Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुख्यमंत्र्यांना पत्त्याच न्हाई
राष्ट्रवादीचा आयपीएल सामन्यांना परस्पर फैसला
नवी दिल्ली, मुंबई, ११ मार्च / खास प्रतिनिधी

 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर आय.पी.एल. सामन्यांना मुंबई व नवी मुंबईत परवानगी द्यायची की नाही यावरून दोन मतप्रवाह असताना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अंधारात ठेवून या दोन ठिकाणी सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना आता आय.पी.एल. सामन्यांवरून राष्ट्रवादीने परस्पर निर्णय घेऊन टाकला आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आय.पी.एल. सामन्यांमध्ये विशेष रस असल्यानेच राज्याच्या गृह खात्याने मुंबई व नवी मुंबईत सामने आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारने मुंबईच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले आहे. लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या हल्ल्यानंतर आय.पी.एल. सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण सुमारे सात हजार कोटींची उलाढाल असलेले सामने नियोजित वेळेत व्हावेत म्हणून वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलली व केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांना घूमजाव करावे लागले.
मुंबईत १० ते २६ एप्रिल तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात सामने आयोजित करण्यात येणार आहेत. आय.पी.एल.चे अध्यक्ष ललित मोदी यांनी मुंबईत सामने भरविण्यासाठी सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याचे विधान केले आहे. १० एप्रिलला उद्घाटनाचा सामना तसेच अंतिम सामना आयोजित केला जाणार आहे. मुंबईबरोबरच शशांक मनोहर यांच्यामुळे नागपूरमध्ये सामना आयोजित करण्याचे घाटत आहे. नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे १६ एप्रिलला तर मुंबईत शेवटच्या टप्प्यात ३० एप्रिपला मतदान होणार आहे. निवडणूक काळात क्रिकेट सामन्यांमुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे.२६/११ च्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत सामने आयोजित करण्यास परवानगी देताना राज्य सरकारने सुरक्षेच्या प्रश्नाचा आढावा घेणे आवश्यक होते. मात्र या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पुर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी नवी दिल्लीत बोलतानाही मुख्यमंत्र्यांनी, आय.पी.एल. सामन्यांसाठी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे विधान केले होते. मुंबईत सामन्यांना परवानगी देण्याबाबत गृहमंत्री जयंत पाटील अथवा गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.