Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

काँग्रेस उमेदवार ठरेपर्यंत अन्य पक्षांचे उमेदवारही अनिश्चित
सांगली, ११ मार्च / गणेश जोशी

सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार जोपर्यंत निश्चित होत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचाच नव्हे, तर बंडखोर उमेदवारही निश्चित होणे कठीण आहे. उमेदवाराबाबत एकच संशयकल्लोळ निर्माण झाला असताना भाजपचे ‘पैलवान’ तळ्यात- मळ्यात भूमिका घेत आहेत. सांगली महापालिका निवडणुकीप्रमाणेच विकास महाआघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे मनसुबे रचले जात आहेत, याचेच वैषम्य भाजप निष्ठावंतांना लागून राहिले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसची उमेदवारी विद्यमान खासदार प्रतीक पाटील यांना निश्चितपणे मिळणार असे बोलले जात असतानाच विश्वजित कदम यांच्या उमेदवारीसाठी महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मुंबई- दिल्लीत मोर्चेबांधणी केल्याने काँग्रेसमध्येही दोलायमान स्थिती निर्माण झाली आहे.

‘तगडय़ा’ सुशीलकुमारांसमोर भाजपतर्फे ‘वजनदार’ बनसोडे ?
जयप्रकाश अभंगे, सोलापूर, ११ मार्च

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित समजली जात असतानाच भाजपतर्फे चित्रपट अभिनेते अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या नावावर प्रदेशश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात श्री. शिंदे किंवा त्यांच्या कन्या कु. प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. परंतु भाजपकडे ‘अर्थ’ पूर्ण तगडा उमेदवार म्हणून अ‍ॅड. बनसोडे यांचे नाव पुढे आले आहे. गेल्या निवडणुकीत दगाफटका झाल्यामुळे आता कोणताही धोका होऊ नये म्हणून काँग्रेसने श्री. शिंदे यांची उमेदवारी जवळ जवळ निश्चित केली आहे.

भूषण स्वामींना दासबोध पुरस्कार
सातारा, ११ मार्च/प्रतिनिधी

समर्थ रामदास स्वामींचे ११ वे वंशाधिकारी व सज्जनगड येथील श्रीसमर्थ रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त भूषण स्वामी यांना पुणे येथील ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने काशीकेशव दासबोध पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थानचे समर्थ भक्त नरेंद्र बोकील यांनी दिली. काशीकेशव दासबोध हा पुरस्कार गेल्या पंधरा वर्षांपासून समर्थाचे कार्य व अभ्यास, लेखन, प्रवचनाद्वारे दासबोधाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

कोल्हापूर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जोडले देशातील सर्व जिल्ह्य़ांशी
कोल्हापूर, ११ मार्च / विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा आता पॉलिकॉम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील सर्व जिल्ह्य़ांशी जोडले गेले आहे, तसेच सीपा (कॉमन इंटिग्रेड अप्लीकेशन फॉर पोलीस) या प्रकल्पांतर्गत जिल्ह्य़ातील २७ पोलीस ठाणे लिनॅक्स या सव्‍‌र्हरव्दारे जोडली गेली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात प्रशासकीय कामात गतिमानता यावी यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी ई-गव्हर्नस कामकाजावर भर देण्याासाठी पुढाकार घेतला आहे.

सांगली, हातकणंगलेमध्ये शेतकरी संघटना लढणार
सांगली, ११ मार्च / प्रतिनिधी

सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय खासदार शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. सांगली मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे पश्चिम विभागीय अध्यक्ष संजय कोले, तर हातकणंगले मतदारसंघातून विलास कदम अथवा अशोक माने हे उमेदवार असतील. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एम. के. माळी होते.

शरद पवार यांच्या प्रचाराचा आज नांदवळमध्ये शुभारंभ
सातारा, ११ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात गुरुवारी १२ मार्च पासून आपल्या झंझावती प्रचार दौऱ्यास सातारा जिल्ह्य़ातील मूळ गाव नांदवळ (ता. कोरेगाव) पासून प्रारंभ करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुमाळ यांनी दिली.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस सकाळी ८ वाजता शरद पवार प्रारंभी अभिवादन करणार आहेत.

माढय़ातून पवारांच्या विरोधात रासपतर्फे महादेव जानकर
सोलापूर, ११ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्ष राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढविणार असून माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विरोधात रासपचे संस्थापक-अध्यक्ष महादेव जानकर हे उभे राहणार आहेत. तर सोलापूर राखीव मतदारसंघात श्रीधर कसबेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून विक्रमादित्य भूषण यांना उमेदवारी देण्यात आली असून शिरुरमध्ये विजय थिटे यांना तर मावळमधून प्रदीप कोचरेकर यांना उभे करण्यात येणार आहे. सातारा मतदारसंघात भाऊसाहेब वाघ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
मिरज, ११ मार्च/वार्ताहर

अभ्यासाचा ताण असह्य़ होऊन आलेल्या नैराश्यातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने मंगळवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. अमित यशवंत कांबळे (वय १९, रा. सुभाषनगर) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून, त्याला नैराश्यातून वाचविण्याचे प्रयत्न पालकांनी केले होते. एका खासगी रुग्णालयातही त्याच्यावर उपचार सुरू होते; परंतु आज सकाळी राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

माहेरच्या पैशासाठी विवाहितेचा छळ
आटपाडी, ११ मार्च / वार्ताहर

बंगला बांधण्यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम माहेरहून आणावी म्हणून सासरच्या लोकांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद दिघंची येथील खुशबू परवेझ कलाल (वय २२) या विवाहितेने दिली आहे. पुणे येथील खुशबू हिचे दिघंची येथील प्रा. परवेझ कलाल याच्याशी दि. ७ मे २००६ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर लग्नात मान्य केलेली हुंडय़ाची एक लाख रुपयांची रक्कम व पतीने दिघंची येथे बांधलेल्या बंगल्यासाठी झालेला अडीच लाख रुपयांचा खर्च असे साडेतीन लाख रुपये माहेरहून आणावेत म्हणून सासरच्या लोकांनी लकडा लावला होता. ही मागणी पूर्ण न झाल्याने पती परवेझ, सासरे खाजुद्दीन बाबू कलाल, सासू शहनाज व नणंद जस्मीन कलाल यांनी तिला दि. ७ मे २००६ ते दि. २४ मे २००८ या कालावधीत वरचेवर मारहाण करून शिवीगाळ केली.

तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक
गडहिंग्लज, ११ मार्च/वार्ताहर
कौलगे ता. गडहिंग्लज येथे एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विजय आनंदा पोवार या तरुणाला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. मजुरी करणाऱ्या आरोपी विजयचे वडील आनंदा व तरुणीचा परिचय आहे. याचा फायदा घेत विजयने आपल्याच दारात बसलेल्या तरुणीला घरी चल काम आहे, असे सांगून तिला घरात नेण्यासाठी प्रयत्न करू लागला. आरडाओरडा करून तिने यायला नकार देताच तिच्याशी झटापट करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीवेळी हुल्लडबाजी केली नसल्याचा खुलासा
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्य़ातील काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखतींच्या वेळी मुंबईतील टिळक भवनमध्ये आपल्या समर्थक कार्यकर्त्यांंकडून कोणताही गोंधळ किंवा हुल्लडबाजी करण्यात आली नसल्याने सांगलीची प्रतिमा डागाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा सांगली मतदारसंघातील इच्छुक उमेदवार विश्वजित कदम यांनी केला आहे. त्या दिवशी तेथे झालेली हुल्लडबाजी इतर ठिकाणच्या कार्यकत्यार्ंकडून झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. कदम यांनी म्हणाले, प्रतीक पाटील व आपले समर्थक मुलाखतीच्या वेळी एकत्रपणे सामोरे गेले असाही दावा श्री. कदम यांनी केला.

वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा
कराड, ११ मार्च / वार्ताहर

वीरशैव लिंगायत समाजाची गरज ओळखून कराड तालुका वीरशैव समाजाच्या वतीने समाजातील सर्व जाती-पोटजातींसाठी येत्या २९ मार्च रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर विभुते व उपाध्यक्ष प्रा. प्रमोद सुकरे यांनी पत्रकाद्वारे दिली. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये रविवारी २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सदर मेळाव्याचे उद्घाटन काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते समारंभपूर्वक होणार आहे. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.