Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अशी ही पळवापळवी..
गडाख, उदयनराजे, रेंगे-पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई, ११ मार्च / खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. गोविंदराव आदिक यांच्यापाठोपाठ नगर जिल्ह्य़ातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, परभणीचे शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेले खासदार तुकाराम रेंगे-पाटील आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे आता राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत.
राष्ट्रवादीच्या मार्गावर असलेल्या काँग्रेस नेत्यांना रोखण्याकरिता काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्ष सोडण्याची घाई करू नये, असे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गडाख यांना सुचविले आहे. उदयनराजे भोसले यांच्याबरोबर मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संपर्क साधला आहे. काँग्रेसचे आणखी काही नेते संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येत आहे.
मंत्रिपद नाकारल्याने गोविंदराव आदिक यांनी राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला. नगर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे संघटन काँग्रेसच्या तुलनेत कमी आहे. लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडे प्रबळ उमेदवार नाही. काँग्रेसचे आमदार यशवंतराव गडाख यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी, असा प्रस्ताव मांडल्याचे समजते. गडाख हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. गडाख यांनी येत्या दोन दिवसांत आपल्या समर्थकांची बैठक बोलाविली आहे. त्यात ते निर्णय घेतील. येत्या रविवारी आदिक यांनी नगरमध्ये पवारांचा मेळावा आयोजित केला आहे. तत्पूर्वी गडाख हे निर्णय घेतील, असे समजते. नगर लोकसभेसाठी गडाख यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. गडाख हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आमदारकीसाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत जात असले तर काँग्रेसचे काहीही नुकसान होणार नाही, असे मत शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
परभणीचे शिवसेनेचे खासदार तुकाराम रेंगे-पाटील यांनी लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून काँग्रेसला मदत केली होती. उद्योगमंत्री नारायण राणे यांचे रेंगे-पाटील हे समर्थक मानले जातात. जागावाटपात परभणी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेल्याने रेंगे-पाटील यांना राष्ट्रवादीत जाण्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीने सुरेश वरपूडकर यांना राज्यमंत्रीपद देऊन त्यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. त्यामुळे रेंगे-पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, याबाबत साशंकता आहे. रेंगे-पाटील यांनी मुंबईत पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नसल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे सुद्धा राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. भोसले निश्चितच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र अजितदादा पवार यांच्याशी उभा वाद असलेले उदयनराजे यांचे अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरू आहे.