Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

उस्मानाबादेत आता चर्चा चाकूरकरांच्या नावाची!
उस्मानाबाद, ११ मार्च/वार्ताहर

कधी विलासराव देशमुख, तर कधी डॉ. पद्मसिंह पाटील अशी उमेदवारीची चर्चा आता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या नावावर आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने आकडेमोड सुरू झाली आहे.उस्मानाबादची जागा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसची मानली जाते. त्यामुळे डॉ. पद्मसिंह पाटीलच उमेदवार असतील, असे गृहीत धरले जात होते. तथापि काल रात्रीपासून शिवराज पाटील यांचे नाव चर्चेत आले.

तुका आकाशाएवढा!
संतवचनाला सुभाषिताचे रूप येते. संत तुकारामांच्या वचनाला उद्देशूनच वरील विधान निश्चित-पणाने मान्य करावे लागते. गुरूवर्य वा. ल. कुलकर्णी आम्हाला तुकाराम शिकवीत असत. ते उभे राहून शिकवित नसत, तर डायसवर फिरत फिरत बोलत असत. बोलता बोलता वर्गाच्या खिडकीजवळ किंचित थांबत. अशा वेळी आम्हाला खिडकीबाहेर तुकाराम उभा असल्याचा आणि सर त्यांच्याशी बोलत असल्याचे भासायचे.

‘कॉपी पॅटर्न’चा कलंक पुसणार?
लातूर, ११ मार्च/वार्ताहर

माध्यमिक शालान्त परीक्षेत गुणवत्तेचा पॅटर्न गाजविणाऱ्या जिल्ह्य़ातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपीचा पॅटर्नही गाजतो. तो कलंक दूर करण्यासाठी प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी समिती सदस्यांची बैठक दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी घेतली होती.

कोण असेल बुवा उमेदवार..
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, ११ मार्च

उमेदवार कोण? सर्वसामान्य माणसे, कार्यकर्ते यांच्यापेक्षा याबाबत अधिक औत्सुक्य आहे, ते डिजिटल फलक बनविणाऱ्यांना. कारण त्यांची दिवाळी निवडणुकीच्या निमित्तानेच साजरी होणार आहे. म्हणूनच ते यादी जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. सुमारे अकरा वर्षांपूर्वी, म्हणजे १९९८च्या निवडणुकीत डिजिटल फलकांचा शिरकाव झाला. तेव्हा डिजिटल फलकासाठी एक चौरस फुटाला २२ रुपये लागत. आता दर निम्मे झाले आहेत. साधारणत: दहा रुपये चौरस फूट दर झाल्याने नेत्यांचे हुबेहूब चित्र मतदारांना दिसू लागले.

दोन अधिकाऱ्यांना २५ हजार रुपयांची ‘कॉस्ट’
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना उच्च न्यायालयाचा दणका
औरंगाबाद, ११ मार्च/खास प्रतिनिधी
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना प्रत्येकी २५ हजार रुपये ‘कॉस्ट’ देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास व न्यायमूर्ती ए. व्ही. पोतदार यांनी दिला आहे. हिंगोलीचे विश्वास प्रल्हाद क्षीरसागर यांनी ही याचिका केली होती. हिंगोली जिल्हा शिक्षणसेवक निवड समितीने जानेवारी २००५मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्जदाराने शिक्षणसेवकपदासाठी एस. टी. प्रवर्गातून हिंदी या विषयासाठी अर्ज सादर केला होता.

एम. फिल.धारक प्राध्यापकांनानेट-सेट पात्रतेपासून सूट देण्याची मागणी
विद्यापीठ अनुदान आयोग, संस्थाचालकांना नोटीस बजावण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

औरंगाबाद, ११ मार्च/खास प्रतिनिधी

एम. फील.धारक प्राध्यापकास नेट-सेट पात्रतेपासून सूट देण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे. या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत न्या. निशिता म्हात्रे व न्या. भूषण गवई यांनी विद्यापीठ अनुदान आयोग व अन्य संस्थाचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

चार वर्षांत ४० लाख रुपयांचा निधी धूळ खात!
आमदार गायकवाड व तहसील प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव
प्रमोद साळवे
गंगाखेड, ११ मार्च

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील २००१ ते आजपर्यंतचा ४० लाख रुपयांचा लाभधारकांसाठीचा निधी समितीचे अध्यक्ष आमदार विठ्ठल गायकवाड व तहसील प्रशासनाच्या केवळ असमन्वयामुळे धूळ खात पडला आहे. हजारो लाभधारकांवर उपासमारीची वेळ आली असताना या विभागासाठी कार्यरत प्रशासनावर नाहक वेतनाचा प्रपंच कशासाठी करायचा असा संतप्त सवाल करीत समितीचे सदस्यही आता राजीनामे देणार असल्याचे समजते.

कॉपीमुक्त गाव योजनेचा विचार हवा
*अथक प्रयत्न करूनही परीक्षेतील उपद्रव कायमच
*महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेशी सांगड घालणे शक्य
अज़ीज़ मोमीन
जळकोट, ११ मार्च

राज्यामध्ये १९ हजार २८७ माध्यमिक शाळा व ५ हजार ३०१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या वर्षी राज्यभरातून या शाळांतील दहावीचे १६ लाख ३ हजार १४४ विद्यार्थी व बारावीचे सर्व शाखांचे ११ लाख ८४ हजार २२६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळासह शिक्षण खाते, महसूल विभाग व पोलीस दल अशा विविध विभागांना मोठी कसरत करावी लागते. तरीही या परीक्षेतून उपद्रव व कॉपीमुक्ती म्हणावी तशी होत नाही, असा अनुभव आहे.

औरंगाबादमध्ये रंगोत्सव!
औरंगाबाद, ११ मार्च/प्रतिनिधी

लाल, निळा, काळा, पिवळा, गुलाबी, हिरवा, जांभळा अशा कितीतरी रंगात औरंगाबादकर रंगले. रंगपंचमीचा उत्साह आज सकाळपासून शहरभरातील गल्लीबोळासह शहरातील विविध भागात दिसून आला. चौकाचौकात पोलीस बंदोबस्तामुळे कुठेही रंगाचा भंग झाला नाही. शहरातील गुलमंडी भागातून नेहमीप्रमाणे रंगोत्सव मोठय़ा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.
‘होली खेले रघुवीरा अवध में’, ‘रंग बरसे’, ‘होली के दिन’ अशा गीतांच्या गजरात रंगोत्सव साजरा करण्यात आला. बच्चे कंपनीच नव्हे तर युवावर्गसुद्धा विविध रंगांची उधळण करीत आपल्या प्रियजनाला या उत्साहवर्धक सणात सामील करून घेत होता. रंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बऱ्याच नागरिकांनी शहराबाहेर म्हैसमाळ, शुलिभंजन अशा ठिकाणी जाणे पसंत केले. बच्चे कंपनीने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांधारकांना आपले लक्ष्य बनविले.

पत्नीचा खून करणाऱ्या शिक्षकास अटक
भोकर, ११ मार्च/वार्ताहर

चारित्र्यावर संशय घेऊन शिक्षकाने पत्नीच्या डोक्यात दगडी खलबत्ता घालून निर्घृण खून केला. शहरातील प्रफुल्लनगर भागात आज पहाटे साडेतीन वाजता हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, लताबाई बालाजी मस्के (वय ३०) व तिचा पती बालाजी शेषराव मस्के (मूळ राहणार माळाकोळी, हल्ली राहणार प्रफुल्लनगर, भोकर) यांच्यात काही महिन्यापासून वाद होऊ लागला. लताबाई व बालाजीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पहाटे साडेतीनच्या दरम्यान भांडणे झाली. बालाजीने लाकडाने व दगडाच्या खलबत्त्याने लताच्या डोक्यावर घाव घातले. नंतर वायरने गळा आवळला. लताबाईची आई सुशीलाबाई भालेराव यांनी फिर्याद दिली.

समाजकंटकांकडून दगडफेक; चार जखमी
जिंतूर, ११ मार्च/वार्ताहर

जालना रस्त्यावर असलेल्या प्रार्थनास्थळावर आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान काही समाजकंटकांनी दगडफेक करून रंग टाकल्याने शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत चार जण जखमी झाले आहेत. एका रिक्षामधून आलेल्या १५ ते २० जणांनी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली व रंगही टाकला. बाजूलाच असलेल्या ‘एम. एफ. इलेक्ट्रिकल्स’ या दुकानावरही दगडफेक करण्यात आली. दुकानातील सामानांची नासधूस केली. दुकानात असलेल्या सय्यद निसार व त्याचा सहकारी मिर्जा या दोघांना मारहाण करून हे समाजकंटक पसार झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर शेकडो तरुण जमा झाले. पोलिसही घटनास्थळी पोहोचले. आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले. वारंवार सांगूनही जमाव पांगविला जात नसल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगविला. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या मागे लागले तेव्हा त्यांनी दगडफेक केली. यामध्ये दोघे जखमी झाले. पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोटरसायकलींच्या धडकेत १ ठार, ३ जखमी
औरंगाबाद, ११ मार्च/प्रतिनिधी

फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन मोटरसायकली आपसात धडकल्या. त्यात एक जण ठार तर तीन जखमी झाले आहेत. फुलंब्रीतील दिलीप पांडुरंग मढीकर (वय २८) हा युवक हिरोहोंडा मोटरसायकलवर वेगाने ग्रामीण रुग्णालयासमोरून जात असताना गणराज ढाब्याजवळ बिल्डाकडे जाणाऱ्या एका बॉक्सर मोटरसायकलीला धडक दिली. या धडकेत दिलीप मढीकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील जखमींना औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाऊसाहेब चव्हाण, अण्णा पवार व आकाश पवार अशी जखमींची नावे आहेत. दिलीप हा जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या कार्यालयात कामावर होता.

दोन गटांतील मारामारीत १० जखमी
जिंतूर, ११ मार्च/वार्ताहर

घरासमोर होळी खेळण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीत दहा जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील जांबतांडा येथील श्रीरंग गणपत जाधव याच्या घरासमोर त्याचे मित्रमंडळी काल रात्री होळी खेळत होते. ‘आरडाओरड करून होळी का खेळता,’ असे विचारत मोहन आढे व त्याच्या सहकाऱ्यांनी होळी खेळणाऱ्यांना मारहाण केली. यामध्ये दहा जण जखमी झाले. मणिक राठोड गंभीर जखमी असल्याने त्याला नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लातुरात होळी उत्साहात
लातूर, ११ मार्च/वार्ताहर

शहरात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी सातच्या सुमारास होळी पटवून नैवेद्य दाखविण्यात आला. शारदानगर, श्यामनगर, नंदीस्टॉप आदी भागातील नागरिकांनी आपल्या घरासमोर छोटय़ा छोटय़ा होळ्या पेटविल्या व त्याचे विधिवत पूजन केले. शारदानगर येथे पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला. होळीची पूजा प्रा. ओमप्रकाश साकोळकर, उमेश तावशीकर यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी नंदकुमार काजापुरे, दगडू शिंदे, सदानंद स्वामी, मुन्ना पवार, देवानंद कांबळे, तोंडारे, कळबांड, करपे, जोशी, स्वामी, देशपांडे आदी उपस्थित होते.आर्यसमाजच्या वतीने येथे होळीनिमित्त महायज्ञ झाला. या वेळी बांधकाम सभापती सुरेश पवार, प्राचार्य भीमराव शिंदे, प्रा. गिरीधर तेलंगे, वीरेंद्र मिश्र आदी उपस्थित होते. होळी व पोळी यांचे अतुट असे नाते असल्याने या सणानिमित्त घरोघरी पुरणाच्या पोळ्या करण्यात आल्या होत्या.

कळंबमध्ये अनोखी होळी
कळंब, ११ मार्च/वार्ताहर

शिवीगाळ, बोंबा मारणे, गोवऱ्या, लाकडे चोरणे आदी अपप्रवृत्तीला फाटा देऊन कळंब येथील शिवाजी कापसे मित्रमंडळाने अनोखी होळी साजरी केली. मुंबईवर हल्ला करणारा अतिरेकी मोहम्मद कसाब याच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. या वेळी बबनराव जावळे, संजय होळे, सुधीरभाऊ हाजगुडे, नारायणराव गावीत, विजय सुद्रिक, सागर काकडे, दादा नाईकवाडे, बाळू कांबळे, बाळू कोल्हे, राहुल काळे, अमोल जाधव, बाळू तानगे आदी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिवाजी कापसे मित्रमंडळाचे कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या होळीचे आयोजन सुधीर हाजगुडे यांनी केले होते.

देशी पिचकाऱ्यांना मागणी
सोयगाव, ११ मार्च/वार्ताहर

चिनी पिचकाऱ्यांचे आकर्षण कमी झाले असून बाजारात देशी पिचकाऱ्यांना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रंगपंचमीचा आनंद बच्चेकंपनीबरोबर मोठेही उत्साहाने घेतात. मात्र रंग खेळण्यासाठी पिचकारीचे मोठे गिऱ्हाईक बच्चेकंपनीच आहे. यंदा १५ ते २० टक्क्य़ांनी स्वस्त पिचकारी बाजारात आहे. दिल्ली व कलकत्ता येथे विविध आकर्षक आकारांत पिचकाऱ्या पाच रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आहे. उत्तर प्रदेशमधील रंग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दोन रुपयांपासून ते १० रुपयांच्या लहान पाकिटात हा रंग मिळतो.

नांदेडमध्ये घरातून दीड लाखांची चोरी
नांदेड, ११ मार्च/वार्ताहर

शहरातील पाटबंधारेनगर परिसरात राहणाऱ्या मधुकर निवृत्ती सोनसळे यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. मध्यरात्री ही चोरी झाली. पोलिसांनी सांगितले की, सोनसळे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, तसेच मोटरसायकल (क्रमांक एमएच२६-एफ२७९६) असा ऐवज पळविला. सोनसळे आज सकाळी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अण्णासाहेब जावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
भोकर, ११ मार्च/वार्ताहर

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एस. टी.च्या भोकर आगाराची बस जाळली. यामुळे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बसचालक अशोक ढवळे याच्या तक्रारीवरून राजू कदम, बंडू कदम, पांडुरंग कदम आणि हणुमंत कदम व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे सचिव उत्तम बाबळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भोकर येथे गेल्या गुरुवारी (दि. ५) झालेल्या सभेत अण्णासाहेब जावळे यांनी अपशब्द काढून वक्तव्य केले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवन मिरकले करीत आहेत.

प्राचार्य डॉ. दुबे यांचा सत्कार
औरंगाबाद, ११ मार्च/खास प्रतिनिधी

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुधीर जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राम पातूरकर आणि क्रीडा उपसंचालक जे. पी. अधाने हे उपस्थित होते. या वेळी ज्ञानोबा मुंडे, माजी प्राचार्य श्री. कोल्हटकर, नारायण शिरसाठ, प्रा. तादलापूरकर, हंसराज डोंगरे, रंजन वडवणे, डॉ. मकरंद जोशी व प्रा. मीनाक्षी मुलियार आदी उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शब्बीर अहमद, सागर पाटील, प्रमोद राठोड, मंगेश डोंगरे, सतीश कमलाकर, सचिन शिरसाठ या खेळाडूंना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीमती शेख यांना मिसेस बीपीएड तर हेमकृष्ण बाहेगावकर यांना मिस्टर बीपीएडचा पुरस्कार मिळाला.

संकल्प सोडल्यास भारत महाशक्ती - प्रसाद चिक्षे
औरंगाबाद, ११ मार्च/खास प्रतिनिधी

संकल्प केला आणि त्यात यश मिळाले नाही असे भारतात कधी घडले नाही. मात्र आम्ही संकल्प करण्यातच कमी पडतो. संकल्प केल्यास भारत महाशक्ती होईल, असे प्रतिपादन पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे सहसचिव प्रसाद चिक्षे यांनी केले. स्वविकास केंद्र संचलित स्वविकास व्याख्यानमालेच्या दुसऱ्या वर्षांतील नववे पुष्प श्री. चिक्षे यांनी गुंफले. ‘भारत २०२०’ असा त्यांचा विषय होता. या वेळी हेडगेवार रुग्णालयाचे अध्यक्ष अनिल भालेराव उपस्थित होते. भारताला मिळालेला नैसर्गिक संपत्तीचा ठेवा स्वातंत्र्योत्तर काळात भारताने केलेल्या शेती, उद्योग, खाणकाम, संशोधन अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेत श्री. चिक्षे यांनी भारताची बलस्थाने स्पष्ट केली. आपल्याकडे सर्व आहे फक्त संकल्प शक्तीचा अभाव आहे, असे त्यांनी सांगितले. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबरोबर त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी आपला विषय अत्यंत अभ्यासपूर्णरितीने आकडेवारी, आलेखासह दृकश्राव्य पद्धतीने मांडला.

मालमोटारीची बैलगाडीला धडक; सहा जण जखमी
सिल्लोड, ११ मार्च/वार्ताहर

भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीची बैलगाडीस जोरात धडक बसली. यात बैलगाडी चालकासह सहाजण जखमी झाले आहेत. एका बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. कैलास पांडुरंग गवळे (राहणार तोडापूर, जिल्हा जळगाव) कुटुंबासह गावाकडे जात असताना अजिंठा-सिल्लोड रस्त्यावर पालोदवाडी नजीक मालमोटारीची बैलगाडीस धडक बसली. यात बैलगाडी चालक कैलास गवळे, कांताबाई गवळे, विशाल गवळे, मनीष गवळे, शिवाजी गवळे, आशाबाई गवळे हे गंभीर जखमी झाले. एका बैलाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. दुसऱ्या बैलाचे शिंग तुटले आहे.

धर्मरक्षा मंचाची स्थापना
औरंगाबाद, ११ मार्च/खास प्रतिनिधी

हिंदूविरोधी शक्तींना निष्प्रभ करण्यासाठी सर्व संतशक्तीने एकजुटीने संघर्ष करण्याची वेळ आली आहे. त्या-साठी धर्मरक्षा मंचची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती भगवान महाराज आनंदगढकर यांनी दिली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आयोजित संतांच्या बैठकीमध्ये धर्मसभा घेऊन जागरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत धर्मरक्षा मंचच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नागराज बाबा आणि भगवान महाराज आनंदगढकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५० संतांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

महिला अबला नसून सबला - न्या. खरे
जालना, ११ मार्च/वार्ताहर

आज १०० मुलांच्या मागे ८६ मुली असे प्रमाण दिसून येत आहे. भ्रूणहत्येमुळे सामाजिक संतुलन पार बिघडून गेले आहे. यापुढे भ्रूणहत्या होणार नाही असा संकल्पच महिलांनी करावा व महिला अबला नाहीत, सबला आहेत हे जगाला दाखवून द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश वि. ग. खरे यांनी केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्या-लयात समर्थ महिला बचतगटाच्या कार्यक्रमात खरे बोलत होत्या. न्कल्पना लाहोटी, जीवन विज्ञान मिशनच्या निवेदिता पहाडे, सर्वधर्म समभावच्या आयेशा खान कार्यक्रमास उपस्थित होत्या. ब्रह्मकुमारी सुलभादीदी यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.

‘लोकसभा निवडणूकीत मनसेची ताकद दाखवू’
गंगाखेड, ११ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या परभणी मतदारसंघाच्या गावा-गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना करण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतरच उमेदवारीबाबत ठरवीत आमची ताकद दाखवू, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी सांगितले. पक्षाचा विचार व संदेश गावा-गावात पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहेत. ग्रामीण भागातही राज ठाकरे यांच्याविषयी आशा आहेत. मतदार उमेदवार देण्या-साठी आग्रही मागणी करीत आहेत. वेळप्रसंगी पक्षा-देशाप्रमाणे कार्यकर्ते काम करतील, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र युवा अभियानतर्फे आज गुणगौरव सोहळा
बीड, ११ मार्च/वार्ताहर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व महाराष्ट्र युवा अभियान यांच्यातर्फे पत्रकार संतोष मानूरकर व जगदीश पिंगळे, प्रसिद्ध पखवाजवादक उद्धव बापू आपेगावकर, नाटय़कलावंत डॉ. सतीश साळुंके व अमृता साळुंके यांचा उद्या (गुरुवारी) गुणगौरव करण्यात येणार आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी विद्यालयात उद्या ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या वेळी जिल्ह्य़ात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरवही केला जाणार आहे. पत्रकार वैभव स्वामी, संजय शिंदे, अमृता साळुंके, दत्ता नलावडे, संध्या कुलकर्णी, रामकृष्ण मिसाळ, महेंद्र गर्जे यांचाही गौरव करण्यात येणारआहे. ‘महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी युवकांची’ या विषयावर प्राचार्य पी. बी. पाटील यांचे व्याख्यान होईल.

डॉ. लहाने यांचे आज व्याख्यान
लातूर, ११ मार्च/वार्ताहर

दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उद्या (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता नगरपालिकेच्या शिवछत्रपती ग्रंथालय सभागृहात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘अंधत्व, समस्या आणि उपाय’ या विषयावर ते बोलतील. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या लातूर विभागीय केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
याच कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे ‘यशवंतराव चव्हाण यांचे शैक्षणिक विचार’ या विषयावर बोलतील. अध्यक्षस्थानी विभागीय केंद्राचे अध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे असतील.