Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

बोगस महाविद्यालयावर कारवाई करण्यात टाळाटाळ!
कला संचालनालयाच्या अधिकाऱ्याची चौकशी होणार
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी

 

डोंबिवली येथील ‘करंदीकर कला अ‍ॅकॅडमी’ या महाविद्यालयात विविध कला अभ्यासक्रम राबविण्यात येतात. १९९९ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेच्या जुन्या व्यवस्थापनाने अनेक गैरप्रकार केलेले असतानाही संस्थेवर कोणतीही कारवाई न करता उलट चुकांवर पांघरून घातल्याच्या तक्रारीवरून कला संचालनालयाचे निरीक्षक दिलीप बोरुले यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.‘करंदीकर कला अ‍ॅकॅडमी’ ही संस्था ‘लीफ कल्चरल आणि चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने सुरू करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात संस्थेकडे कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्या. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना ‘ओमकार शिक्षण मंडळ’ या दुसऱ्याच महाविद्यालयात शिक्षण दिले जात होते. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रातही बऱ्याच ठिकाणी दोन वेगवेगळ्या संस्थांचे उल्लेख करण्यात आले आहेत. महाविद्यालयाचा नमूद केलेला पत्ता चक्क एका निवासस्थानाचा आहे. त्यामुळे संस्थेचे महाविद्यालय प्रत्यक्षात आस्तित्वात नसल्याचे निदर्शनास येत असतानाही या संस्थेला कला संचालनालयाने चक्क अनुदानित दर्जा देऊन टाकला. २००५ मध्ये ही संस्था ‘मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट’ने चालविण्यास घेतली. जुन्या संस्थेतील विश्वस्तांनी केलेला अंदाधुंद कारभार निदर्शनास आल्यानंतर ‘मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष नितीन जाधव यांनी कला संचालनालय तसेच राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या. संस्थेतील गैरकारभारावर निरीक्षक बोरूले यांनी अंकुश घातला नाही. उलट संस्थेला वेळोवेळी पाठीशी घातल्याची तक्रार जाधव यांनी केली होती. माहिती कायद्याअंतर्गत जुन्या संस्थेबाबतची कागदपत्रेही त्यांनी संचालनालयाकडे तसेच उच्च-तंत्र शिक्षण विभागाकडे मागितली. परंतु, कला संचालनालयाने अशी कागदपत्रे दिली नाहीतच उलट बोरूले यांच्यावरही कारवाई केली नाही. त्यामुळे जाधव यांनी माहिती आयुक्तांकडे तक्रार केली. माहिती आयुक्तांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून याबाबतचे स्पष्टीकरण मागविले. त्यामुळे कला संचालनालयाचे संचालक रवींद्र बाळापुरे यांनी बोरले यांच्या चौकशीसाठी जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता गो. गो. वाघमारे यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात येत असल्याचा आदेश २६ फेब्रुवारी जारी केला आहे. याबाबत बाळापुरे यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.