Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
प्रादेशिक

महावितरणच्या २०० कोटींच्या निधीला आचारसंहितेचा झटका ?
केदार दामले
मुंबई, ११ मार्च

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत खासगी ट्रेडर्सकडून १५०० मेगाव्ॉट वीज खरेदी करण्यास आणि त्यासाठी दरमहा २०० कोटी रुपये ‘महावितरण’ला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असली आणि त्याबाबत निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असले तरी या २०० कोटी रुपयांमधील फुटकी कवडीही ‘महावितरण’ला अद्याप मिळालेली नाही. त्यातच दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडून यासाठी मान्यता मिळणे गरजेचे ठरल्यास कालापव्यय होऊन पुढील महिन्यांत तरी राज्य सरकारकडून निधी मिळेल का, यावर प्रश्नचिन्ह ठाकले आहे.

तुकारामांच्या भेटीला जगभरातील ‘नेटकरी’!
शेखर जोशी
मुंबई, ११ मार्च

महाराष्ट्रातील सर्व संतांनी ज्या पंढरीच्या विठुरायाचे आपल्या अभंगातून वर्णन केले आणि ज्याला आपला सखा मानला त्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरीची वारी करीत असतात. पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणेच सध्याच्या संगणक आणि इंटरनेटच्या महाजालात ‘नेटकरी’ विविध संकेतस्थळांना भेट देत असतात. संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा आणि त्याच्याविषयी माहिती देणाऱ्या www.tukaram.com या संकेतस्थळालाही गेल्या काही वर्षांत केवळ महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगभरातून १३५ देशांमधील ‘नेटकरी’ नित्यनेमाने भेट देत आहेत.

अंमलबजावणी महासंचालनालयाला मुंबईसाठी अधिकारी मिळेना!
साजी मोहनच्या लाचखोरीचा आरोप कारणीभूत?
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी
परकीय चलन विषयक कायद्यांतर्गत कोटय़वधी रुपयांचे घोटाळे उघड करण्यात मुंबईचे अंमलबजावणी महासंचालनालय महत्त्वाची भूमिका बजावीत असले तरी या विभागाला गेल्या काही महिन्यांपासून प्रमुख अधिकारीच लाभलेला नाही. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झालेला आयपीएस अधिकारी साजी मोहन याने आपण अंमलबजावणी महासंचालनालयाच्या कोचीनमधील उपसंचालकपदाच्या नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मोजल्याचा आरोप केल्यानंतर मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुबंईसाठी अधिकारीच सापडेनासा झाला आहे. साजी मोहनच्या आरोपानंतर केंद्रीय अर्थ व महसूल विभागाच्या निवड समितीने काळजीपूर्वक अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

बोगस महाविद्यालयावर कारवाई करण्यात टाळाटाळ!
कला संचालनालयाच्या अधिकाऱ्याची चौकशी होणार
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी
डोंबिवली येथील ‘करंदीकर कला अ‍ॅकॅडमी’ या महाविद्यालयात विविध कला अभ्यासक्रम राबविण्यात येतात. १९९९ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेच्या जुन्या व्यवस्थापनाने अनेक गैरप्रकार केलेले असतानाही संस्थेवर कोणतीही कारवाई न करता उलट चुकांवर पांघरून घातल्याच्या तक्रारीवरून कला संचालनालयाचे निरीक्षक दिलीप बोरुले यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे.‘करंदीकर कला अ‍ॅकॅडमी’ ही संस्था ‘लीफ कल्चरल आणि चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने सुरू करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात संस्थेकडे कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्या.

मध्य रेल्वेच्या स्थानकांबाहेर चोवीस तास रुग्णवाहिका!
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी

रेल्वे अपघातांत जखमी होणाऱ्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वे दहा प्रमुख उपनगरी स्थानकांबाहेर सर्व सोयींनी सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवणार आहे. चोवीस तास उपलब्ध होणाऱ्या या रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वडाळा, वाशी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्थानकांबाहेर रुग्णवाहिका तैनात करण्याची रेल्वेची योजना आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आज आंदोलन
उत्तरपत्रिका तपासणी बहिष्कार आंदोलन तीव्र करणार
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी

‘मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने’ने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्यानंतर आता हे आंदोलन अधिक तीव्र करीत गुरूवारी आझाद मैदानात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना’ व ‘केजी टू पीजी शिक्षक संघटना समन्वयक समिती’ या संघटनाही आंदोलनात उतरल्या आहेत. एमव्हीएलयू व चिनॉय महाविद्यालयातील ४० शिक्षकांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, पर्यावरण व गणित (प्रात्यक्षिक) विषय शिकविणाऱ्या राज्यातील एक हजार ७६६ शिक्षकांच्या पदांना मान्यता द्यावी, केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन द्यावे, मुंबईत एक वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकांचे निवृत्तीवेतन देण्यात यावे या मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येत असल्याचे मुंबई ‘कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने’चे अध्यक्ष अमरसिंग यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. उत्तरपत्रिका न तपासणाऱ्या शिक्षकांना ‘अत्यावश्यक सेवा कायदा’ लागू करून त्यांच्यावर कारवाई करू पाहणाऱ्या शिक्षण मंडळाचाही संघटनेने निषेध केला आहे. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली नाही तर उत्तरपत्रिका बहिष्कार आंदोलन राज्यभरात करण्यात येणार असल्याचेही अमरसिंग यांनी सांगितले.

झवेरी बाजारात लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; चारजण जखमी
मुंबई, ११ मार्च / प्रतिनिधी

झवेरी बाजारातील सेफ मेमन स्ट्रीटवरील इमारतीमध्ये आज पहाटे अचानक लागलेल्या भीषण आगीत एकाचा जळून मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले. आगीचे कारण समजू शकले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील त्रिभुवनदास खिमजीच्या बाजूला असलेल्या इमारतीत पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. संपूर्णत: व्यावसायिक गाळे असलेल्या या इमारतीमध्ये फक्त एक कुटुंब राहत होते. त्यामुळे आग लागल्यानंतर संपूर्ण कुटुंब आगीच्या लपेटामध्ये सापडून कुटुंबातील काहीजणांनी जीव वाचविण्यासाठी इमारतीतून उडय़ा मारल्या. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग मोठय़ा प्रमाणावर पसरली होती. आगीमुळे गॅस सिलेंडरचाही स्फोट होऊन इमारतीच्या छताचा भागही पूर्णपणे कोसळला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नंतर इमारतीत अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढले. बाहेर काढण्यात आलेल्या सदस्यांपैकी चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळील जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी पूर्णपणे जळून खाक झालेला मृतदेहही बाहेर काढण्यात आला. मात्र या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मयूर श्रॉफ, रुपल आणि शर्मिला श्रॉफ या तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर राजेंद्र तिवारी, मनीष जैन, परेश जैन आणि हितेश जैन असे चौघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना चार तासाहून जास्त वेळ लागला. अग्निशमन दलाचे आठ बंब, सात पाण्याचे टँकर्सच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली.

माथाडी कामगाराचा डोळा रंगाच्या फुग्याने केला निकामी
डोंबिवली, ११ मार्च/प्रतिनिधी

झोपडपट्टीतून फेकण्यात आलेला रंगाचा फुगा लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका माथाडी कामगाराच्या डोळ्याला लागल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. कोपर रेल्वेस्थानकात काल सकाळी ही घटना घडली. फुगा फेकणाऱ्या दोन मुलांना रेल्वे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात केली आहे.
संजय रघुनाथ काजारी (३१, रा. मानखुर्द) असे डोळा निकामी झालेल्यामाथाडी कामगाराचे नाव आहे. त्यास जे.जे. रुग्णालयात पोलिसांनी उपचारांसाठी दाखल केले आहे. इरफान गफूर शेख (९, रा. सहकारनगर, कोपर), मुनवर इब्राहिम पटेल (९, रा. सहकारनगर) अशी ताब्यात घेतलेल्या मुलांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या फुग्यामध्ये मिरची पूड, दगडाची बारीक कच, रंग आणि पाणी टाकण्यात आले होते. आरोपी मुलांनीच ही माहिती पोलिसांना दिली. संजय काजारी कुर्ला येथून लोकलने डोंबिवली येथे येत होता.