीत. ‘पुण्यासाठी आयुष्य वेचणारे’.. अशा वर्णनामध्ये त्यांचे व्यक्तिगत संकेतस्थळ झळकते आहे. त्यांच्या ‘फ्रेण्ड्स सर्कल’नेही कंबर कसली आहे. परंतु दिल्लीत हायकमांडपासून मुंबईतील स्क्रीनिंग कमिटीपुढे झालेल्या शक्तिप्रदर्शनामध्ये त्यांच्याबाबतच्या मित्रत्वाची नव्हे, तर पक्षांतर्गत शत्रुत्वाचीच प्रचीती आली. त्यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावालाच समूळ उखडून टाकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांचे ‘फ्रेण्ड्स’ही रुसलेले दिसतात. कारण त्यांच्या मित्रपरिवाराने जाहीर केलेले संकेतस्थळ ओपन करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरतो आहे. ‘धिस पेज कॅनॉट बी फाऊंड’ असा संदेश इंटरनेटवर दिला जात आहे. ही निवडणूक आहे महाराजा! त्यामध्ये कुणी कायमचा शत्रू नसतो नि मित्रही! परंतु सध्या तरी पुण्याचं विकासं करणाऱ्यांना कुणी मित्र सापडेना, अगदी संकेतस्थळावरूनही!!

मी नाही तर ताई आहेतच..
साहेब, कोणालाही उमेदवारी द्या. पक्षाचे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पण करून आपल्या उमेदवाराला विजयी करतील! मराठी बाण्याचा उद्घोष करीत परप्रांतीयांच्या विरोधात रान पेटविणाऱ्या राजकीय पक्षाचा हा पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ता पोटतिडकीने बोलत होता. पक्षाने अजून कोणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप ठरलेले नाही. किती जागा लढवायच्या, कोणत्या जागा लढवायच्या, कोणाला उमेदवारी द्यायची हे या पक्षाने अजून गुलदस्त्यात ठेवले आहे. साहेब, आज पुण्यातील त्यांच्या उच्चभ्रु वस्तीतील निवासस्थानी आले होते. ही संधी साधून हा कार्यकर्ता लवाजम्यासह भेटण्यास आला होता. त्या वेळी काही चॅनेलने या कार्यकर्त्यांला गराडा घातला. मुलाखत सुरू झाली. हा कार्यकर्ता म्हणाला, कोणालाही उमेदवारी द्यावी. पक्ष कार्यकर्ते अगदी मनसे काम करतील आणि विजय खेचून आणतील. मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि मला उमेदवारी नाही दिली तर माझी पत्नी आहेच.. आता बोला!