Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

पाकिस्तानमध्ये कमालीची अस्थिरता
इस्लामाबाद, ११ मार्च/पी.टी.आय.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पोलिस आणि लष्कराला सरकारी आदेश न पाळण्याचे आवाहन केल्याने देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सरकारने विरोधकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून माजी क्रिकेटपटू इम्रान खानसह अनेक नेते भूमिगत झाले आहेत. अध्यक्ष असिफ अली झरदारी हे देशाबाहेर असताना त्यांना ‘देशात परतू नका’ असा सल्ला लष्करप्रमुख जनरल अश्पाक परवेझ कयानी यांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांद्वारे पसरताच देशात आणखी गरमागरमीचे वातावरण पसरले आहे. नवाज शरिफ आणि त्यांचे बंधू शाहबाज आणि तेहरिक- ए- इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना १६ मार्चचा ‘लाँग मार्च’ होऊ नये यासाठी नजरकैदेत ठेवण्याचे गिलानी सरकारने ठरविले आहे.

अशी ही पळवापळवी..
गडाख, उदयनराजे, रेंगे-पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई, ११ मार्च / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. गोविंदराव आदिक यांच्यापाठोपाठ नगर जिल्ह्य़ातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, परभणीचे शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेले खासदार तुकाराम रेंगे-पाटील आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे आता राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादीच्या मार्गावर असलेल्या काँग्रेस नेत्यांना रोखण्याकरिता काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांना पत्त्याच न्हाई
राष्ट्रवादीचा आयपीएल सामन्यांना परस्पर फैसला

नवी दिल्ली, मुंबई, ११ मार्च / खास प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आय.पी.एल. सामन्यांना मुंबई व नवी मुंबईत परवानगी द्यायची की नाही यावरून दोन मतप्रवाह असताना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अंधारात ठेवून या दोन ठिकाणी सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना आता आय.पी.एल. सामन्यांवरून राष्ट्रवादीने परस्पर निर्णय घेऊन टाकला आहे.

ओरिसातील नवीन पटनायक सरकार विश्वासदर्शक ठरावात तरले
भुवनेश्वर, ११ मार्च/पीटीआय

ओरिसा विधानसभेत आज विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदानाने शिक्कामोर्तब झाल्याने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सरकार तरले आहे. मुख्यमंत्री पटनायक यांच्या या विजयामुळे बिजू जनता दलात आनंदाचे वातावरण असले तरी विरोधी पक्षांनी मात्र प्रचंड गदारोळ करीत हा लोकशाहीचा खून असल्याची टीका केली आहे. विधानसभेतील मतदानानंतर विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला आणि या मतदानाच्या प्रक्रियेविषयी आक्षेप घेतला.

मेघालय सरकार अल्पमतात
शिलॉँग, ११ मार्च/पी.टी.आय.

एका ज्येष्ठ मंत्र्यानेच सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने मेघालयात राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत मेघालय पुरोगामी आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्तास्थापनेसाठी आम्हाला सर्वबाजूंनी विचारणा होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. नागरी विकासमंत्री व ‘केएचएनएएम’चे एकमेव आमदार पॉल लिंगडोह व लिमिसन संगमा तसेच इस्माईल आर. मरक या दोन अपक्ष आमदारांनी गेल्या तीन दिवसांत सत्ताधारी एमपीए आघाडीतून माघार घेतली आहे.

रासायनिक रंगामुळे ४५ मुलांना विषबाधा
अंबरनाथ, ११ मार्च/ प्रतिनिधी

अंबरनाथ येथील नवीन भेंडीपाडा, बालाजी नगर व भास्कर नगर या परिसरातील ४५ मुलांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. रासायनिक रंगांमुळे ही विषबाधा झाली असल्याचा अंदाज इस्पितळाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. नवीन भेंडीपाडा, बालाजी नगर व भास्कर नगर या परिसरातील साधारण ६ ते १२ या वयोगटातील ही मुले असून होळी खेळल्यानंतर ते आपापल्या घरी गेले, घरी जेवल्यानंतर त्यांना उलटय़ा, जुलाब व छातीत मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यांच्या पालकांनी त्यांना उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती इस्पितळात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी या घटनेनंतर इस्पितळात जाऊन मुलांची विचारपूस केली.

कर्नाटकात लोकसभेच्या २२ हून अधिक जागाजिंकू;भाजपचा दावा
बंगळुरू, ११ मार्च/पीटीआय

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येदीयुरप्पांच्या लोकप्रियतेच्या लाटेचा फायदा मिळून आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यात भाजप २२ पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे असा दावा कर्नाटकच्या पंचायत राज व ग्रामीण विकासमंत्री शोभा खरंदलजे यांनी आज येथे केला. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा आहेत. रिपोर्टर्स गिल्ड व बंगळुरू प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना खरंदलजे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, दहशतवादाचा बीमोड करणे, महागाई कमी करणे अशा मुद्दय़ांबाबत आलेले केंद्रातील यूपीए सरकारला आलेल्या अपयशाचा पाढा जनतेसमोर मांडला जाईल. कर्नाटकमध्ये भाजप सरकारने केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर राज्यात लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचार केला जाईल असेही त्या पुढे म्हणाल्या. कर्नाटक भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्यांचा ठाम शब्दांत इन्कार करून शोभा खरंदलजे पुढे म्हणाल्या की, ज्यांच्याकडे ठोस मुद्दे नाहीत असे पक्ष असंबद्ध मुद्दे उपस्थित करून भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात.

मद्यपान करून गाडी चालविणाऱ्या ३१६ जणांवर कारवाई
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी

रंगपंचमीनिमित्त मद्यपान करून गाडी चालविणाऱ्या सुमारे ३१६ जणांवर आज वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, रंग लावण्यावरून विविध ठिकाणी बाचाबाची आणि हाणामारीच्या तुरळक घटनाही घडल्या. गोरेगाव येथून याप्रकरणी १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रंगपंचमीनिमित्त मद्यपान करून गाडय़ा चालविणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होणार हे लक्षात घेऊन अशा मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याकरिता मंगळवारी रात्रीपासून वाहतूक पोलिसांनी जागोजागी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सुमारे ३१६ मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली. वाकोला, मालाड, बोरिवली आणि ट्रॉम्बे या चा ठिकाणी सर्वाधिक कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर नियोजित अनामत रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. वाहतूक पोलिसांप्रमाणेच रंग लावण्यावरून बाचाबाची आणि हाणामारी करणाऱ्यांवर विविध पोलीस ठाण्यांनी कारवाईचा बडगा उगारला. देवनार येथे एकाच इमारतीतील रहिवाशांमध्ये रंग लावण्यावरून हाणामारी होऊन त्यात एक जण जखमी झाला.

आपटी नदीत तीन युवकांचा बुडून मृत्यू
अंबरनाथ, ११ मार्च/ प्रतिनिधी

उल्हासनगरनजीकच्या आपटी नदीमध्ये होळीनिमित्त रंग खेळल्यानंतर आंघोळीला गेलेल्या सुमारे १५ मुलांपैकी आज तीन जण बुडून मरण पावले. अंबरनाथमधील प्रवीण आत्माराम पाटील (२५), उल्हासनगरमधील सौरभ शेख व विठ्ठलवाडी येथील दीपक जगताप अशी या तिघा मृत तरुणांची नावे आहेत.

 


प्रत्येक शुक्रवारी