Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मध्य रेल्वेच्या स्थानकांबाहेर चोवीस तास रुग्णवाहिका!
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी

 

रेल्वे अपघातांत जखमी होणाऱ्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वे दहा प्रमुख उपनगरी स्थानकांबाहेर सर्व सोयींनी सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवणार आहे. चोवीस तास उपलब्ध होणाऱ्या या रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वडाळा, वाशी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्थानकांबाहेर रुग्णवाहिका तैनात करण्याची रेल्वेची योजना आहे.
भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या या रुग्णवाहिका येत्या दोन-तीन महिन्यांत रेल्वे स्थानकांबाहेर उभ्या दिसतील. ‘रेल्वेने भाडेतत्त्वावर रुग्णावाहिका घेण्यासाठी निविदा काढली आहे. कोणताही अडथळा न आल्यास येत्या जून अखेपर्यंत सर्व दहा स्थानकांबाहेर चोवीस तास रुग्णवाहिका तैनात असतील’, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. तसेच दहाही स्थानकांबाहेर प्रत्येकी एक रुग्णवाहिका उभी असेल. प्रत्येक रुग्णवाहिकेत स्ट्रेचर, ऑक्सिजन सिलेंडर, प्रथमोपचार बॉक्स आदी सुविधा असतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
रेल्वे अपघातांतील मृतांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी नव्या रुग्णावाहिका भाडेतत्त्वावर घेण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षात मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जखमी प्रवाशांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याबद्दल फटकारल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी घाईघाईने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जाते.