Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानमध्ये कमालीची अस्थिरता
इस्लामाबाद, ११ मार्च/पी.टी.आय.

 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पोलिस आणि लष्कराला सरकारी आदेश न पाळण्याचे आवाहन केल्याने देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सरकारने विरोधकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून माजी क्रिकेटपटू इम्रान खानसह अनेक नेते भूमिगत झाले आहेत. अध्यक्ष असिफ अली झरदारी हे देशाबाहेर असताना त्यांना ‘देशात परतू नका’ असा सल्ला लष्करप्रमुख जनरल अश्पाक परवेझ कयानी यांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांद्वारे पसरताच देशात आणखी गरमागरमीचे वातावरण पसरले आहे. नवाज शरिफ आणि त्यांचे बंधू शाहबाज आणि तेहरिक- ए- इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना १६ मार्चचा ‘लाँग मार्च’ होऊ नये यासाठी नजरकैदेत ठेवण्याचे गिलानी सरकारने ठरविले आहे.
दरम्यान, देशातील राजकीय आणि सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख कयानी यांनी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांची भेट घेतली. मात्र या दोघांच्या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. अध्यक्ष झरदारी हे तेहरान येथे आर्थिक सहकार्यविषयक परिषदेला गेले असताना आणि झरदारी यांनी देशात परतू नये, असा त्यांना सल्ला दिल्याचे वृत्त पसरल्याने आणखीनच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या दमन काळात निलंबित करण्यात आलेल्या न्यायाधीशांना पुन्हा रुजू करावे या मागणीसाठी सरकारी आदेश धुडकावून नवाज शरीफ यांनी अबोताबाद येथे प्रचंड जाहीर सभेत केलेल्या भाषणामुळे तणाव वाढला असून अनेक नेत्यांची धरपकड केली असून अनेकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ‘पाकिस्तानात सत्तापालट करून पाकिस्तानला वाचविण्याचे कर्तव्य अल्लाने तुमच्यावर सोपविले आहे. सात दिवसांत हे शक्य होईल’, असे शरीफ यांनी भाषणात सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. जुनी न्यायपद्धती आम्हाला परत आणायची आहे, असे ते म्हणाले. आजच्या शरीफ यांच्या जाहीर सभेमुळे झरदारी आणि शरीफ यांच्यातील शक्तिपरीक्षणाला उधाण आले आहे. झरदारी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने वकील आणि विरोधी पक्षनेत्यांविरोधात मोहीम उघडली असून, पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार इम्रान खान यांच्याही अटकेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पंजाब आणि लाहोर या दोन जिल्ह्यांमधील ३५ विरोधी पक्ष नेते आणि वकीलांची धरपकड करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे बडतर्फ करण्यात आलेले मुख्य न्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांच्या पुनर्नियुक्तीवरून वकीलांचे आंदोलन जोर धरीत असताना, ही कारवाई करण्यात आली. मुशर्रफ सरकारकडून बडतर्फ करण्यात आलेल्या वकिलांच्या पुर्ननियुक्तीसाठी केला जाणारा ‘१६ मार्च रोजी होणारा लाँग मार्च’ कितीही प्रयत्न केले तरी सरकारला थोपवता येणार नाही, असे नवाज शरिफ यांनी स्पष्ट केले.