Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

रंगूनी रंगात साऱ्या..
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रंगणारी होळी आता मराठमोळा साज चढवून मराठी कलावंतांमध्येही आवर्जून साजरी करण्यात येऊ लागली आहे. पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडेकर, श्रीरंग गोडबोले, नंदू माधव आदी मंडळी गोरेगाव (पू.) येथील बिंबीसारनगरमध्ये धुळवड आयोजित करू लागले आहेत. एरवी चित्रीकरणाच्या निमित्ताने चढविलेला विविध भूमिकांचा मेक-अप उतरवून स्वच्छ चेहऱ्याने हे मराठी कलाकार बिंबीसारनगरमधील होळीच्या रंगात रंगून गेले होते. अशाच प्रकारचा धुळवडीचा कार्यक्रम अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, मिलिंद होळणकर, मंदार वाडकर, अवधूत वाडकर यांनी शिवाजी पार्कमधील बीएमसी जिमखान्यावर आयोजित केला होता.

‘ब्लॅक फ्रायडे’च्या स्मृती अद्यापि कायम
प्राजक्ता कदम

१२ मार्च १९९३ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटमालिकांनी मुंबई पुरती हादरली. १६ वर्षे उलटली तरी हा ‘काळा शुक्रवार’ आजही अनेकांच्या वेगवेगळ्या कारणांनी स्मृतीमध्ये राहिला आहे.. कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी १६ वर्षांपूर्वी बॉम्बस्फोट मालिका घडवून मुंबई आणि देशाला दहशतवादाची जी जखम दिली त्याच्या वेदना आजही कायम आहेत. दाऊद आणि टायगरच्या इशाऱ्यावरून दहशतवादाचे थैमान घालणाऱ्या देशद्रोह्यांना विशेष ‘टाडा’ न्यायालयाने दीड वर्षांपूर्वीच शिक्षा सुनावली आणि अनेकांच्या दृष्टीने हा ‘किस्सा’ तेथेच संपला.

मालाडमध्ये उभी राहताहेत बेसुमार बेकायदा बांधकामे!
सहाय्यक आयुक्त पाहून गेले तरी कारवाई नाही

प्रतिनिधी

मालाड पश्चिम येथील पी-उत्तर विभागात बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहत असून वॉर्डातील नियंत्रण कक्ष, बेकायदा बांधकाम निर्मूलन पथकाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याचा काहीएक फायदा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लिंक रोड गोरेगाव स्पोर्टस् क्लबसमोरील निषाद चाळीवर मजला चढविण्याचे बेकायदा बांधकाम सहाय्यक आयुक्त अश्विन खानोलकर हे स्वत: पाहून गेले तरीही ते बेकायदा बांधकाम दिमाखात उभे राहिले आहे.

आता २६/११ चा खटला!
प्रतिनिधी

तब्बल १५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ रोजी मध्यवर्ती कारागृह म्हणून प्रसिद्ध असलेल्या आर्थर रोड तुरूंगाच्या एका भागात विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले. खटल्यातील आरोपींची संख्या आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तुरूंगातच हे स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात येत होते. आता १५ वर्षांनंतर त्याचीच पुनरावृत्ती ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून होत आहे. आर्थर रोड तुरूंगातील हेच विशेष न्यायालय आता देशावरील सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याबाबतच्या खटल्यासाठी अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्थेत सज्ज होत आहे.

‘अमेरिकन आयडॉल’मध्ये ‘नुप-डॉग’
प्रतिनिधी

‘स्लमडॉग’ या शब्दावरून भारतात वादळ उठले असले तरी अप्रत्यक्षपणे हा शब्द आता भारतीयांशी जोडला जाऊ लागला आहे. ‘अमेरिकन आयडॉल’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये निवड झालेल्या अंतिम १३ जणांमध्ये भारतीय वंशाच्या अनुप देसाई अर्थात ‘नुप-डॉग’चा समावेश झाला आहे. या रिअ‍ॅलिटी शोच्या अंतिम फेरीत १२ जणांचीच निवड करण्यात येते. पण यंदा ‘अमेरिकन आयडॉल’च्या सत्रात मात्र १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे.

‘दक्षिणायन’ संगीत महोत्सव उद्या-परवा मुंबईत!
प्रतिनिधी

मुंबईतील ‘बनियान ट्री इव्हेंटस’ या संस्थेतर्फे मुंबईतील संगीत प्रेमींसाठी ‘दक्षिणायन’ या खास दाक्षिणात्य पद्धतीच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. मुंबई, दिल्ली, पुणे येथे दक्षिणायनचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पुणे येथे ७ मार्चपासून दक्षिणायन महोत्सवाला सुरूवात झाली. मुंबईत १३ व १४ मार्च रोजी नेहरू सेंटर, वरळी येथे सायंकाळी ६.३० वाजता हा महोत्सव रंगणार आहे. २१ मार्च रोजी दिल्लीत हा महोत्सव साजरा होणार आहे. पद्मभूषण टी.व्ही. शंकरनारायणन, एन. रविकिरण आणि भरतनाटय़म नृत्यांगना शोभना यांची अदाकारी रसिकांना या महोत्सवामध्ये अनुभवायला मिळणार आहे. ‘बनियान ट्री’चे संस्थापक महेशबाबू यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली गेली.

दलित संकल्पनेवरील नाटक
प्रतिनिधी

२००२ मध्ये नागपूरच्या ‘बोधी फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना झाल्यापासून ही संस्था सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे. देशभक्तीपर गीत नाटय़ निवेदनाने सजलेल्या ‘जंग-ए-आझादी’ या कार्यक्रमाची निर्मिती करून देशभक्ती जागृत करण्याचे यशस्वी प्रयत्न या संस्थेने केले आहेत. भारतीय राज्यघटनेचे महत्त्व सांगणाऱ्या ‘आझादी और संविधान’ या कार्यक्रमाची निर्मितीही या संस्थेने केली आहे. सामाजिक जाणीवांना रंगमंचावर आणून समाज प्रबोधन करण्याच्या दिशेने ही संस्था पावले टाकीत आहे.

कर्नाळा परिसरात शिबीर
प्रतिनिधी

होरायझन या संस्थेतर्फे दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी २७ ते २९ मार्च दरम्यान कर्नाळा अभयारण्याच्या परिसरात ट्रीपल ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत एक दिवस कोंढाणा गुंफांच्या परिसरात रॅपलिंग-जुमारिंग असे साहसी खेळ, एक दिवस कर्नाळा दुर्गदर्शन आणि आकाशदर्शन, एक दिवस कोलाड येथील कुंडलिका नदीवर २१ किमी अंतराचे रिव्हर राफ्टींग असे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. २७ मार्चला पहाटे निघून २९ मार्चला सायंकाळी परतण्याचा बेत आहे. अधिक माहितीसाठी मिलिंद पराडकर यांच्याशी ९८७०२१७७१२ किंवा २५९७२०५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लघुउद्योजक महिलांचा सत्कार
प्रतिनिधी

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून युवक प्रतिष्ठान या संस्थेतर्फे मुलुंड (प.) येथील वसंत ऑस्कर येथे लघु उद्योजक महिलांचा सत्कार करण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. मेधा सोमय्या, दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीमधील समुपदेशक राजश्री मोरकर उपस्थित होत्या. डॉ. मेधा सोमय्या यांनी आपल्या भाषणात कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावर महिलांसमोर कोणकोणती आव्हाने आहेत याचा उहापोह केला. तसेच राजश्री मोरकर यांनी महिलांना विविध व्यवसायाची आणि त्यात उपलब्ध असलेल्या संधीची माहिती दिली. प्रा. अदिती सावंत यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘सेलिब्रेटिंग वूमनहूम्ड’ हा लघुपट प्रदर्शित केला आणि त्याच्या आधारे महिला शक्तीची महती विषद केली.

'मेड इन चायना' ध्वनिफित प्रकाशित
प्रतिनिधी
विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) या विषयावर बेतलेल्या 'मेड इन चायना' या चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. वांद्रे येथील मुंबई टाईम्स कॅफेमध्ये झालेल्या कार्यक्रमात कलादिग्दर्शक नीतीन देसाई, गायक सुदेश भोसले, दिग्दर्शक राजीव पाटील, पॉप गायक बाली ब्रम्हभट्ट यांच्या उपस्थितीत ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. ध्वनिफितीमध्ये चार गाणी, चित्रपटातील पाच संवाद, चार इन्स्ट्रुमेंटल पाश्र्वसंगीताचे ट्रॅक्स आहेत. 'कशाला उद्याची बात.' हे गाणं व्ही. शांताराम यांची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. संतोष कोल्हे व कमल खेतान हे चित्रपटाचे निर्माते आहेत. मेड इन चायनामध्ये पहिल्यांदाच सुनिधी चौहान हिने मराठीमधील पहिले आयटम सॉंग गायिले आहे. १३ मार्चपासून राज्यभर चित्रपट प्रदर्शित होत आहे.